प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

आस्ट्रेलियाची वृत्ति.- परदेशगतांच्या भारतीयत्वाचा ओळखीचा जेथें संपूर्ण नाश होत आहे असें ठिकाण आस्ट्रेलिया होय. आस्ट्रेलियांत गेलेल्या भारतीयांविषयीं फारशी माहिती उपलब्ध नाहीं. तेथें गेलेल्या लोकांची संख्या सात हजारांच्या आंत असावी. आस्ट्रेलियानें आतां एशियाटिक लोकांस जवळ जवळ मज्जाव केला आहे आणि हा देश गोर्‍यांचा म्हणून त्यांस राखावयाचा आहे. हा निश्चय भावी काळांत कितपत टिकेल याची वानवा आहे. तथापि, आज त्यांची वृत्ति निश्चित झाली आहे, हें मात्र खरें. हिंदुस्थानी लोकांच्या आगमनास अडचणी उत्पन्न करणार्‍या अनेक अटीं त्यांनीं घातल्या आहेत. येथें येणारे लोक पंजाबकडचे किंवा अफगाण असतात. उंट हांकणारे अफगाण पुष्कळ प्रसंगीं तद्देशीय गोर्‍यांच्या उपयोगी पडलेले आहेत. मणिलाल डॉक्टर यांच्या माडर्नरिव्हूंतील लेखावरून असें दिसून येतें, कीं भारतीयांस मज्जाव करण्याची जरी आस्ट्रेलियन लोकांची वृत्ति आहे, तरी जे आले त्यांस त्रास देण्याची त्यांची प्रवृत्ति नाहीं;  आणि हा परिणाम होण्यास कांहीं अंशीं तेथें गेलेल्या अफगाणांचें पौरुष कारण होय. ते त्रास झाला तर स्वतःच प्रतिकार करतात आणि त्यामुळें गांधींच्या त्राग्याचा अथवा “प्यासिव्ह रेझिस्टन्स” च्या मतास येथें फारसें क्षेत्र नाहीं. तेथें गेलेल्या लोकांपैकीं पुष्कळांचीं लग्नेंहि तेथेच झालेलीं आहेत, आणि त्यांनीं तेथें लग्ने करणें या गोष्टीस आस्ट्रेलियन लोकांची वृत्ति प्रतिकूल असावयाच्या ऐवजीं अनुकूलच दिसते.