प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती
विद्यार्थिवर्ग.- परंतु इंग्लंडांतील हिंदी लोकसंख्येचा या सर्वांपेक्षां महत्वाचा घटक म्हणजे हिंदी विद्यार्थिवर्ग, व तेथें हिंदी लोकांसंबधानें जर कांहीं प्रश्न उपस्थित झालेले असतील तर ते मुख्यतः .याच वर्गाबद्दल होत.
महायुद्धापूर्वींच्या पाशतकांत या विद्यार्थ्यांची संख्या पूर्वींच्या दसपट अगर बारापट वाढली. ही वाढ मुख्यतः १९०४ व १९०५ या सालांत विशेष जोरानें झाली. यानंतर सुमारें पांच एक वर्षांनीं बॅरिस्टरीकडे धांव घेणार्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी लंडनांत येऊं लागल्या. त्यामुळें कृत्रिम वाढ बरीच झाली. यामुळें प्रवेशपरीक्षा जास्त अवघड ठेवाव्या लागल्या. या परिक्षांमुळे या वाढीला आळा बसला व औद्योगिक व एंजिनिअरिंग वर्गांतून विशेष भरती होऊं लागली. महायुद्धामुळें या भरतीला जोराचा धक्का बसला खरा, परंतु युद्धाची तात्पुरती लाट ओसरतांच परवाना व कॉलेजमध्यें जागा मिळणें या दोन्ही बाबतींतल्या अडचणींनां न जुमानतां १९१९ सालीं या संख्येंत बरीच वाढ झालीं. युनिव्हर्सिटीच्या तरुण विद्यार्थ्यांखेरीज ईटन व हॅरो येथील शाळांत कांहीं हिंदी विद्यार्थी आहेत. हे चांगल्या हिंदू घराण्यांतले असून यांत कित्येक संस्थानांच्या राजघराण्यांतील मुलें आहेत. बॅरिस्टरीच्या धंद्याकडे २०० किंवा ३०० विद्यार्थी नेहमीं असतात. युद्धापासून कलाविषयक व औद्योगिक बाजूकडील विद्यार्थ्यांत बरीच वाढ झालेली आहे. वैद्यकीकडचे, कलाविषयाकडचे वगैरे सर्व विद्यार्थी धरून लंडनमध्यें सुमारें ५०० तरूण हिंदी लोक आहेत. एडिंबरो, केंब्रिज, ऑक्सफर्ड व मँचेस्टर येथील विद्यार्थ्यांची संख्या यांच्या खालोखाल आहे. खेरीज ग्लासगो, बर्मिंगहॅम, लिड्स्, शेफिल्ड व लिव्हरपूल येथें कांहीं विद्यार्थी आहेत.