प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

परदेशगतांची संख्या.- हिंदुस्थानचे लोक परदेशगमनाच्या, विशेषतः समुद्रोल्लंघनाच्या विरुद्ध आहेत. तथापि, मजुरी करण्याकरितां, दुकानें घालण्यासाठीं, अगर दुसर्‍या कांहींतरी धंद्यासाठीं म्हणून शेंकडों किंबहुना हजारों हिंदू लोक इतर देशांत जाऊन राहिलेले आहेत. हिंदी साम्राज्याच्या लोकसंख्येच्या मानानें पाहतां अशा लोकांची संख्या अगदींच अल्प म्हणजे सुमारें वीस लक्ष आहे. साम्राज्याच्या लोकसंख्येच्या मानानें पाहतां अशा लोकांची संख्या अगदींच अल्प म्हणजे सुमारें वीस लक्ष आहे. साम्राज्याच्या लोकसंख्येच्या मानानें ही संख्या जरी डोळ्यांत भरण्यासारखी नसली तरी अगदींच क्षुल्लक म्हणून दुर्लक्ष करण्याइतकी ती थोडीहि नाहीं. म्हणूनच, मुदतबंदीचे मजूर म्हणून कोठल्याहि स्वतंत्र देशांत राहणार्‍या हिंदी लोकांच्या सामाजिक किंवा राजकीय प्रश्नांमुळें एक प्रकारचें महत्त्व या लोकसंख्येस आलेलें आहे.