प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

इंग्रजांची करार-कर्तबगारी. - पैशाच्या पाठीमागे लागलेले इंग्रज लोक वसाहतीमध्यें हिंदी मजुरांचा किती प्रकारांनीं फाजील फायदा घेतात याचें एक उदाहरण म्हणून खालील हकीकत उपयोगी पडेल. १९०७ सालीं वेंग्वलामध्यें लोबिटो बेपासून काटांगापर्यंत रेल्वे बांधण्याच्या कामासाठीं पुरेसे मजूर ठेकेदार इंग्रजी कंपनीला न मिळाल्यानें या कंपनींने नेटलमधील करारमुक्त स्वतंत्र हिंदी मजुरांकडे नरज फेंकली. हे मजूर नांवाचे स्वतंत्र होते. नेटल सरकारनें जी वार्षिक तीन पौंडांची पट्टी ठेवली होती ती थकल्यानें आणि ही सरकारबाकी दिल्याखेरीज मजुराला कोणी काम देऊं नये असा कायदा असल्यानें मजूर लोक अडचणींत आलेले होते. तसेंच करारमुक्त झाल्याबरोबर हिंदुस्थानला जाणाराला जहाजाचें तिकिट जें फुकट मिळे तें पुष्कळ लोक वसाहतींतच करारमुक्ततेनंतर कालक्रमणा करून गमावून बसले होते. याप्रमाणें बेरोजगार मजुरांची नेटलमध्यें गर्दी झालेली होती. या मजुरांनां भरपुर पैशाची वगैरे लालुच दाखवून, साम्राज्यसरकार व हिंदुस्थानसरकार यांच्या अनुमतीनें नेटल गवर्मेंटच्या नजरेखालीं ठेकेदार कंपनीनें त्यांजशीं करारमदार करून दोन वर्षांच्या ठरावानें (या दोन वर्षांच्या आंत मजुरांनां नेटलमध्यें आणून सोडावयाचे असा ठराव होता) दोन हजारांवर मजूर लोबिटोबेकडे रवाना केले. या मजुरांनां फार निर्दयपणें वागविण्यांत येऊं लागलें. हा जुलूम हळू हळू सर्वांच्या कानांवर गेला. शेंकडों मजूर मृत्यूमुखीं पडल्याचें व शेंकडों परागंदा झाल्याचें वर्तमान सर्वश्रुत झालें.  वर्षभर कसाबसा हा रोजगार चालला व वर्षाच्या अंतीं ठेकेदार कंपनीनें करार धाब्यावर बसवून मजुरांनां कामावरून दूर केलें. कोणत्याहि सरकारानें या ठेकेदारांच्या अत्याचारांची चौकशी केली नाहीं. बेकार केलेले मजूर डर्बानपर्यंत आणले गेले. या वेळीं विदेशीयागमननिर्बंध खात्याच्या अधिकार्‍याला मोठी युक्ति सुचलि व ही युक्ति लढवून त्यानें नेटलमधून करारमुक्त हिंदी लोकांचा एक मोठ तांडाच्या तांडा घालवून लावला. सदरील युक्ति म्हणजे वरील ठेकेदार कंपनीशीं झालेल्या कराराचा गैरवाजवी अर्थ करून या अर्थाचा दुरुपयोग करणें ही होय. वसाहतींत करारमुक्तांची तीन वर्षें वसती झाल्यावर त्यांना नागरिकाचा वसतीचा हक्क मिळावयाचा व असा मनुष्य कोठें बाहेरदेशीं गेला तरी त्याला परत वसाहतींत येण्याचा हक्क आहे असा नेटलचा कायदा होता. लोबिटो वे येथें गेलेले मजूर तीन वर्षें त्यांची नेटलमध्यें वसति होण्यापूर्वींच त्या ठिकाणीं गेले असल्यानें नेटलमध्यें येण्याचा त्यांचा हक्क नाहीं असा सूक्ष्म डाव विदेशीयगमननिर्बंध खात्याच्या अधिकार्‍यानें लढविला. नेटल सरकारनें या मजुरांचीं मनें वळवून लोबिटो बेकडे जाण्याचा करार त्यांजकडून करविला होता, हे मजूर आपलीं बायकापोरें नेटलमध्येंच ठेवून दोन वर्षांपूर्वीं नेटलमध्यें कंपनीनें त्यांस घरीं आणून सोडावयाचें अशा स्पष्ट करारानें गेले होते, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलें गेलें. करारबंदीनें लोबिटो बेला गेलेल्यांपैकीं सर्वांनांच कांहीं निर्बंध खात्याच्या अधिकार्‍याचा डाव लागू होत नव्हता. हिंदूस्थानला जाणार्‍या बोटीवर जबरदस्तीनें चढविलेल्या मजूरांत पुष्कळ मजुरांनां नेटलांत शिरण्याचा कायदेशीर हक्क आलेला होता. पण इकडे पाहतो कोण! नेटल हिंदी कांग्रेसच्या अध्यक्षांनीं  बोटींवरील लोकांची गांठ घेण्याची परवानगी मागितली. परंतु ही परवानगी देण्यांत आली नाहीं. कोणाचें कांहींहि न ऐकतां, न्यायकोर्टांत चौकशीची सवड कोणालाही न देतां लोबिटोबेहून डर्बानला आणलेल्या मजुरांपैकीं बहुतेकजणांनां नेटलच्या विदेशयागमनिर्बंधक अधिकार्‍यानें जबरदस्तीनें हिंदुस्थानला पोंचविलें व आपलीं बायकापोरें अडचणींत व हलाखींत नेटलमध्येंच टाकून या सर्व हिंदी लोकांनां परत हिंदुस्थानला यावें लागलें. याप्रमाणें इंग्रज ठेकदारांच्या अजब करार-कर्तबगारीची व इंग्रज वसाहतसरकारच्या हिंदी-प्रेमाची हकीकत आहे. ब्रिटिश सरकारनें अथवा हिंदी सरकारनेंहि या अतिनिर्घृण विश्वासघाताची चौकशी केली नाहीं हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे.

अलीकडील परदेशगनाचा वृत्तांत येथवर दिल्यानंतर आतां प्राचीन काळचें परदेशगमन, अलीकडच्या व तेव्हांच्या परदेशगमनांतील भेद वगैरे गोष्टींकडे वळूं.