प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करणें.- दुसरा एक गैरसमज [ ?] म्हणजे, कॉलेजें किंवा दुसर्‍या संस्था यांनीं जे प्रतिबंधकारक नियम केलेले आहेत ते करण्यांत किंवा त्यांच्याविरुद्ध झालेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यांत ब्यूरोचें अंग आहे असा विद्यार्थ्यांचा झालेला समज हा होय. अशी गैरसमजूत पुष्कळ अंशीं या विद्यार्थ्यांच्या देशांतीलच मोठ्या मोठ्या लोकांनीं पसरली आहे. विद्यार्थ्यांच्या मार्गांत अडचणी आणण्याचें तर राहोच, पण उलट त्यांनां ज्या ज्या ठिकाणीं मज्जाव आहे तेथें तेथें त्यांचा प्रवेश करून देण्याच्या कामीं व त्यांचीं खरीं खुरीं गार्‍हाणीं दूर करण्याच्या कामीं ब्यूरोनें चांगलेच यश मिळविलें आहे. या ब्यूरोचा सर्वांत मोठा विजय म्हणजे ऑक्सफोर्ड व केंब्रिज येथील युनिव्हर्सिटीच्या बोर्डांत आपलीं माणसें वगैरे घुसवुन त्यानें कमी केली हा होय. ऑक्सफोर्ड येथील ‘ओरिएंटल डेलिगसी’ व केंब्रिज येथील ‘इंटर कॉलेजिएट इंडिअन स्टुडंटस् कमिटी’ यांनीं स्थानिक सल्लागारांचें काम अंगावर घेतलें आहे;  व याप्रमाणें हिंदी विद्यार्थ्यांचें बूड बरेचसे ठिकाणीं बसल्यासारखें झालें आहे. सरकारी नियंत्रणाच्या ज्या बाबी बर्‍याचशा विद्यार्थ्यांनां आवडत नव्हत्या, त्या ऑक्सफोर्ड व केंब्रिज या युनिव्हर्सिट्यांतून प्रवेश मिळाल्यानें बर्‍याच दूर झाल्या आहेत. या दोन पुरातन युनिव्हर्सिट्यांतून प्रवेश मिळाल्यानें तेथील संस्कृतीचे व परंपरेचे परिणाम अनायासेंच हिंदी विद्यार्थ्यांवर घडूं लागतील. स्थानिक सल्लागारांनां भारतमंत्र्याकडून पूर्वीं जेवढी ग्रँट मिळत असे तेवढीच जवळ जवळ ते या संस्थांनां देतात. या संस्थांचे व्यवस्थापक माजी स्थानिक सल्लागारांपैकींच असल्यानें त्यांनां परिस्थितीची पूर्ण माहिती असते हें सांगणें नकोच.

स्टेट टेकनिकल स्कॉलरशिपसकरितां नेमिलेल्या सर टी. मॉरिसनच्या कमिटीच्या १९१३ च्या रिपोर्टांत म्हटलें आहे कीं, “हिंदू विद्यार्थ्यांना आपल्या पुस्तकी ज्ञानाला अनुभविक ज्ञानाची जोड मिळवून देण्याच्या कामीं येणार्‍या अडचणी सर्वसामान्य स्वरूपाच्या आहेत, म्हणजे हिंदी विद्यार्थ्यांनां कारखान्यांत वगैरे शिरकाव मिळण्यास ज्या अडचणी येतात त्याच बहुधा इंग्रज विद्यार्थ्यांना येतात. सामान्यतः पाहतां वर्णविद्वेषाची कल्पना येथें नाहीं म्हटलें तरी चालेल.” इंग्लंडांतील शिक्षणाच्या सोयींसंबंधानें व त्यांच्या एकंदर स्वरूपासंबंधानें कोणाहि विद्यार्थ्यानें निष्कारण गैरसमज करून घेऊं नये. ‘नॅशनल इंडिअन असोसिएशन’ व ‘सल्लागार कचेरी’ यांनीं प्रसिद्ध केलेलें आहे. त्यांतहि सर्व माहिती मिळेल. या पुस्तकाची १६ वी नवी आवृत्ती १९१९ मध्यें प्रसिद्ध झालेली आहे.

मित्रत्वाची सल्ला, जुलून नाहीं.- कांहीं जुन्या पद्धतीचे अँग्लोइंडीयन लोक समजतात त्याप्रमाणें या ब्यरोला लंडनमध्यें किंवा इतरत्र विद्यार्थ्यांच्या शिस्तीचें अनियंत्रित दडपण लादतां येत नाहीं. वस्तुस्थिति अशी आहे कीं, सरकारची किंवा संस्थानची स्कॉलरशिप घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांखेरीज इतरांवर आपले शिस्तीचे नियम जबरदस्तीनें लादण्याचा ब्यूरोला बिलकूल अधिकार नाहीं. आतां ज्या पालकांनीं किंवा आईबापांनीं आपलीं मुलें यांच्याच देखरेखीखालीं ठेविलेलीं असतील त्यांची गोष्ट वेगळी. तरी या विद्यार्थ्यांवर देखील त्यांनां खर्चाला जें मिळतें त्याच्या हिशेबापुरतीच देखरेख ठेवण्याचा ब्यूरोला अधिकार आहे. पुष्कळशा तरुण विद्यार्थ्यांनां कर्जबाजारीपणापासून वांचविण्याचें, उधळेपणापासून व व्यभिचार इत्यादि व्यसनांपासून अलिप्‍त ठेवण्याचें श्रेय ब्यूरोनें घेतलेलें आहे. हें श्रेय जें ब्यूरोनें मिळविलें तें जुलूम करून नव्हे, तर वेळोवेळीं मित्रत्वाची सल्ला देऊन, जें शिक्षण मिळविण्याकरितां विद्यार्थी इंग्लंडांत येतात त्या शिक्षणाच्या कार्याकडेच त्यांनीं लश्र देण्याची किती आवशकता आहे हें वारंवार त्यांच्या नजरेस आणून, मिळविलेलें आहे.

