प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन-आफ्रिका आणि अमेरिका येथील वसाहती.
आफ्रिका व अमेरिका या खंडांत आपली वसाहत स्थापन करण्याच्या कार्यास १९ व्या शतकाच्या पूर्वार्धांत सुरुवात झाली. अमेरिकेंत आपला पूर्वीं प्रवेश झाला होता असें पेरू येथील पांच राजपुत्रांच्या एका बायकोच्या गोष्टीवरून त्यांचा आणि पांडवांचा संबंध जोडून विधान करण्यांत येते. शिवाय नॅडिलॅगच्या पुस्तकामध्यें त्यानें मेक्झिकोमध्यें आढळलेल्या गणपतीसारख्या कांहीं मूर्तींचीं चित्रें छापिलीं आहेत त्यामुळें सुपीक डोक्याच्या पाश्चात्त्य व हिंदू मंडळींनां त्यावरहि तर्कटें रचण्यास बरीच जागा झाली आहे. त्यांच्या संबंधानें आम्ही येथें विचार करीत नाहीं. {kosh हिंदू लोक व अमेरिका - हिंदू लोकांनीं अमेरिकेंत ख्रिस्तशकारंभापूर्वीं तेराव्या शतकांत पाय ठेवला असावा, मिसिसिपीच्या खोर्यांत आसपासच्या क्षेत्रांत या लोकांनीं वसाहत केली असावी व ही वसाहत पुष्कळ भरभराटीस आली असावी इत्यादि तर्क कांहीं पुराणवस्तुसंशोधकांनीं केले आहेत. अशा प्रकारचे तर्क करणार्या पंडितांत अलेक्झांडर डेल मार, न्यूयॉर्कच्या लॅटीन अमेरिकन व्यापार-मंडळाचे एक जुने अध्यक्ष, हे प्रमुख आहेत. यांनीं या विषयासंबंधानें कांहीं वर्षापूर्वी इंडियन रिव्ह्यु मासिकांत (सप्टंबर १९१२) जो एक लेख लिहिला त्यांतील तर्कसाधनसामग्री व तर्क संक्षेपतः खालीं दिले आहेत.}*{/kosh} {kosh तर्कसाधनसमुदाय.- (१) मिसिसिपीच्या व तिला मिळणार्या नद्यांच्या खोर्यांत, सरोवरप्रदेशापासून तों मेक्सिकोच्या आखातापर्यंत असलेलीं मोठालीं मातीचीं कामेः (अ) लिटल मिआमी नदीपाशीं असलेली १० ते २५ फूट उंचीची व ४ मैल लांबीची अजस्त्र भिंत अथवा टेंकडी. (अशा प्रकारच्या लहानमोठ्या भिंती इतरत्रही आहेत.)
(आ) ओहिआमध्यें ब्रशक्रीकपाशीं असलेलें सर्पाकृति टेंकाड. याची लांबी १००० फुटांवर असून या सर्पाच्या तोंडांत असलेल्या अजस्त्र अंड्याचीं मापें १६०×८० फूट अशीं आहेत. (इ) पुष्कळ टेंकाडांत बुद्ध, कृष्ण यांसारख्या मूर्ती सांपडल्या आहेत. (ई) बिग टोको माउंड (टेनेसी) येथें १८८२ त सांपडलेली (शिरोविहीन ) बुद्धसदृश मूर्ति ज्या कूर्मपृष्ठावर कोरलेली आहे त्याजवर एक स्वस्तिक कृतीहि आहे. (उ) सोपो (न्यू ग्रॅनडा) येथील एका टेंकाडांत ४×२ १∕/२ (इंच) लांबीरूंदीची व १∕/२ इंच जाड अशी एक काळ्या रंगाची कठिण वीट सांपडली आहे. या विटेवर दोन्ही बाजूंनां कोरींव आकृती आहेत. या आकृती म्हणजे, द्वीमुखी पुरुष, बसकी टोपी घातलेला पुरुष, खालीं नजर केलेली स्त्री, साधु, बेडूक वगैरे आहेत. विटेच्या दोन्ही बाजूंवर एकेक पटाची आकृति आहे. या पटांत दोन मोठे सारखे खाने असून प्रत्येक खान्याचीं चार घरें केलीं आहेत व या प्रत्येक घराचे दोन सारखे भाग केले आहेत. (ऊ) सिनसिनाटी (ओहिओ) येथें एका टेंकाडांत १८४१ सालीं करड्या रंगाचा ८ इंच लांब ३/४ इंच जाड असा स्लेटीचा तुकडा सांपडला. या स्लेटपाटीवर मध्यभागीं आठ आकृती कोरल्या असून त्यांपैकीं एक चतुष्टय दुसर्या चतुष्यासारखें जवळजवळ दिसतें; आणि ही प्रत्येक आकृति कसली तरी गांठ दिलेल्या दोरीचें चित्र म्हणून काढलेली दिसते. पाटीच्या रुंदीच्या दोन्ही बाजूंनां आठ आठ तिरप्या रेघा मधील आकृतिअष्टकाच्या मर्यादारेषेला लागून काढलेल्या आहेत, व या रेघांच्यापुढें अगदीं टोंकाला चोवीस बारीक रेघा सरळ काढलेल्या आहेत. (ऋ) ब्राह्मणधर्माचीं सुस्पष्ट चिन्हें मेक्सिको, मध्य-अमेरिका, व दक्षिण-अमेरिका या प्रदेशांत जागजागीं सांपडतात( ?) (ॠ) कर्नल दु प्रे यांनीं केलेल्या आर्कान्ससमधील एका मोठ्या कालव्याचें (१५० मैल लांब १०० फूट रूंद) वर्णन वाचण्यासारखें आहे. ज्या लोकांची हीं टेंकाडें आहेत त्यांनींच हा कालवा बांधला असावा.}*{/kosh} {kosh (२) उत्तर आशियांत हिंदुस्थानांतील हिंदूंचे पूर्वज पूर्वकाळीं राहत होते. उत्तर आशियांत पंचांग-शिला सांपडतात व या शिलांचें वर्गीकरण पुराणवस्तुशास्त्रज्ञांनीं येणेंप्रमाणें केलें आहेः- (अ) अष्ट-मास वर्षाचें पंचांग शामन काळांतील, (आ) दश-मास पंचांग ब्राह्मण काळांतील, (इ) द्वादश-मास पंचांग कृष्ण किंवा बुद्ध यांच्या काळांतील. शामन काळानंतर ब्राह्मणकाळ, त्यानंतर बुद्ध (कृष्ण) काळ. शामन काळापूर्वीं जुनें २४ पक्षांचें चांद्र वर्ष प्रचारांत असे. शामन धर्म म्हणजे सूर्यपूजेचा धर्म. मंगोलियांत (उत्तर आशिया) हा संप्रदाय प्रचलित होता. या धर्माचा र्हास होऊन तेथें ब्राह्मणधर्माचा प्रसार (अथवा पुनःप्रसार म्हणतां येईल) झाला. महाभारतीय युद्धाचे काळांत उत्तर आशियांतील लोकसमाज त्या युद्धप्रसंगाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणामानें इतस्ततः विखरले व दूर दूर देशांत गेले. महाभारत-युद्ध इ. स. पू. १३।१४ वे शतकांत झालें. या काळानंतर लवकरच अथवा या काळाच्या सुमारास लोखंडाचा शोध उत्तर आशियांत लागला.}*{/kosh} {kosh अलेक्झांडर डेल मार यानें वर दिलेला (१) मधील दृश्य किंवा दृष्ट वस्तुसमूह व (२) मधील वस्तु-इतिहास व लोककथांवर इतर पंडितांनीं बसविलेल्या कल्पना, या सामग्रीच्या व इतर कांहीं गोष्टींच्या आधारानें ‘अमेरिकन माउंड बिल्डर’ (अमेरिकेंतील जुनीं मातीचीं टेंकडें बांधणारे लोक) कोण असावे यासंबंधानें विचार केला व कांहीं तर्क प्रकट केले ते येणेंप्रमाणेः- (अ) मिसिसिपी खोर्यांतील टेंकाडांची सूक्ष्म तपासणी करितां हीं टेकांडें बांधणारे लोक या प्रदेशांत एका काळीं जिकडे तिकडे पसरले असून त्यांची संख्या मोठी होती, त्यांचे सर्वांचे धर्म, राहणी व राज्यरीति एकच होतीं, ते अर्ध-संस्कृत होते व त्यांच्यानंतर हा प्रदेश व्यापणार्यांसारखे ते रानटी नव्हते, हें सिद्ध झालें आहे. (आ) या प्रदेशांतील नद्यांच्या जुन्या बांधीव तीरप्रदेशांची भूस्तरविषयक पाहणी करतां हें बांधकाम २।