प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

सत्याग्रही लोकांवर गोळ्या.- नोव्हेंबर १० रोजीं गांधींनांहि कैद झाली. गांधींचा निरोप संपवाल्यांनां गेला कीं, “तीन पौंड पट्टी रद्य होईपावेतों संप मोडणें नाहीं. सरकारानें मला कैद केलेंच आहे. आतां पट्टी रद्द करण्यासंबंधीचें आपलें म्हणणें सरकारला गौरवानें लोकांपुढें मांडतां येईल.” हा निरोप गांधींच्या ठिकाणापासून २५० मैलांवर नेटलच्या समुद्रकिनार्‍याच्या भागांतील हिंदी लोकांच्या कानावर जातांच त्या लोकांनीं ताबडतोब (ता. ११ नोव्हेंबर) संप केला. हे हिंदी मजूर दंगाधोपा करतील या दहशतीनें पोलीस व लष्करी लोक सरकारनें बंदोबस्ताकरितां तयार केले. मारामारी, गोळ्या घालणें, वगैरे प्रकार झाले, प्राणहानि झाली.

चौकशी-कमिशन.- या प्रकरणासंबंधानें व वर खाणींतील मजुरांवर झालेल्या हाणामारीच्या व जुलुमजबरदस्तीच्या प्रकरणासंबंधानें चौकशी-कमिशन ता. २९ नोव्हेंबरला नेमलें गेले. मध्यंतरी डर्बानमध्यें हिंदी संपवाल्यांना उद्देशून नेटल हिंदी समितीचे सभासद असलेल्या कित्येक स्त्रीपुरुषांचीं व्याख्यानें झालीं व त्यांत अधिकार्‍याशीं नम्रपणानें वागा आणि सत्याग्रहाची तत्त्वें धैर्यानें पाळा असा उपदेश केला गेला. तरीपण या सरळ व्याख्यानांचा विपर्यास केला गेला आणि १०।१५ व्याख्यात्यांवर लोकांनां मारामारीची चिथावणी केल्याच आरोप ठेवून त्यांस कैद केलें.

संपवाल्या व इतर सत्याग्रही लोकांचा मेळा एका प्रसंगीं ३०००० पावेतों वाढला होता. यांची राहण्याची, खाण्यापिण्याची वगैरे सोय लावण्याचा रोजचा खर्च २५० पौंड येत असे. हिंदुस्थानांत नामदार गोखले यांनीं दक्षिण आफ्रिकेंतील सत्याग्रही चळवळीसंबंधाची स्थिति समजावून देऊन या चळवळीच्या मदतीसाठीं मोठाल्या वर्गण्या जमविण्याचें काम केलें. ही वर्गणीची रक्कम चळवळीला चांगले स्वरूप आणण्यास फार उपयोगी पडली. सत्याग्रही संपवाल्यांनां त्यांच्या त्यांच्या कारखान्यांत डाळतांदूळ पोंचविण्याचें काम कांहीं दिवस चालू होतें. पुढें अधिरार्‍यांनीं या कामांत कांहीं काळाबेरा उद्देश आहे असा संशय काढला आणि ही मदत पोंचविणें बंद केलें. यानंतर रस्त्यावर अन्न ठेवून द्यावें व तें हिंदी संपवाल्यांनीं घेऊन जावें असा क्रम कांहीं दिवस चालला. पण हें कामहि अधिकार्‍यांनीं बंद पाडलें. सत्याग्रही लोकांनां उपासमारीचे दिवस काढावयास लावावयाचे व या रीतीनें काम करावयास भाग पाडावयाचें, हा हेतु. परंतु सत्याग्रही लोकांनीं सत्याची कांस बळकट धरली व हा हेतु निष्फळ केला. यापुढें हाणामारीवर आलें व अशा रीतीनें कांहीं काळ लोटल्यावर चौकशीकमिशन ता. २९ नोव्हेंबरच्या सुमारास नेमलें गेलें. सर बेंजामिन रॉबर्टसन् हे हिंदी सरकारच्या तर्फेनें सदरील कमिशनच्या प्रसंगीं चौकशीसाठीं पाठविलें गेले. त्याच्या योगानें दक्षिण आफ्रिकेच्या सरकारापुढें हिंदी मंडळींची बाजू जितक्या चांगल्या तर्‍हेनें इंग्रजांस मांडतां येईल तितकी मांडली गेली. तथापि विशेष फलनिष्पत्ति झाली नाहीं.

[ब्रिटिशेतर वसाहतींतील भारतीयांची स्थिती आपण येथवर नजरेखालीं घातली. आतां ब्रिटिशेतर वसाहतींचें थोडेंसें निरिक्षण करूं.]