प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती
परदेशगमनाचें भवितव्य.- एवंच पश्चिमेकडे गेलेल्या जिप्सींचे खेरीज करून प्राचीनकालीं झालेलें परदेशगमन भारतीय संस्कृतीचें संवर्धक होतें. आजचें तसें नाहीं. तथापि आजचें परदेशगमन फलप्रद होत नाहीं असें नाहीं. जेथें आपल्या लोकांचा मोठा जमाव जातो तेथें आपली भाषा वगैरे राहण्यास तो कारण होतो आणि जे आज असंस्कृत आहेत ते उद्यां सुसंस्कृत पुढें बनवून मागें तेच संस्कृतीस जीव आणतात. कांहीं अंशीं आजची सामान्य जनता आजच्या सुशिक्षित वर्गापेक्षां स्वसंस्कृतिसंवर्धानास अधिक कारणीभूत होत आहे. हिंदुस्थानी भाषांचे कोर्टांत आणि इमिग्रेशन खात्यांत दुभाषे नेमणें, पोस्ट आफिसामध्यें भारतीय माणसें घेणें, हें अमेरिकेंत गेलेल्या अशिक्षितांशीं जरूर असलेल्या व्यवहारामुळें प्राप्त झालें. इंग्लंडास जाणारे हिंदु पुष्कळ आहेत पण ते मोठ्या पदवीचे आहेत. ते स्वतः इंग्रजी जाणतात आणि म्हणून ज्या प्रकारच्या भारतीयांची गरज अमेरीकेच्या पश्चिम भागांत सरकारास उत्पन्न झाली त्या तर्हेची गरच इंग्लंडांत उत्पन्न होत नाहीं. अशिक्षित वर्गास आज धर्मोपदेशक मिळत नाहींत. ब्रिटिश गियाना आणि त्रिनिदाद येथें जागोजाग हिंदूंची देवळें आहेत, थोडाबहुत संस्कार किंवा धर्मोपदेश तेथें गेलेले ब्राह्मण करतात, त्या ब्राह्मणांस दक्षिणाहि बरी मिळते आणि ती तशी “विनाकारण” मिळतें, हें पाहून ख्रिस्ती मिशनर्यांस मत्सर उत्पन्न होतो. तथापि हें स्वत्वस्थापन फारच क्षुल्लक आहे. थोडक्यांत सांगावयाचें म्हटल्यास आजचें दूरदेशगमन आपण विशेष काळजी न घेतल्यास आपल्या संस्कृतीचें पोषक होणार नाहीं. ज्याप्रमाणें जिप्सींची अवस्था झाली त्याचप्रमाणें आजच्या परदेशगन्तूची होऊन, ‘परकिय देशांतील एक हीन जात’ प्रकारचेंहि हिंदूंचें भवितव्य पुढें होण्याचा संभव आहे. जें परदेशगमन जवळच्या आणि मूलतः बौद्ध अशा वसतीच्या देशांत होईल तें आर्य संस्कृतीस पोषक होईल, हें ब्रह्मदेशाविषयीं विवेचन करितांनां दाखविलेंच आहे.