प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन-आफ्रिका आणि अमेरिका येथील वसाहती.

दक्षिण आफ्रिका.- १९१४ पूर्वीं २० वर्षांपासून-अथाव त्याचेहि पूर्वींपासून म्हटलें तरी चालेल-दक्षिण आफ्रिकेंतील हिंदी लोक आपल्या छळाची कहाणी अर्जांच्या द्वारा सांगत आले व छळाचें जोखड हलकें व्हावें अशी प्रार्थना करीत आले. परंतु या सर्व याचनांनां एकच उत्तर सरकारकडून मिळत गेलें  व तें उत्तर म्हणजे अधिक छळ हें होय. “बहुतेक सर्वच ब्रिटिश वसाहतींतून ब्रिटिश प्रजाभूत हिंदी लोकांच्या विरुद्ध असे कायदे गेल्या थोड्या काळांत केले गेले आहेत कीं, त्यांच्या योगानें हिंदी लोकांची अब्रू व माणुसकी मातींत गेली आहे व ब्रिटिश प्रजाजन या नात्यानें जो त्यांचा दर्जा त्याला काळिमा आली आहे असें गाडफ्रे म्हणतो.” {kosh The struggle in South Africa’ by Mr. J.W. Godfrey, Bar-at-law, Dundee, Natal.- I. R. Jan. 1914.}*{/kosh}

हिंदी लोकांनां कःपदार्थ करणारे कायदे करण्याच्या कामांत सर्व वसाहतींत दक्षिण आफ्रिकेनें पहिला नंबर घेतलेला आहे आणि या मुळेंच या ठिकाणीं हिंदी लोकांनीं सत्याग्रहाच्या चळवळीचा स्वीकार केला. दक्षिण आफ्रिकावाल्यांचें धोरण त्यांच्या कायदे-कर्तबगारीवरून स्पष्ट दिसतें तें हें कीं, हिंदी लोकांविरुद्ध एकापेक्षां एक छळवादी कायदे करून त्यांनां सळो कीं पळो करून सोडावयाचें आणि नको ही आफ्रिका म्हणून पळून जावयास लावावयाचें व हें न साधेल तर कायदेशीर जबरदस्तीनें घालवून द्यावयाचें. आफ्रिका देश हा हिंदी लोकांनीं आपल्या पराकाष्ठेच्या चिकाटीच्या मेहनतीनें यूरोपीयांनां वसतियोग्य करून दिला ही गोष्ट लक्षांत ठेवणें जरूर आहे व या आफ्रिकेला तेथें वसती करून राहिलेले हिंदी लोक आपला देश समजतात हेंहि विसरतां कामा नये. अशा स्थितींत त्यांच्या विरुद्ध छळवादी कायदे सारखे तयार होणें व या कायद्यांच्या विरुद्ध केलेल्या तक्रारींचा व प्रार्थनांचा परिणाम फक्त अधिक कठोर कायदे सरकारकडून निर्माण होण्यांत होणें हें गोरे लोक आपला स्वार्थसाधण्यासाठीं कोणत्या प्रकारें सरकारी सत्तेचा उपयोग करून घेतात त्याचें उत्तम द्योतक आहे. असो.