प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

सत्याग्रही लोकांचा छळ.- या निग्रही सत्याग्रही लोकांनां पोलीसच्या बंदोबस्तांत परत खाणींकडे पोंचविण्यांत आलें. परंतु पूर्वींप्रमाणेंच त्यांनीं नकार धरला. खाणीवरील व्यवस्थापकांनीं त्यांना अन्न देण्याचें नाकारलें. कारण काम करील त्याला अन्न असाच कायदा होता! ‘नेटल हिंदी समिती’नें कांहीं सभासद या संपवाल्यांनां मदत देण्यासाठीं पाठविले, परंतु खाणींच्या जागा खासगी मालकीच्या, व या जागांच्या मालकांनीं खाणींच्या आवारांत शिरण्याची परवानगी सदरील सभासदांनां देण्याचें नाकारलें, तेव्हां अर्थातच संपवाल्यांनां मदत पोंचली नाहीं. खाणींचे व्यवस्थापक संपवाल्यांनां नरम करण्यासाठीं त्यांजवर मार देण्याचा प्रयोग करूं लागले. या प्रयोगासंबंधानें संपवाल्यांनीं तक्रारी केल्या, परंतु त्या व्यर्थ झाल्या. एकहि खटला कोर्टापुढें आला नाहीं, कारण साक्ष घेण्याची बंदी करण्यांत आली होती. नोव्हेंबर पहिली पावेतों याप्रमाणें चाललें होतें. या तारखेच्या सुमाराला न्यू कॅसल व डंडी येथील मॅजिस्ट्रेटांनीं सरकारी हुकमावरून संपवाल्यांच्या खाणींत जागा तात्पुरते तुरुंग ठरविले आहेत असें जाहीर केलें आणि संपवाल्यांनां सक्तमजुरी कैदेची कमी अधिक मदुतीची शिक्षा ठोठावून त्यांनीं आपापल्या खाणींतच ही शिक्षा भोगावी असें ठरविलें. हिंदी लोकांनीं सत्याग्रह केला व काम करण्याचें नाकारलें. अधिकारी, खाणीवाले मालक व त्यांचे मुनीम गरम झाले आणि संपवाल्यांनां ठोशांचा, चाबकाचा वगैरे प्रसाद भरपूर मिळूं लागला.