विद्यार्थ्यांनां बिनअधिकारी मदतगार व मित्र पुष्कळ मिळतात. लॉर्ड हॉक् यांच्या अध्यक्षत्वाखालीं व लोर्ड कारमायकेल यांच्या व्यवस्थापकत्वाखालीं अक्टन येथें इंडियन जिमखाना क्लब नांवाची संस्था आहे. याच्याकरितां ‘मिल हिर पार्क क्लब’ ची जागा घेण्यांत आली आहे. या क्लबच्या क्रिकेटपटूंनीं लॉर्ड व ओव्हल आणि दुसरे बारीकसारीक क्लब यांच्याशीं सामने खेळून चांगलेंच नांव मिळविलें आहे.

विद्यार्थी आणि महायुद्ध. - हिंदुस्थानानें महायुद्धांत मदत देऊन जी मोठी कामगिरी बजावली त्या योगानें परिस्थिति बरीच समाधानकारक झाली असल्याकारणानें आतां गैरसमज बारच दूर होईल. ‘इंडियन फिल्ड अ‍ॅम्बूलन्स’ नांवाचें एक पृथक तयार करून (यांत सुमारें २७२ लोक होते) व दुसर्‍या मार्गांनींहि इंग्लंडांतील हिंदी विद्यार्थ्यांनीं युद्धांत भाग घेतला आहे. महायुद्धांत ब्रिटिश विद्यार्थी लढाईच्या कामावर गेल्यामुळें युनिव्हर्सिट्यांतून ब्रिटिश विद्यार्थी लढाईच्या कामावर गेल्यामुळें युनिव्हर्सिट्यांतून ब्रिटिश विद्यार्थी कमी झाले, त्यावेळीं हिंदी विद्यार्थ्यांनीं बर्‍याच मोठ्या प्रमाणांत चांगलें यश मिळवून दाखविलें. त्यामुळें त्यांच्याबद्दल बरेंच चांगलें मत उत्पन्न झालें आहे. हिंदी विद्यार्थ्यांनीं युनिवहर्सिट्यांतून मिळविलेला मान सन्मान हा हिंदुस्थानांतून पूर्वींपेक्षां बरे विद्यार्थी इंग्लडांत जाऊं लागले आहेत याचें निदर्शक आहे. यांत युनिव्हर्सिट्या व कॉलेजें यांनीं दिलेल्या सवलतींचाहि भाग बराच आहे हें कबूल केलें पाहिजे. परंतु युद्धकाळीं ब्रिटिश विद्यार्थ्यांबरोबर चढाओढ करण्याचा फारसा प्रसंग नसल्यानें तेवढ्यापुरता जरी हिंदी विद्यार्थ्यांनां फायदा मिळाला तरी हिंदी विद्यार्थ्यांसाठीं म्हणून पास होण्यास लागणार्‍या गुणांचें प्रमाण कमी केलेलें नव्हतें ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे. आतां सर्व स्थिरस्थावर झालें असल्याकारणानें पुन्हां जास्त स्पर्धा सुरू झाली आहे व जुन्या युनिव्हर्सिट्यांतून जागा मिळणें अवघड झालें आहे. दुसर्‍या सर्व जबाबदार्‍या लक्षांत घेऊन ब्रिटिश युनिव्हर्सिट्या अंगचोरपणा न करितां चांगल्या, बुद्धिमान् व मेहेनती विद्यार्थ्यांनां जागा देण्यास तयार असतात. त्यांनां आळशी, अयोग्य व व्यवस्थित शिक्षण नसलेले असे विद्यार्थी नको असतात एवढेंच.

या संबंधाचा सर्व विचार सर चार्ल्स मॅलेट यांणीं १९०९ पासून १९१६ पर्यन्त ‘इंडिअन स्टूडंट्स डिपार्टमेंट’ च्या कामासंबंधानें सालोसाल केलेल्या चार रिपोर्टांतून केलेला आहे.

[आपल्या येथून परदेशीं जाणार्‍यांचें वर्गीकरण देऊन नंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या नव्या सांवत्सरिक ग्रंथांतील परदेशगमनविषयक उपयुक्त माहिती आतांपर्यंत वर दिली आहे. यानंतर बाहेर जाणार्‍या आपल्या लोकांची आर्थिक दृष्ट्या बाहेरचें जग काय किंमत करतें हें आपण पाहूं.]