प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन-आफ्रिका आणि अमेरिका येथील वसाहती.

फिजी बेटांतील स्वतंत्र हिंदी लोक.- हिंदी इसमाला फिजीबेटांत स्वतंत्र सोडला तर तो स्वतःची सोय चांगली लावूं शकतो. मुदतबंदीच्या नोकरीचीं पांच वर्षें संपल्यावर स्वखुषीनें पुन्हा नोकरींत शिरणारे मजूर शेंकडा पांचपेक्षांहि कमी सांपडतात, ही लक्षांत घेण्यासारखी गोष्ट आहे. ते लोक थोडी फार जमीन खंडानें स्वतंत्र लागवडीस घेतात आणि दुसरा हरएक धंदा करतात. आणि त्याचा परिणाम काय होतो ? मि० बर्टन यांनीं म्हटलें आहे कीं, “फिजीबेटांतील सुमारें २५००० स्वतंत्र हिंदी लोक हे तेथील लोकसमाजाचा एक महत्त्वाचा भाग होत. १९०७ मध्यें हिंदी लोकांनां पुढीलप्रमाणें धंदे करण्यास परवाने देण्यांत आले होतेः- किराण्याचीं दुकानें ९८१; फेरीवाले ५३२; रोटीवाले ६; किराणामालाच्या वखारी २३; होडीवाले ११२. सरकारी रिपोर्ट अगदीं अपुरें आहेत तरी त्यांत स्वतंत्र शेतकी करणार्‍या हिंदी लोकांविषयीं पुढील आंकडे सांपडतात. ऊंस ५,५८० एकर; केळीं २,०००; मका १,१५८; वाटाणे १०७; भात ९,३४७. एकंदर सर्व शेतीचे प्रकार हिशोबांत घेतल्यास सुमारें २०,००० एकर लागवड भरेल असें दिसतें. यापेक्षांहि जास्त जमीन गुरचराईकडे असून फिजीमधील बहुतेक गुरें हिंदी लोकांच्यांच मालकीची आहेत. फिजींतील ब्यांकांमध्यें ५०,००० पौंडावर ठेव हिंदी लोकांची आहे, व ही रक्कम तेथील हिंदी समाजाच्या संपत्तीचा एक अंश मात्र आहे. ह्या स्वतंत्र हिंदी लोकांत मृत्यूचें प्रमाण अल्प असून जननाचें प्रमाण (स्त्रियांची अल्पसंख्या लक्षांत घेतां) बरेंच मोठें आहे.”

हे हिंदीलोक प्रत्येक दिशेनें फिजी बेट व्यापीत चालले असून कित्येक जिल्ह्यांत त्यांची संख्या आजच फिजी लोकांपेक्षां अधिक झालेली आहे. हे हिंदी लोक मूळच्या फिजी लोकांपासून जमिनी विकत घेऊन किंवा खंडानें घेऊन त्यांनां हळूहळू मागें टाकीत चालले आहेत, आणि विशेषतः नदीकांठच्या व सडकेच्या कडेच्या बहुतेक जमिनी त्यांच्या हातांत गेल्या आहेत. फिजी बेटांचें एकंदर स्वरूपच ते बदलून टाकीत आहेत. तुम्हीं कोठेंहि जा, त्यांनीं कसलेली शेतजमीन आढळतेच. उदाहरणार्थ, सुवापासून नौसोरीपर्यंत कोणी प्रवास करीत तर त्यास त्या बारामैलांत एकहि फिजी लोकांनीं भरलेलें खेडें आढळणार नाहीं. जिकडे तिकडे हिंदी लोकांचा भरणा दृष्टीस पडेल.”  बर्टन साहेबांच्या मतें फिजीबेट हें हिंदी लोकांचीच एक वसाहत होण्याच्या पंथास लागलेलें आहे. तें कसेंहि असलें तरी फिजीची सोय हिंदी लोकांनां कोणत्याहि दृष्टीनें ‘स्वस्त’ पडत नाहीं हें मात्र खरें.

फिजी येथील कौन्सिलमध्यें दोन प्रतिनिधि पाठविण्याचा हक्क तेथील हिंदी लोकांस मिळाला आहे.