प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन-आफ्रिका आणि अमेरिका येथील वसाहती.
करारबंद मजूरपद्धति.- ब्रिटिश वसाहतींत हिंदी लोकांनां वाईट रीतीनें वागविण्यांत येतें, याबद्दल बराच वादविवाद झालेला आहे. ज्या करारबंदीच्या मजूरपद्धतीमुळें हिंदी लोकांनां अशा प्रकारें वागविण्यांत येत असे त्या पद्धतीचें स्वरूप कोणत्या प्रकारचें आहे हें समजून घेणें इष्ट आहे. “करारबंद मजूर” पाठविण्याची पद्धति जरी बंद झाली तरी कोणत्या पद्धतीमुळें लाखों भारतीय परदेशीं गेले तिचें स्वरूप स्पष्टपणें लक्षांत असणें उपयुक्त आहे. हिंदुस्थानांतील व निरनिराळ्या वसाहतींतील केवळ कायद्याच्या आधारानें ही माहिती जुळविली आहे. कायद्यांची अंमलबजावणी कशी होते हा प्रश्न निराळा आहे.
ही पद्धति समजून घेण्यासाठीं हिंदुस्थानांतील व वसाहतींतील कायदे व चालीरीती यांचा विचार केला पाहिजे. त्रिनिदाद व ब्रिटिश गियाना येथील करारबंदी मजुरीच्या व्यवस्थेंचें निरिक्षण केलें असतां, सर्व ब्रिटिश वसाहतींचे ठोकळ मानानें निरिक्षण केल्यासारखें होईल. क्षुल्लक गोष्टींत कांहीं फरक असला तरी एकंदर व्यवस्था एकसारखीच आहे.
सर्व ब्रिटिश वसाहती, फ्रेंच वसाहती व नेदरलंडच्या वसाहती, या ठिकाणची करारबंद मजूर-पद्धत कायदेशील असून इतरत्र करारबंदीनें मजूर नेणें गैरकायदा आहे असें हिंदुस्थान सरकारनें ठरविलें आहे. उपरिनिर्दिष्ट वसाहतींपैकीं कोणत्याहि वसाहतीला हिंदी मजुरांची गरज लागल्यास, ती वसाहत हिंदुस्थानांत आपले गुमास्ते पाठविते. वसाहतींत जाण्याकरितां किती मजुरांची मनें या गुमास्तानें वळविलीं यावर याचा पगार अवलंबून न ठेवितां, वसाहतवाल्यांनीं आपल्या गुमास्तांनां ठरीव पगार द्यावा असा हिंदुस्थानांत कायदा आहे. हे गुमास्ते आपलें काम कांहीं लोकांच्या मध्यस्थीनें करितात; या मध्यस्थांस ‘रिक्रूटर’ असें म्हणतात.
करारबद्ध मजुरांनां फक्त मुंबई, मद्रास व कलकत्ता या बंदरांतूनच वसाहतींत कायदेशीरपणें नेतां येतें. या तीन बंदरांत या लोकांचें संरक्षण करण्यासाठीं, व यांची आरोग्यदृष्ट्या तपासणी करण्यासाठीं स्थानिक सरकार कांहीं लोक नेमितें, त्यांनां संरक्षक व तपासणी डॉक्टर असें म्हणतात. सर्व विदेशगामी लोकांचें संरक्षण करून त्यांनां माहिती पुरवणें व सल्ला देणें हें या संरक्षकांचें काम आहे. तसेंच परदेशगमनासंबंधाचा कायदा पाळला जात आहे किंवा नाहीं हें पहाणें व वसाहतींतून जे मजूर लोक परत येतात त्यांनां प्रवासांत व वसाहतींत कसें वागविण्यांत आलें याची चौकशी करून स्थानिक सरकारला कळविणें हें त्यांचें काम आहे.
गुमास्त्याला मजूर मिळवून देण्यासाठीं जे लोक काम करितात त्यांनां वर सांगितलेल्या संरक्षकापासून परवाना मिळवावा लागतो. हा परवाना मिळाल्याशिवाय कोणालाहि मजुराशीं करार करण्याची मनाई आहे. रिक्रूटर लोकांचें वर्तन कसें आहे तें पाहून परवाना नाकारण्याचा व रद्द करण्याचा अधिकार या संरक्षकांनां असतो.
