प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती
फ्रेंच अत्याचार.- ब्रिटिशेतर वसाहतींत करारबंदीनें हिंदी लोक जाऊं लागले त्याला आज जवळ जवळ ८० वर्षें झालीं आहेत. मॉरिशसवाल्यांना हिंदी मजूर मिळाल्यानंतर लवकरच रेयुनिअन् नांवाच्या मॉरिशसलगतच्या बेटांतील लोकांनीं करारबंदी हिंदी मजूर मिळण्याबद्दल अर्ज केला व या अर्जाप्रमाणें त्यांनां हिंदी मजुरांचा पुरवठा केला गेला. पुढें मजुरांनां वागविण्याच्या कामांत रेयुनिअनवाल्यांकडून अत्याचार घडल्यानें ग्रेटब्रिटन व फ्रान्स यांचमध्यें करारमदार होऊन फ्रेंच मुलखांत करारबंदीनें जाणार्या हिंदी लोकांची व्यवस्था नीट व्हावी अशी तजवीज करण्यांत आली. पण हे करारमदार फुकट केला जाऊं नये असें ठरलें. डेन्मार्कनेंहि हिंदूस्थानांतून करारबंदीचे मजूर आपल्या वसाहतींत नेण्याचा उपक्रम केला होता. परंतु अंतर्गत अडचणीमुळें डेन्मार्कवाल्यांनीं आपण होऊनच ही पद्धति बंद केली. ब्रिटिश गियाना जवळ सुरीनाम नांवाची डच वसाहत आहे तेथें १९१२ पावेतों करारबंदीचे मजूर जात होते.
१९१२ सालीं जर्मन नैऋत्य आफ्रिकेंत लुएडेरिझ बे येथील खाणावळवाल्यांच्या मंडळाला मजुरांची तूट फार भासूं लागली. या ठिकाणीं हिर्याच्या खाणी आहेत. या खाणींसाठीं डामारालँडच्या सरकारच्या परवानगीनें एक हजार हिंदी मजूर करारबंदीनें आणावे अशी योजना सदरील खाणीवाल्यांनीं काढली.