प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

परदेशीं जाणार्‍यांचें वर्गीकरण.-  परदेशीं आपले जे लोक जातात त्यांचें वर्गीकरण सामान्यतः येणेंप्रमाणेः-

(१) बरेचसे लोक लास्कर किंवा आगवाले म्हणून बोटींवर राहिलेले असतात. बोटी निरनिराळ्या देशांत जातात त्यांबरोबर जिकडे जातील तिकडे ते जातात. यांपैकीं बहुतेक लोक बोटीबरोबरच परत येतात. तथापि परदेशाचे अधिक किफायतीचे मजुरीचे दर आणि विदेशांत गेल्यावर तेथील वस्तुस्थितीसंबंधानें जिज्ञासा या दोन कारणांमुळें काम सोडून लास्कर पुष्कळदां फरारी होतो असे कांहीं लोक अमेरिकेंत किंवा इंग्लंडांत वारंवार भ्रमण करतांना दृष्टीस पडतात.

(२) एतद्देशीय कांहीं स्त्रिया आया किंवा दाया म्हणून इंग्लंडमध्यें गेलेल्या दृष्टीस पडतात. शिवाय आपले जुने नोकर कित्येकदां इंग्रज घेऊन जातात. यामुळें कधीं कधीं लंडनमध्यें असलीं माणसें दृष्टीस पडतात. बेकार आया आणि लास्कर यांच्या मदतीसाठीं एक गृह आंग्लो-इंडियन लोकांनीं लंडनच्या परिकरांत स्थापन केलें आहे.

(३) कांहीं हिंदुस्थानचे लोक जेथें कोणी पाहिले नसतील तेथें त्यांचें प्रदर्शन करण्यासाठीं प्रदर्शनें करणारे लोक घेऊन जातात.

(४) पारीसमध्यें कांही हिंदुस्थानच्या स्त्रिया वेश्यावृत्तीनें राहिल्या होत्या असें कळतें. त्या तेथें कशा गेल्याहें समजत नाहीं.

(५) या वरच्या प्रकारच्या माणसांपेक्षां भिन्न असा वर्ग म्हणजे विद्यार्थ्यांचा वर्ग होय. यांचा भरणा इंग्लंडमध्यें विशेष असतो. अमेरिका, फ्रान्स व जर्मनी इकडे त्यांचा मोर्चा कमी वळतो. इटाली आणि रशिया येथील विद्यापीठांत तयार होऊन आलेले लोक अवलोकनांत नाहींत. इंग्लंडमध्यें विद्यार्थ्यांची संख्या दोन हजारांच्या आंत बाहेर आहे. अमेरिकेंत ती अजमासें २०० पेक्षां कमी असावी. युरोपांतील फ्रान्स आणि जर्मनी या देशांत कांहीं संख्या आहे. कांहीं विद्यार्थीं जपानांतहि जातात. इटाली, रशिया, चीन येथील विद्यापिठांकडे आपल्या विद्यार्थ्यांचे लक्ष गेलें नाहीं.

(६) जेथें आपल्या लोकांची वस्ती पुष्कळ आहे अशा ठिकाणीं अनेक धंद्यांत लोक आढळतात. अशा प्रकारचीं ठिकाणें म्हटली म्हणजे ब्रह्मदेश, आफ्रिका, वेस्ट इंडिया, मादागास्कर वगैरे भाग होत.

(७) व्यापारी म्हणून बाहेर जाणारे आपले लोक आहेत, त्यांत सिंधी लोकांचा भरणा विशेष आहे. ब्रेझील, युनायटेड स्टेट्स्, इंग्लंड, फ्रान्स वगैरे देशांतील मुख्य शहरांत हेच आढळतात. तसेंच एडन, पोर्टसय्यद वगैरे बंदरांतहि दिसतात. तार्तरींत हे गेलेच आहेत. व्यापारी या दृष्टीनें यांचें महत्त्व मोठें आहे. या लोकांस मुंबईस अज्ञानामुळें मुलतानी म्हणतात.

(८) गुजराथी लोकांपैकीं मोत्यांचा व्यापार करणारे लोक पारिसमध्यें आहेत त्यांत जैनांचा भरणा विशेष आहे. पुरुष, स्त्रिया व परिचारक मिळून यांची संख्या २५० वर असावी.

(९) मतप्रसार करण्यासाठीं कित्येक संन्यासी किंवा इतर माणसें तुरळक अमेरिकेंत व यूरोपांत दिसतात. अमेरिकेंतील चढाओढीमध्यें ज्यांस यश येत नाहीं असे हिंदुस्थानातील तिकडे गेलेले कांहीं लोक भविष्य किंवा ज्योतिष सांगणें यासारख्या संशयास्पद धंद्याकडे वहावतात. कित्येक सुशिक्षित व्याख्यानें देतात, लेख लिहितात आणि कसातरी गुजारा करतात.

(१०) या सर्वांपेक्षां अधिक वर्ग मजुरांचाच होय.

परदेशगमनाचा प्रश्न आजच्या नव्या मनूंत अत्यंत महत्वाचा असल्यानें या प्रश्नासंबंधाची येथवर दिलेली फोड व माहिती अपुरी वाटते. आणि म्हणून तिच्यांत भर टाकण्यासाठीं एका उपयुक्त सांवत्सरिक ग्रंथांतील* एतद्विषयक माहिती उद्धृत करून नंतर या प्रश्नासंबंधानें आणखी कांहीं पृथक्करणात्मक विचार ग्रथित करूं.