३ हजार वर्षांचें जुनें असावे असें ठरलें आहे. (इ) टेंकाडांतून हिंदू देवताच्यां मूर्तींसारख्या देवता-मूर्ती सांपडतात; सिनसिनाटीच्या पाटीवरील ज्या तिरप्या आठ आठ रेघा त्या अष्ट-मास-वाचक व ज्या चोवीस चोवीस लहान सरळ रेघा त्या २४ चांद्रपक्षांच्या वाचक व जीं मधील आठ ग्रन्थिचित्रें तीं मास-शब्दसूचक (मासदेवतासूचक ) आहेत किंवा असावींत असें ठरलें आहे. [टेंकाडें बांधणार्या नंतरचे पेरूविअन लोक, त्यांच्यांत सूत्रग्रन्थींनीं विचार-‘लेखन’ करीत असत, हिब्रु लोकांत पूजासमयीं ग्रन्थियुक्त शालींचा अशाच प्रकारें उपयोग होत असे. यावरून सिनसिनाटीच्या पाटीवरील ग्रन्थिचित्रें मास-शब्दसूचक असावींत असा तर्क आहे.] उत्तर आशियांत मंगोलियांत २४ चांद्रपक्षाच्या शामन-पूर्व पंचांगाचा व अष्ट-मास शामन पंचांगाचा अशा दोहोंचा प्रचार शामनधर्माच्या उत्तरकाळांत संभवतो. यावरून सूर्यपूजक शामन पंचांगकारानें सिनसिनाटीची पंचांगपाटी तयार केली असावी; मंगोलियांतून महाभारतयुध्दाचे सुमारास शामन हिंदू अमेरिकेंत मिसिसिपी प्रदेशांत गेले असावे, कारण या युद्धाचे सुमारास उत्तर आशियांतील लोकांची पांगापांग झाली हें अन्य पुराव्यावरून ठरलें आहे. महाभारत युद्ध इ. स. पू. सुमारें १३०० शे च्या सुमारास झालें असावें तेव्हां वरील (आ) सिद्धांत या (इ) मधील सिद्धांतास पुष्टीकारक आहे तसेंच (अ) सिद्धांतहि पुष्टिकारक आहे. वर (तर्क १ आ) मधील सर्प व अंडें सौरवर्षांचें प्रतीक दिसतें. तेव्हां तेंहि शामनांचें (सूर्यपूजकांचें) मिसिसिपी खोर्यांतील वास्तव्यच सिद्ध करतें. (ई) महाभारताच्या फार पूर्वीं अमेरिकेंत हिंदू लोक आले नसावे; कारण तसें असतें तर अमेरिकेंत फक्त शामन-पूर्वकालीन २४ चांद्र-पक्षांचे पंचांगच उपलब्ध झालें असतें; महाभारताच्यानंतर फार दिवसांनींहि हिंदूंचें अमेरिकेंत प्रयाण झालें नाहीं; कारण असें असतें तर उत्तर आशियांत यावेळीं जो लोखंडाचा शोध लागला होता त्या शोधाचा उपयोग अमेरिकेंतील टेंकाडें बांधणार्यांनीं केला असता. यांच्या टेंकाडांत लोखंडाचा त्यांनीं उपयोग केल्याचें मुळींच चिन्ह नाहीं. (उ) न्यू ग्रानाडा येथील वीट ही पंचांग-पाटीच असून अष्ट-मास वर्षाचीं चिन्हें तिजवर आहेत असें ठरलें आहे [ पंचांग-पाटीवरील पटाचे दोन मोठे भाग ते वर्षार्धदर्शक असून प्रत्येक वर्षार्धांत चार चार मास, प्रत्येक मासांत दोन पक्ष असी पटांतील घरांची वाचणी आहे. ताओ धर्मीयांचीं पांच अष्ट-मास पंचांगें पारिसच्या म्युझे गिमे या पदार्थसंग्रहालयांत आहेत; बाबिलोनचें एक अष्ट-मास पंचांग ब्रिटिश म्युझियममध्यें आहे.] तेव्हां सिनसिनाटी पाटी जुनी व ग्रानाडा पाटी अलीकडील असें यावरून होतें.
अलेक्झांडर डेल मार यानें उपलब्ध दृश्य व दृष्ट वस्तूंवरून व इतर पंडितांनीं बसविलेल्या तर्कांवरून विचार करून शामन हिंदू मिसिसिपी प्रदेशांत मंगोलियांतून आले असावे असा तर्क केला. तेव्हां ते आले असावे कोणत्या मार्गानें यासंबंधानेंहि कांहीं कल्पना करणें डेल मार यास जरूरीचें भासलें. या मार्गासंबंधानें शोध करतां १७५० मध्यें लुइसिआनामधील फ्रेंच मिशनर्यांनीं काढलेल्या एका मार्गाच्या शोधाची हकीकत डेल मार यास उपयोगाची वाटली व या हकिकतीचा आधार घेऊन यानें अशी कल्पना बसविली आहे कीं, वरील शामन लोक हे पासिफिक मार्गानें कोलंबिया नदीच्या मुखापाशीं येऊन या मुखानें कोंलबिया नदीच्या वाटेनें ते मिसिसिपी खोर्यांत आले असावे. तसेंच कोलंबिया नदीच्या मुखाप्रमाणें ब्रिटिश कोलंबिया, ऑरेगन कॅलिफोर्निया या संस्थानांतील पासिफिक किनार्यावरील कित्येक जागांचाहि शामन लोकांनीं अमेरिकेंत प्रवेश करण्याच्या कामीं उपयोग केला असावा, अशीहि, डेल मार याची कल्पना दिसते.
वर सांगितलेल्या फ्रेंच मिशनर्यांच्या शोधाची हकीकत अशीः पासिफिक किनार्यावरून तद्देशीय लोक लुइसिआनाकडे येतात तो मार्ग इतर मार्गांहून वेगळाच आहे असें या मिशनर्यांच्या कानीं आल्यावर यांनीं एक इंडिअन या मार्गाचा तपास लावण्याच्या कामीं योजिला. हा इंडियन नेटिवांच्या मार्गाचा माग काढीत मिसूरी व कोलंबिया या नद्यांच्या बाजूनें समुद्रापर्यंत जाऊन पोहोंचला. कोलंबियाच्या मुखापाशीं त्याला एक शिडाचें जहाज आढळलें. या जहाजावरील लोकांनां लांब शेंड्या असून हे लांब शेंडीवाले लोक कोलंबिया नदीची वाळू धुण्याचें व त्यांतील सोन्याचे कण बाजूला काढण्याचें काम करीत असलेले त्यास दिसले.
डेल मार याचा यावरील तर्क असा कीं, हे लांब शेंडीवाले लोक चिनी किंवा मांचूरी असावे.
ब्रिटिश कोलंबिया, ऑरेगॉन, कॅलिफोर्निया यांच्या किनार्यावरहि जागजागीं वर सांगितलेल्या जहाजासारख्या जहाजांचे तुकडे सांपडतात.