पोलीस कामगार किंवा मॅजिस्ट्रेट मागतील तेव्हां या रिक्रूटरनां आपला परवाना त्यांनां दाखवावा लागतो. करारनाम्याच्या अटींचा मसुदा त्या गुमास्त्यापासून रिक्रूटरला मिळतो. हा मसुदा इंग्लिशमध्यें व ज्या ठिकाणचे मजूर न्यावयाचे असतील त्या ठिकाणच्या देश्यभाषेंत असला पाहिजे, व पोलिस कामगार व न्यायखात्यांतील कामगार यांनां तो मसुदा दाखविला पाहिजे असा कायदा आहे. परदेशगमनाबद्दल ज्या मनुष्याचें मन रिक्रूटर वळवीत असेल त्या मनुष्याला करारनाम्याची अस्सल प्रत त्यानें दिली पाहिजे. नोंद करितेवेळीं व बंदरांत गेल्यावर त्यानें त्या विदेशगामी लोकांची राहण्याची वगैरे नीट व्यवस्था केली पाहिजे. विदेशगामी लोकांचे डेपो सरकारी वैद्यांकडून तपासले जातात. या लोकांची नोंदणी झाल्यावर त्यांनां डेपोंत नेतात; व ते तेथें आले म्हणजे डॉक्टर लोक त्यांची तपासणी करितात.
अगदीं ऐन वेळींहि परदेशांत जाण्याचें या लोकांनां नाकारितां येतें, त्यांच्यावर सक्ती करितां येत नाहीं. तथापि करारनामा झाल्यावर झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्याबद्दल त्यांच्यावर फिर्याद लावितां येते. या लोकांनां नेणार्या जहाजालाहि एक विशिष्ट परवाना काढावा लागतो. प्रत्येक मनुष्याला निदान ७२ घन फूट जागा, इस्पितळासाठीं निराळी जागा व स्त्रियांसाठीं निराळी जागा याप्रमाणें व्यवस्था त्या जहाजावर केली पाहिजे असा कायदा आहे. हे सर्व नियम मान्य केल्याशिवाय परवाना मिळत नाहीं. सर्व प्रवाशांची अन्नसाग्रीची तजवीज जहाजावर केलेली पाहिजे व त्यांचेसाठीं एक कुशल शस्त्रवैद्यहि जहाजावर असला पाहिजे. विदेशगामी लोकांच्या संरक्षकाला त्याच्या कामांत गुमास्त्यानें सर्व प्रकारची मदत केली पाहिजे.
ज्या वसाहतींत हे मजूर जातात, त्या ठिकाणचे कायदे व पद्धति यांचा आतां विचार करूं. विदेशीय रहिवाश्यांच्या खात्यांतील मुख्य कामगार ब्रिटिश गियानामध्यें ‘इमिग्रेशन एजंट-जनरल’ असें म्हणतात. त्रिनिदाद वगैरे वसाहतीमध्यें या कामगाराला ‘विदेशीय रहिवाशांचा संरक्षक’ असें नांव आहे. या कामगाराची नेमणूक राजाकडून होते; व कायद्याची नीट अंमलबजावणी करण्याबद्दल हा कामगार त्या वसाहतीच्या गव्हर्नराला जबाबदार असतो. परदेशगमनासंबंधाच्या बाबतींत हा गव्हर्नरचा सेक्रेटरीहि असतो. परदेशांतून आलेल्या लोकांची राहण्याची व औषधपाण्याची व्यवस्था कशी आहे हें पहाण्यासाठीं, वाटेल त्यावेळीं वाटेल त्या वसाहतींत जाण्याचा या कामगाराला अधिकार आहे. वसाहतींतील विदेशीय रहिवासी व वसाहतवाले यांची एकमेकांविरुद्ध कांहीं तक्रार असल्यास, तिची चौकशी करून याला ती न्यायाधीसापुढें मांडतां येते; व तेथें योग्य निकाल मिळाला नाहीं असें याला वाटल्यास परदेशवासीयांच्या वतीनें त्याला अपीलहि करितां येतें. गव्हर्नरानें नेमिलेले सीनियर व जूनियर इमिग्रेशन एजंट हे त्याचे मदतनीस असतात. या खात्याचे निराळे डॉक्टर असून वाटेल त्या वसाहतींत जाण्याचा त्यांनां हक्क असतो.