प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन-आफ्रिका आणि अमेरिका येथील वसाहती.
करारबंद मजूरपद्धति.- ब्रिटिश वसाहतींत हिंदी लोकांनां वाईट रीतीनें वागविण्यांत येतें, याबद्दल बराच वादविवाद झालेला आहे. ज्या करारबंदीच्या मजूरपद्धतीमुळें हिंदी लोकांनां अशा प्रकारें वागविण्यांत येत असे त्या पद्धतीचें स्वरूप कोणत्या प्रकारचें आहे हें समजून घेणें इष्ट आहे. “करारबंद मजूर” पाठविण्याची पद्धति जरी बंद झाली तरी कोणत्या पद्धतीमुळें लाखों भारतीय परदेशीं गेले तिचें स्वरूप स्पष्टपणें लक्षांत असणें उपयुक्त आहे. हिंदुस्थानांतील व निरनिराळ्या वसाहतींतील केवळ कायद्याच्या आधारानें ही माहिती जुळविली आहे. कायद्यांची अंमलबजावणी कशी होते हा प्रश्न निराळा आहे.
ही पद्धति समजून घेण्यासाठीं हिंदुस्थानांतील व वसाहतींतील कायदे व चालीरीती यांचा विचार केला पाहिजे. त्रिनिदाद व ब्रिटिश गियाना येथील करारबंदी मजुरीच्या व्यवस्थेंचें निरिक्षण केलें असतां, सर्व ब्रिटिश वसाहतींचे ठोकळ मानानें निरिक्षण केल्यासारखें होईल. क्षुल्लक गोष्टींत कांहीं फरक असला तरी एकंदर व्यवस्था एकसारखीच आहे.
सर्व ब्रिटिश वसाहती, फ्रेंच वसाहती व नेदरलंडच्या वसाहती, या ठिकाणची करारबंद मजूर-पद्धत कायदेशील असून इतरत्र करारबंदीनें मजूर नेणें गैरकायदा आहे असें हिंदुस्थान सरकारनें ठरविलें आहे. उपरिनिर्दिष्ट वसाहतींपैकीं कोणत्याहि वसाहतीला हिंदी मजुरांची गरज लागल्यास, ती वसाहत हिंदुस्थानांत आपले गुमास्ते पाठविते. वसाहतींत जाण्याकरितां किती मजुरांची मनें या गुमास्तानें वळविलीं यावर याचा पगार अवलंबून न ठेवितां, वसाहतवाल्यांनीं आपल्या गुमास्तांनां ठरीव पगार द्यावा असा हिंदुस्थानांत कायदा आहे. हे गुमास्ते आपलें काम कांहीं लोकांच्या मध्यस्थीनें करितात; या मध्यस्थांस ‘रिक्रूटर’ असें म्हणतात.
करारबद्ध मजुरांनां फक्त मुंबई, मद्रास व कलकत्ता या बंदरांतूनच वसाहतींत कायदेशीरपणें नेतां येतें. या तीन बंदरांत या लोकांचें संरक्षण करण्यासाठीं, व यांची आरोग्यदृष्ट्या तपासणी करण्यासाठीं स्थानिक सरकार कांहीं लोक नेमितें, त्यांनां संरक्षक व तपासणी डॉक्टर असें म्हणतात. सर्व विदेशगामी लोकांचें संरक्षण करून त्यांनां माहिती पुरवणें व सल्ला देणें हें या संरक्षकांचें काम आहे. तसेंच परदेशगमनासंबंधाचा कायदा पाळला जात आहे किंवा नाहीं हें पहाणें व वसाहतींतून जे मजूर लोक परत येतात त्यांनां प्रवासांत व वसाहतींत कसें वागविण्यांत आलें याची चौकशी करून स्थानिक सरकारला कळविणें हें त्यांचें काम आहे.
गुमास्त्याला मजूर मिळवून देण्यासाठीं जे लोक काम करितात त्यांनां वर सांगितलेल्या संरक्षकापासून परवाना मिळवावा लागतो. हा परवाना मिळाल्याशिवाय कोणालाहि मजुराशीं करार करण्याची मनाई आहे. रिक्रूटर लोकांचें वर्तन कसें आहे तें पाहून परवाना नाकारण्याचा व रद्द करण्याचा अधिकार या संरक्षकांनां असतो.
पोलीस कामगार किंवा मॅजिस्ट्रेट मागतील तेव्हां या रिक्रूटरनां आपला परवाना त्यांनां दाखवावा लागतो. करारनाम्याच्या अटींचा मसुदा त्या गुमास्त्यापासून रिक्रूटरला मिळतो. हा मसुदा इंग्लिशमध्यें व ज्या ठिकाणचे मजूर न्यावयाचे असतील त्या ठिकाणच्या देश्यभाषेंत असला पाहिजे, व पोलिस कामगार व न्यायखात्यांतील कामगार यांनां तो मसुदा दाखविला पाहिजे असा कायदा आहे. परदेशगमनाबद्दल ज्या मनुष्याचें मन रिक्रूटर वळवीत असेल त्या मनुष्याला करारनाम्याची अस्सल प्रत त्यानें दिली पाहिजे. नोंद करितेवेळीं व बंदरांत गेल्यावर त्यानें त्या विदेशगामी लोकांची राहण्याची वगैरे नीट व्यवस्था केली पाहिजे. विदेशगामी लोकांचे डेपो सरकारी वैद्यांकडून तपासले जातात. या लोकांची नोंदणी झाल्यावर त्यांनां डेपोंत नेतात; व ते तेथें आले म्हणजे डॉक्टर लोक त्यांची तपासणी करितात.