हे तुकडे व वरील इंडिअनाची जहाजाची हकीकत यांजवर शामन लोकांच्या मोंगोलिया-मिसिसिपी प्रवासमार्गासंबंधीचा डेल मार याचा तर्क आधारलेला आहे, हें वर आलेंच आहे}*{/kosh}
तेथें भारतीयत्वाचा आज मागमूसहि नाहीं आणि तेथें आपण गेलों असता. आपल्याच रक्ताचीं हीं माणसें म्हणून आपलें स्वागत करण्यास पूर्वकालीनांच्या अस्तिव्तांत असलेल्या किंवा नसलेल्या वसाहतीचे वंशजहि कोणी नाहींत. म्हणून आपला त्या अमेरिकेंतील भागाशीं कांहींच संबंध १९ व्या शतकापूर्वीं नव्हता असें आपण धरून चालूं. आफ्रिकेशीं मात्र कांहीं संबंध पूर्वींपासून दिसत आहे; आणि कांहीं अंशीं तो एकसारखा चालू आहे. तथापि एक गोष्ट नवीन आहे ती ही कीं, व्यापारासाठीं परदेशीं जाणारे लोक थोडे असतात. हे लोक म्हणजे वसाहत करणारे नव्हत. व्यापारासाठीं जाणारी वस्ती म्हणजे तात्पुरती होय. शेतकरी बनतात ते जमिनीस अधिक चिकटतात. यासाठीं व्यापारप्रधान परदेशगमनापेक्षां कृषिप्रधान परदेशगमन अधिक महत्त्वाचें व अधिक विचार करण्याजोगें होय.
आतां अर्वाचीन परदेशगमनाचा इतिहास पहावयाचा. अर्वाचीन परदेशगमनामध्यें ज्या देशाकडे आपल्या लोकांचे पाय अधिक फिरतात किंवा पूर्वी फिरले आहेत, ते देश म्हणजे सिलोन, स्ट्रेट्स, सेटलमेंट्स, फेडरेटेड मलाया स्टेट्स, नाताळ, मॉरिशस, त्रिनिदाद, ब्रिटिश गियाना, फिजी, हे होत.
यांपैकीं स्ट्रेट्स सेटलमेन्ट्स आणि फिजी खेरीज करून प्रत्येक देशांत भारतीयांची संख्या एक लाखाहून अधिक आहे. या ठिकाणीं इतकी वस्ती होण्याचें कारण कराराने बांधून भारतीयांस इतरत्र नेण्याची पद्धति होय. या भारतीय परदेशगमनाचा इतिहास उष्ण प्रदेशांत आपलें भांडवल गुंतवूं इच्छिणार्या यूरोपांतील लोकांशीं निगडीत आहे. उष्ण प्रदेशांत व्यवहार करूं इच्छिणार्या भांडवलवाल्यांचीं यूरोपांत अनेक वृत्तपत्रें आहेत. त्यांत ‘वेस्ट इंडीज कमिटी सर्क्युलर’ आणि ‘ट्रापिकल लाइफ’ यांचीं नांवें हिंदुस्थानांत अधिक परिचित आहेत. परदेशगमन करणार्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठीं आणि त्यांची माहिती आपल्या देशांत पसरविण्यासाठीं ज्या चळवळी आपल्या देशांत उत्पन्न झाल्या त्यांचें निदर्शक मद्रासचें ‘इंडियन एमिग्रंट’ नावांचें एक मासिक प्रसिद्ध होत आहे. परदेशस्थ लोकांची माहिती पुरविण्याचें काम ‘मॉडर्न रिव्ह्यु’ हें मासिकहि चांगल्या तर्हेनें करीत असतें. मद्रासच्या ‘इंडीयन रिव्ह्यु’ चीहि कामगिरी विसरतां येण्याजोगी नाहीं. वर सांगितलेल्या ठिकाणींपैकी बर्याच ठिकाणीं भारतीयांची वस्ती करारानें बांधून नेलेल्या मजुरांमुळें झाली आहे, तरी सर्वच ठिकाणची प्रथमची वसाहत केवळ मजुरांमुळें उत्पन्न झालेली नव्हे. डार्विननें आपल्या जगाच्या प्रवासांत १८३९ सालीं मॉरिशस येथें मुक्काम केला असतां तेथें त्याला सुमारें १२०० हिंदू लोक आढळले. ते तेथें कैदी म्हणून पाठविले होते. तथापि ते कोणी हलके कैदी