प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन-आफ्रिका आणि अमेरिका येथील वसाहती.
ब्रिटिश पूर्वआफ्रिका.- ब्रिटिश पूर्व आफ्रिकेंत १९१२ सालीं तेथील सरकारनें देश्येतर रहिवाशांवर वार्षिक रु. २५ ची डोईपट्टी बसविण्याचें बिल कायदेमंडळापुढें आणलें. {kosh “Indians in East Africa’ by the Hon. Mr. Jeevanjee-I. R. 1912.}*{/kosh}
या कायदेमंडळांत यूरोपीय रहिवाशांचे प्रतिनिधी नव्हते म्हणून प्रतिनिधि नाहीं तर करनिधि नाहीं अथवा कारभार नाहीं तर करभार नाहीं या तत्त्वानुसार यूरोपीयांनीं या बिलाला विरोध केला.
हिंदी लोकांनांहि या मंडळांत अर्थातच जागा नव्हत्या म्हणून हिंदी लोकांनीहि सदरील बिलाला विरोध केला. परंतु हिंदी लोकांच्या विरोधाचें दुसरें जबरदस्त कारण, जें यूरोपीयांनां लागू नव्हतें तें दारिद्य्र हें होय. यूरोपीय धनाढ्य असून त्यांची शिरगणती अजमासें २०००, तर हिंदी धनहीन भुकेबंगाल असून त्यांची शिरगणती अजमासें २५०००, अशी स्थिति होती. हिंदी लोक फार तर रु.४५ पावेतों दरमहा मिळवूं शकत. परंतु सामान्यतः बहुतेक लोकांची कमाई रु. २० ते रु. २५ इतकीच होती. या लोकांनां रु. १५ वार्षिक डोईपट्टी म्हणजे एक ओझेंच होतें हें कळणें अवघड नाहीं.
कायदेमंडळांत प्रतिनिधि पाठविण्याचा हक्क नाहीं, व दरिद्य्र अतिशय, या दोन मुद्यांखेरीज तिसरा जो मुद्दा हिंदी लोकांनीं पुढें मांडला तो हा कीं, यूरोपीय लोकांनां ज्या नानाविध सवलती व हक्क पूर्व आफ्रिकेंत भोगावयास मिळत होते त्यांचा केवळ अगदीं लहानसा अंश हिंदी लोकांच्या वांट्यास आलेला होता. पैसे घेण्याच्या वेळीं यूरोपीय व हिंदी यांजकडे समदृष्टीनें पाहणें व हक्क-सवलती देण्याच्या वेळीं समदृष्टी विसरून जाणें हें सरकारचें धोरण गैरशिस्त आहे या गोष्टीची जाणीव हिंदी लोकांनां आपल्या बिलविरोधक अर्जांत दाखविली होती. पूर्व आफ्रिकेंत काळा-गोरा या वर्ण-भेदांचें बंड फारच होतें व आहे, व या वर्णमूलक भेदामुळें आणि एकंदरीनें यूरोपीय व तदितर यांनां आपले-परके या नात्यानें वागविण्याच्य धोरणामुळें हिंदी लोकांनां या भागांत फारच हाल काढावे लागत होते व आहेत.
[ पूर्व आफ्रिकेचा नमुना आपण पाहिला. आतां दक्षिण आफ्रिकेकडे वळूं. जुलमाची स्थिती सर्वत्र जवळजवळ सारखीच आहे. हिंदी लोकांकडून कोठें कमी प्रतिकार होतो. कोठें अधिक होतो, एवढाच काय तो फरक. जेथें म्हणून स्वतंत्र वृत्तीच्या हिंदी जनतेचें अस्तित्व आहे तेथें पाश्चात्त्यांशीं स्पर्धा आहे. एका वर्गाच्या हतांत राजकीय अधिकारची तरवार द्यावयाची आणि दुसर्यास निःशस्त्र ठेवावयाचें या प्रकारच्या स्पर्धामूलक व्यवस्थेमुळें दक्षिण आफ्रिकेत जो लढा उत्पन्न झाला त्याचा इतिहास मननीय आहे तो थोजक्यांत येणेंप्रमाणेः-]