प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

परदेशगमनाची अव्याहत परंपरा.- प्राचीन कालच्या परदेशगमनापासून अलीकडचें परदेशगमन कालदृष्टीनें अगदीं पृथक् काढतां येणार नाहीं. आज व्यापारामध्यें गुजराथी लोकांस प्रामुख्य आहे आणि यूरोपांत गुजराथी जरी व्यापाराकितां फारसे जात नाहींत तरी आफ्रिकेमध्यें आणि हिंदुस्थानच्या पूर्व भागांत पुष्कळ जातात. या गुजराथ्यांची व्यापारविषयक परंपरा फार जुनी आहे. व्यापाराबरोबर चांचेगिरिचा धंदा करण्याचें श्रेय देखील गुजराथ्यांस आहे. भडोचचा व्यापारी शहर म्हणून उल्लेख जातक कालापासून आहे. आणि तेथून वसर्‍यापर्यंत व्यापार जातकांत दिसतो. मध्यंतरीं हिंदुस्थानच्या पश्चिमकिनार्‍यावर चांचेगिरी चालत होती आणि त्यांत आंग्र्यांच्या नांवाचा जरी बोभाटा पुष्कळ झाला तरी खरे चांचे कच्छी होत. “चाचिया” या शब्दाची मराठी भाषेंत व्यत्पत्ति साधत नाहीं. गुजराथी लोक चांचिया याची व्युत्पत्ति अशी देतात कीं, चोंच असलेली पगडी वापरणारे लोक. कच्छ पालथ्या होडग्यासारखी एक पगडी वापरतात, तिला चाचिया म्हणतात. पालथी होडीची पगडी चांचेपणाची गुजराथेंत खूण होती. जे लोक व्यापारासाठीं साहस करणार, त्यांच्यातून व्यापार्‍यांचे लुटारू निघावयाचेच. सोकोत्रापर्यंत चांचेगिरी करणआरे हेच लोक असावेत. वास्को डी गामा याला हिंदुस्थानची वाट दाखविणारा वाटाड्या गुजराथी होता. अलबुकर्क हा जेव्हां यवद्वीपास गेला तेव्हां त्यास तेथीर अशी एक शासनपद्धति दिसून आली कीं जे बाहेरचे व्यापारी येत त्यांच्यापैकींच कोणास तरी त्या लोकांवर अधिकार देण्यांत येई. चिनी लोकांचा कोणी तरी पुढारी राजा मान्य करी आणि त्याप्रमाणेंच गुजराथी लोकांचा कोणी तरी पुढारी ठरविला जात असे. त्या त्या पुढार्‍यांस आपल्या सजातीयांवर अधिकार देऊन त्यास जबाबदार धरावयाचें फार प्राचीन पद्धत आहे. ही मनुस्मृतींतहि उपदेशिली आहे. बाहेर देशचे सीरियन ख्रिस्ती आणि कोचीनचे ज्यू ज्या वेळेस मलबार येथें आले आणि तेथें स्थित झाले, तेव्हां त्यांच्या पुढार्‍यांसहि मलबारच्या हिंदू राजांनीं अशींच अधिकारपत्रें दिलीं होतीं. डच लोकांनीं देखील ही पद्धत यवद्वीपांत अंशेकरून कायम ठेविली आहे. तेथें चिनी लोकांवर अधिकार चालविणार एक ‘क्यापटन चायनामन्’ म्हणून असतो. चिनी लोकांस सुव्यवस्थित राखण्याची व प्रसंगीं शासन करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते.