प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन-आफ्रिका आणि अमेरिका येथील वसाहती.

सत्याग्रहास सुरुवात.- शेवटीं १५ सप्टंबर १९१३ रोजीं ‘ब्रिटिश हिंदी समिती’ चे अध्यक्ष कचलिया यांनीं युनिअनसरकारला स्पष्टपणें कळविलें कीं, आतां हिंदी लोक सत्याग्रह सुरु करणार आहेत. मे १९१३  पासून सत्याग्रहाची तयारी चाललेली होतीच. तेव्हां वरील सूचनेप्रमाणें ताबडतोब १२ पुरुष व ४ स्त्रिया यांनीं सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. या पहिल्या सत्याग्रही गटांत सर्व धर्मांचे व व्यापारी, कारकून, मोलकरी, सुखवस्तु वगैरे सर्व वर्गांचे लोक होत. या गटानें नेटल सोडून ट्रान्सवालाचा रस्ता धरला व वालक्रस्ट येथें सरहद्द ओलांडून ते आंत शिरले. या कृत्याबद्दल त्यांनां तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा मिळाली. ही शिक्षा इकडे मिळतांच तिकडे ट्रान्सवालांतील बर्‍याचशा हिंदी स्त्रिया न्यूकॅसल व नेटल येथें येऊन बिगरपरवाना व्यापार करूं लागल्या आणि सत्याग्रह करण्यासंबंधी उपदेशहि त्यांनीं सुरू केला. या कामगिरीबद्दल या स्त्रियांनां तीन महिने सक्तमजुरी झाली. या स्त्रियांपैकीं कांहींचीं लहान अर्भकें त्यांच्या कडेवरच होतीं. या स्वार्थत्यागी महानुभाव स्त्रियांच्या उदाहरणाचा न्यूकॅसलमधील हिंदी जनतेवर सहजच विद्युद्‍गतीनें परिणाम झाला, आणि तेथील वाढप्यांचा धंदा करणार्‍या हिंदी लोकांनीं त्याच दिवशीं एकदम संप करून सरकार तीन पौंड पट्टी काढून टाकीपावेतों आम्ही कामावर जाणार नाहीं असें जाहीर केलें. दुसरें दिवशीं म्हणजे २३ आक्टोबर, १९१३ रोजीं न्यूकॅसल, फेअरली, बेलेन्गीक्, कॅम्ब्रिअन्, डर्बान नॅविगेशन्, ग्लेंको, नेटल नॅविगेशन, हॅटिंग  स्प्रूट, सेंट जॉर्ज व राम्से या नऊ कोळशाच्या खाणींतील लोकांनीं न्यूकॅसलची वार्ता ऐकून स्वयंस्फूर्तीनें संप केला  व हे बहुतेक लोक डंडी येथें आले. या ठिकाणी एका चांभाराच्या अध्यक्षतेखालीं गांधींनीं या संपवाल्यांनां जाहीर उपदेश केला. या व्याख्यानांत गांधींनीं लोकांना आपलीं कामें सोडून देण्याचा उपदेश केल्याचा त्यांजवर पुढें आरोप ठेवला गेला व या कृत्याबद्दल त्यांस ९ महिने सक्तमजुरी मिळाली.