नसून इंग्रजी हुकुमास आपल्या धार्मिक समजुतीमुळें न जुमानणारे लोक होते; आणि त्यांच्या डोळ्यांत विलक्षण तेज चमकत होतें. त्यांची तुलना गुन्हेगार इंग्रजांशीं करणें अयोग्य आहे असें डार्विन म्हणतो. जे लोक नोकरीकरितां म्हणून दूर गेले ते सर्वच पोटाच्या आशेकरितां गेले असें म्हणवत नाहीं. सुमारें ५० वर्षांपूर्वीं चार्लस किंग्सले यानें वेस्ट इंडीजमध्यें जो प्रवास केला त्याचें वर्णन देणारा त्याचा ग्रंथ ‘वेस्टवर्ड हो’ (Westward Ho) म्हणून आहे. त्या ग्रंथांत पन्नास वर्षांपूर्वींच्या त्रिनिदाद येथील हिंदूंचें मोठें हृदयंगम वर्णन आलें आहे. त्यांत तो म्हणतो कीं, सत्तावन सालच्या बंडांत इंग्रजाविरुद्ध शस्त्र उचललेले अनेक शिपाईबाण्याचे लोक आपलें अनिष्ट भवितव्य चुकविण्यासाठीं निसटून त्रिनिदाद येथें आले आहेत. ब्रिटिश गियाना येथील हिंदूंच्या वसाहतीसंबंधानें आणखी माहिती देणारीं पुस्तकें म्हटली म्हणजे रॉडवेकृत ‘ब्रिटिश गियानाचा इतिहास’, हेनरि कर्ककृत तेथील अनुभवांचें पुस्तक आणि त्यापेक्षांहि जास्त मनोरम आणि विस्तृत माहिती देणारें ब्राँकहर्स्टचें पुस्तक होय. ब्राँकहर्स्टनें तद्देशस्थ हिंदूंची जितकी विविध माहिती दिली आहे तितकी दुसर्या कोणत्याहि ग्रंथकारानें दिली नाहीं. त्यांत त्यानें ज्या अनेक जातींचें वर्णन केलें आहे, त्यावरून असें दिसतें कीं तेथें ब्राह्मणहि पुष्कळ होते, तथापि त्या ब्राह्मण म्हणविणारांपैकीं अनेक ठिकाणचे लोक ब्राह्मण नसावेत अशी कल्पना करण्यास पुष्कळ जागा त्यानेंच उत्पन्न करून दिली आहे. ब्राँकहर्स्ट म्हणतो, सेंट लुसिया बेटांतील सर्वच हिंदूंनीं आपली जात ब्राह्मण म्हणून लिहून दिली आहे; आणि यावर तो असें उद्गारतो कीं सर्वच जर उपाध्ये तर सामान्य जन कोण ? तेथील लहान लहान दागिने करणार्या सोनारांचीं, निग्रो आणि क्रिओल पोरांनां चटक लावणार्या जिलब्या करणार्या हलवायांचीं, आपली जातच वैद्य म्हणून सांगणार्या लोकांचीं, लेखकाची नोकरी मिळविण्याची आकांक्षा करणार्या तथापि इंग्रजीच्या अज्ञानामुळें ज्यांचा उपयोग होत नाहीं अशा कायस्थांचीं, तसेंच आपल्या घटपटादि खटपट करण्याच्या शिक्षणपद्धतीनें आणि वादविवादपद्धतीनें ब्राँकहर्स्टसारख्या भोळ्या मिशनर्यास वादविवाद करून पंचाइतींत पाडणार्यांचीं वर्णनें ब्राँकहर्स्टच्या ग्रंथांत आलीं आहेत. नाताळ येथील आणि तसेंच मॉरिशस येथील हिंदुसमाजांचें वर्णन करणारे ग्रंथ दृष्टीस पडले नाहींत. तथापि सामान्य प्रवासवर्णानांत मधून मधून भारतीयांच्या स्थितींचीं सूचक वर्णनें किंवा उल्लेख येतात. असो.
वरील तुरळक उदाहरणें सोडून देतां हें निर्विवाद आहे कीं, या वसाहतींत हिंदुस्थानी लोकांचें संख्याबाहुल्य, एशियांतून “कूली” नेण्याच्या पद्धतीमुळें आहे; आणि भारतीयांची परदेशांतील दशा समजण्यास या कूलीपद्धतीचा थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे.