प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती
पोर्तुगीज शिष्य. १८९६ सालीं लोरेन्को मार्क्वेस या पोर्तुगीज परगण्यांत भारतीयांनां वागविण्याचें जें उदार धोरण अमलांत होतें तें पुढें लवकरच ब्रिटिश उदाहरणामुळें पार बदलून गेलें. नेटलमध्यें (नेटल ही ब्रिटिश वसाहत) एकदां गांधीनां आगगाडींतून खालीं ओढूनकाढून एका गोर्याला जागा करून दिल होती मग इतरेजनांची कथा काय ? ट्रान्सवालमध्यें गुरांच्या गाड्यांतच भारतीयांना कोंडण्याची वहिवाट आहे. उलटपक्षीं, लोरेन्को मार्क्वेस या पोर्तुगीज परगण्यांत गरीब भारतीयांनां दुसर्या कल्सांत बसवीत व आदरानें वागवीत. ही १८९६ मधली स्थिति (हिचा उल्लेख गांधींचीं त्या वर्षीं हिंदुस्थानांत जीं व्याख्यानें झालीं त्यांतून झाला होता). परंतु पोर्तुगीज लोक लवकरच ब्रिटिश वळणावर गेले. नेटलमध्यें जसा भारतीयांचा राजकीय मताचा हक्क काढून घेतला गेला तसे पोर्तुगीज लोकहि हळू हळू भारतीयांच्या मानवी स्वतंत्रतेच्या हक्कावर घाला घालूं लागले. ट्रान्सवालचे लोक हे ब्रिटिश उदाहरणाचा फायदा घेऊन सर्वांत अग्रेसर असे भारतीय -द्वेष्टे बनलेले होते. पोर्तुगीज अंमलदार हे ट्रान्सवालनें जो रेजिस्ट्रेशन आक्ट व एमिग्रेशन आक्ट तयार केला होता त्याची अंमलबजावणी करण्याच्या कामांत किनार्यावरील पोर्तुगीज अंमलदार न्यायाकडे न पाहतां ट्रान्सवाल सरकारला मदत देऊं लागले. उदाहरणार्थ, ट्रान्सवालच्या कायद्याविरुद्ध सत्याग्रह करणार्या अगदीं निरपराधी अशा शेंकडों लोकांनां ट्रान्सवाल सरकारनें चौकशी न करतां हद्दपारीची शिक्षा दिली व ही शिक्षा पोर्तुगीज मुलखांतून भारतीयांनां घेऊन जाऊन अंमलांत आणली गेली. याप्रमाणें हद्दपारीच्या अन्याय हुकमाच्या बजावणींतच पोर्तुगीज अंमलदार मदत देऊन राहिले नाहींत तर ट्रान्सवालमध्यें आपल्या आईबापांकडे कायदेशीर हक्कानें जावयास निघालेल्या लहान हिंदी मुलांनां अडविण्याचें कामहि त्यांनीं केलें. ही पोर्तुगीज लोकांची गोष्ट झाली.