प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

ब्रिटिशेतर वसाहतींतील भारतीय. {kosh ‘Indian Emigration to Non-Brtish Colonies’ by Mr. H. S. L. Polak, I. R. 1912}*{/kosh} - परदेशवास केलेल्या भारतीयांचे दोन वर्ग पडतात. एक, स्वेच्छेनें परदेशांत जाऊन राहिलेल्या लोकांचा; व दुसरा, करारानें बांधलेल्या परदेशवासीयांचा. पूर्व आफ्रिकेचा समुद्रकिनार्‍यालगतचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशांत कित्येक शतकांपूर्वींपासून भारतीय लोक स्वेच्छेनें जाऊन राहत आहेत. आज ज्याला ईस्ट आफ्रिकन् प्रोटेक्टोरेट म्हणतात तो प्रदेश ब्रिटिश लोकांनीं आपल्या ताब्यांत घेण्यापूर्वीं कित्येक वर्षें अगोदर भारतीय लोक किनार्‍यालगतचा प्रदेश व्यापून पुष्कळसे आंताहि वसती करून राहिले होते, ही गोष्ट. ए. एम्. जीवनजी यांनीं वारंवार पुढें आणिली आहे. मोम्बासाचे उत्तरेपासून तों डर्बानपर्यंत, आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍यावर जागोजाग भारतीयांच्या वसाहती आहेत. तसेंच नैरोबी, ब्लँटायर व इतर अंतःप्रदेशांतील ठिकाणींहि या वसाहती आहेत. या सर्व ठिकाणीं ‘सुधारणेचा’ प्रथम प्रवेश झाला तो भारतीयांच्या द्वाराच झाला. या ठिकाणीं आज ब्रिटिशांचें राज्य झालें आहे, तसें इतर ठिकाणें जीं या भारतीयांनीं रानटी स्थितींतून काढून सुधारलेल्या लोकांच्या वसतीला योग्य केलीं त्या ठिकाणीं जर्मन व पोर्तुगाल आणि दुसरे कित्येक परदेश यांचे राज्य आहे. हीं सर्व ठिकाणें उद्योगधंदे, व्यापार, शेतकी, या सर्व दृष्टींनीं भारतीयांनीं चांगलींच नांवारूपाला आणलीं व अशा चांगल्या स्थितींत तीं परकीयांनां आयतीं प्राप्‍त झालीं. ब्रिटिशेतर वसाहतींतील नमुनेदार ठिकाणांत लांगा, दार-एस्-सलाम्, बैरा, छिंदे, किलिमेन्, मोझांबिक, इन्हाम्बेन्, देलगोआ बे, हीं प्रमुख होत.

ब्रिटिश गुरु.- ब्रिटिश वसाहतींतून भारतीयांचा छळ करण्याचें प्रथम सुरु झालें व नंतर हें वेड पोर्तुगीज, जर्मन वगैर वसाहतवाल्यामध्येंहि दिसूं लागलें. ब्रिटिशांनीं अमुक प्रकारचा भारतीयहितविरोधी कायदा केलेला आहे असा आधार देण्याचीच वहिवाट पडली. उदाहरणार्थ, १८८४ सालीं प्रिटोरियाचे व्यापारीमंडळातर्फे साउथ आफ्रिकन रेपब्लिकच्या वाल्सक्रादकडे जो एक अर्ज पाठविला गेला त्यांत ब्रिटिशांच्या निरनिराळ्या वसाहतराज्यांत एशियावाल्यांच्या विरुद्ध पास केलेले कायदे नमुन्यादाखल अंतर्भूत केलेले होते आणि रेपब्लिकनें ब्रिटिशांचे सदरील एशियाटिक-विरोधी धोरण उचलणेंच हितकर आहे असें प्रतिपादन केलें होतें. १८८४ सालच्या लंडन कन्वेन्शननें दक्षिण आफ्रिकेंतील देश्येतर ब्रिटिश प्रजाजनांच्या हक्काचा करार म्हणून जो करार केला त्यांत गोरे लोक व त्यांची मुलेंबाळे-त्यांचे वंशज-यांच्याच हक्कांचें खरोखरी संरक्षण केलेलें होतें ही गोष्टही वरील अर्जांत नमूद केली होती. या अर्जाचा विचार होऊन १८८५ चा ३ रा कायदा दक्षिणआफ्रिका-लोकशाहीनें पास केला. पुढें ट्रान्सव्हालमध्यें जे भारतीयहितविरोधी कायदे पास केले गेले त्या सर्वांचे उगमस्थान हा १८८५ चा ३ रा कायदा होय.

ट्रान्सवाल हें बोअर युद्धानंतर ब्रिटिश वसाहत बनल्यावरहि त्या प्रदेशांचें भारतीय-विरोधी धोरण पूर्वींप्रमाणेंच राहिलेलें आहे. ट्रान्सवाल रजिस्ट्रेशन आक्ट सेल्बोर्न-बोथा-स्मट्स गवर्मेंटनें पास करून घेतल्यानंतर नेटल व दक्षिण र्‍होडेशिया या संस्थानांनीं तसलेच भारतीय हितविनाशक कायदे पास करून घेण्याची खटपट केली. {kosh या खटपटींत यश आलें नाहीं कारण साम्राज्यसरकार विरूद्ध गेलें.}*{/kosh} ब्रिटिश पूर्व आफ्रिका सरकारनेंहि भारतीयांनां दूर ठेवण्याचें धोरण स्वीकारलें.

या ब्रिटिश उदाहरणांचा फायदा घेऊन पोर्तुगीज व जर्मन वसाहतवाले भारतीयांचा छळ करण्याचेंच धोरण पत्करूं लागले.