प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती
जर्मन शिष्य.- जर्मन पूर्वआफ्रिकेंतहि ब्रिटिश उदाहरणाचा परिणाम व्हावयाचा तोच झाला. बोअर युद्धानंतर ट्रान्सवालचे कांहीं बोअर लोक नैरोबी (ब्रि० पू० आफ्रिका ) जिल्ह्यांत गेले व तेथें त्यांनीं आपलें वर्णद्वेषाचें खूळ तेथील गोर्या लोकांनां शिकविलें. नैरोबींत सारे २००० गोरे, हिंदी हजारों व नेटीव बेहिसाब. असें असून ब्रिटिश पूर्व आफ्रिका हा ‘गोरा देश’ राहिला पाहिजे असें धोरण नैरोबी जिल्ह्यांत तेथींल गोर्यानीं ठरवून टाकलें, व तदनुरूप गौरेतरांचा छळ सुरू केला. हें ब्रिटिश उदाहरण जर्मनांच्या पथ्यावर पडलें. ब्रिटिश पूर्व आफ्रिका व झांझिबार येथील हिंदी लोकांपेक्षां जर्मन आफ्रिकेंतील हिंदी लोकांची स्थिति थोड्या दिवसांपूर्वी नांव घेण्यासारखी चांगली होती. हेर डर्नबर्ग हा जर्मन वसाहतसेक्रेटरी असतांना जर्मन वसाहतींत हिंदी व्यापारी हे फार उपयोगी नागरिक आहेत आणि वसाहतीची आर्थिक उन्नति करावयाच्या कामीं या हिंदी नागरिकांच्या कडून फार महत्वाची मदत होईल असें या सेक्रेटरींनीं जाहीरपणें म्हटलें होतें व या मतानुसार हिंदी लोकांनां वागविण्याची पद्धतीहि जर्मन प्रदेशांत उदारपणाची होती. परंतु हा उदारपणा ब्रिटिश उदाहरणानें लयास गेला. ट्रान्सवालनें भारतीयविरोधी रेजिस्ट्रेशन व इमिग्रेशन कायदे पास केल्यावर जर्मन पूर्व आफ्रिकेंत ट्रान्सवालच्या धर्तीवर कायदे पास करण्याची चळवळ झाली, परंतु त्यावेळीं वसाहतसेक्रेटरी व्यापारी दृष्टीचा पक्का असल्यामुळें सदरील चळवळीला यश आलें नाहीं. पुढें १९१२ सालीं ब्रिटिश उदाहरणें पुढें करून जनरल लायबर्ट यांनीं रायस्टॅगमध्यें हिंदी लोकांनां जर्मन पू० आफ्रिकेंत मज्जाव करणारी योजना पुढें आणली. या प्रसंगीं वसाहतीचे प्रधान डॉ. सोल्क म्हणाले कीं, हिंदी लोक जर्मन आफ्रिकेंतून नाहींसे होतील तर चांगलें असें मत जर्मन आफ्रिकेंत आहे खरें, परंतु जर्मनांचा त्या प्रदेशावर कबजा होण्यापूर्वीं कित्येक वर्षें हजारों हिंदी लोक तेथें वस्ती करून राहिले होते, यामुळें त्यांनां तेथून एकदम हांकलून लावणें अशक्य आहे. डॉ. सोल्फ यांच्या या उत्तरांत ब्रिटिश उदाहरण जर्मनांचा उदारपणा नाहींसा करण्याच्या कामीं कसें यशस्वी झालें हें स्पष्ट झालें आहे.
सामान्यतः स्वच्छेनें विदेशवास करणारांची ही हकीकत झाली. आतां करारबंदीनें विदेशवास पत्करणारांची हकीकत पाहूं.