प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

ब्रिटिश बेटांतील हिंदी लोक.- हिंदुस्थानांतून इंग्लंडांत व्यापाराकरितां जाण्याचा प्रथम उपक्रम पारशी मंडळीनें कामा आणि कंपनीमधील दादाभाई नौरोजी व इतर कित्येक मंडळी यांच्या द्वारा केला, त्या गोष्टीला आज ६० वर्षें होऊन गेलीं आहेत. बरेच हिंदू व मुसुलमान धंदेवाले लोक आज इंग्लंडांत कायमचे राहिलेले आहेत, तरी या बाबतींतलें आपलें पुढारीपण पारशी ज्ञातीनें अद्याप कायम ठेविलेलें आहे. दुसर्‍या धंद्यांतूनहि म्हणजे   वैद्यक, बॅरिस्टर, सॉलिसिटर, वगैरे धंद्यांतहि हिंदुस्थानी लोक लंडन व इतर ठिकाणीं आहेत. भारतमंत्र्यांच्या कौन्सिलांत तीन हिंदी गृहस्थ आहेत. १९१९ या वर्षीं तर लॉर्ड सिंह यांच्यामुळें हिंदी लोकांनां आजपर्यन्त कधीं न मिळालेला विलायत सरकाराच्या राज्यकारभारांत शिरण्याचा व उमरावपदाला चढण्याचा मान मिळाला. या शतकाच्या आरंभापासून इंग्लंडांत कायम वस्ती करून  राहण्याकडे हिंदी लोकांचा कल होऊं लागला आहे. या वर्गांत विशेषतः पेनशनर्स (मुख्यत्वें वैद्यकीच्या खात्यांतील) व व्यापारी वर्गांतल लोक येतात. यांनां इंग्लंजडांत रहाणें बरें वाटतें म्हणून म्हणा किंवा त्यांच्या मुलांनां इंग्लंडांत शिक्षण देण्याची त्यांची इच्छा असते म्हणून म्हणा, हिंदुस्थान सोडून हे लोक जे इंगलंडांत जातात ते बहुधा कायमचेच जातात. हिंदुस्थानांतून उन्हाळ्यांत जे लोक तिकडे जातात त्यांच्यांत बरेचसे श्रीमान् लोक असतात. महायुद्धाच्या पहिल्या वर्षीं फ्रान्समधील हिंदी सैन्य पूर्वेकडील प्रदेशांत नेण्यापूर्वीं आमच्या हिंदी शूर शिपायांपैकीं हजारो जखमी लोक शुश्रूषेसाठीं उत्तम तर्‍हेची व्यवस्था व उत्तम सोयी असलेल्या हिंदी इस्पितळांत येत. हीं इस्पितळें कांहीं हँम्पशायरमध्यें होतीं. पण बहुतेक ब्रायटनमध्यें होतीं. ब्रायटनमध्यें एक हिंदू लोकांचें स्मारक होत आहे. सन १९१९ सालच्या हिंदुस्थानच्या राज्यकारभारासंबंधाच्या बिलावर जाइंट कमिटिनें ज्या साक्षी घेतल्या त्यांच्या सम्बधानें हिंदुस्थानांतले बरेचसे मुख्य मुख्य राजकीय पुढारी कांहीं महिने इंग्लंडांत गेले होते.