अगदीं ऐन वेळींहि परदेशांत जाण्याचें या लोकांनां नाकारितां येतें, त्यांच्यावर सक्ती करितां येत नाहीं. तथापि करारनामा झाल्यावर झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्याबद्दल त्यांच्यावर फिर्याद लावितां येते. या लोकांनां नेणार्या जहाजालाहि एक विशिष्ट परवाना काढावा लागतो. प्रत्येक मनुष्याला निदान ७२ घन फूट जागा, इस्पितळासाठीं निराळी जागा व स्त्रियांसाठीं निराळी जागा याप्रमाणें व्यवस्था त्या जहाजावर केली पाहिजे असा कायदा आहे. हे सर्व नियम मान्य केल्याशिवाय परवाना मिळत नाहीं. सर्व प्रवाशांची अन्नसाग्रीची तजवीज जहाजावर केलेली पाहिजे व त्यांचेसाठीं एक कुशल शस्त्रवैद्यहि जहाजावर असला पाहिजे. विदेशगामी लोकांच्या संरक्षकाला त्याच्या कामांत गुमास्त्यानें सर्व प्रकारची मदत केली पाहिजे.
ज्या वसाहतींत हे मजूर जातात, त्या ठिकाणचे कायदे व पद्धति यांचा आतां विचार करूं. विदेशीय रहिवाश्यांच्या खात्यांतील मुख्य कामगार ब्रिटिश गियानामध्यें ‘इमिग्रेशन एजंट-जनरल’ असें म्हणतात. त्रिनिदाद वगैरे वसाहतीमध्यें या कामगाराला ‘विदेशीय रहिवाशांचा संरक्षक’ असें नांव आहे. या कामगाराची नेमणूक राजाकडून होते; व कायद्याची नीट अंमलबजावणी करण्याबद्दल हा कामगार त्या वसाहतीच्या गव्हर्नराला जबाबदार असतो. परदेशगमनासंबंधाच्या बाबतींत हा गव्हर्नरचा सेक्रेटरीहि असतो. परदेशांतून आलेल्या लोकांची राहण्याची व औषधपाण्याची व्यवस्था कशी आहे हें पहाण्यासाठीं, वाटेल त्यावेळीं वाटेल त्या वसाहतींत जाण्याचा या कामगाराला अधिकार आहे. वसाहतींतील विदेशीय रहिवासी व वसाहतवाले यांची एकमेकांविरुद्ध कांहीं तक्रार असल्यास, तिची चौकशी करून याला ती न्यायाधीसापुढें मांडतां येते; व तेथें योग्य निकाल मिळाला नाहीं असें याला वाटल्यास परदेशवासीयांच्या वतीनें त्याला अपीलहि करितां येतें. गव्हर्नरानें नेमिलेले सीनियर व जूनियर इमिग्रेशन एजंट हे त्याचे मदतनीस असतात. या खात्याचे निराळे डॉक्टर असून वाटेल त्या वसाहतींत जाण्याचा त्यांनां हक्क असतो.
वसाहतींत येण्याविषयीं लोकांची मनें वळविण्यासाठीं व त्यांचा जाण्यायेण्याचा खर्च देण्यासाठीं इमिग्रेशन फंड काढिलेला आहे. या फंडाची व्यवस्था रिसीव्हर-जनरलकडे असते. करारनाम्याची फी, एकरपट्ट्या, वगैरे कित्येक गोष्टींची या फंडांत समावेश होतो. परदेशी मजूर ज्यांनां पाहिजे असतात असे लोक करारनाम्याची फी देतात. कोणत्या देशांतील किती मजूर पाहिजेत हें त्या धन्याला सांगावें लागतें. या मागण्या किती प्रमाणांत मान्य करितां येतील हें ठरविण्याचा अधिकार या विदेशीयसंरक्षक कामगाराला असतो. धन्याच्या स्वभावाबद्दल त्याला कांहीं संशय आल्यास, त्याची मागणी याला नाकारितांहि येते.
बंदरांत जहाज आलें म्हणजे मुख्य विदेशीय-संरक्षक कामगार व तपासणी डॉक्टर हे कायद्याप्रमाणें सर्व व्यवस्था आहे किंवा हें पहातात. व आपला अभिप्राय गव्हर्नराला कळवितात. परदेशांतून आलेल्या मनुष्यांपैकीं कोणी आजारी असल्यास त्याला ताबडतोब सार्वजनिक दवाखान्यांत पाठवितात. परदेशांतून वसाहतींत आलेल्या लोकांस धन्यांच्या स्वाधीन करावयाच्या वेळेपर्यंत सरकारच्या खर्चानें इंमिग्रेशन डेपोमध्यें त्यांची अन्नपाण्याची व राहण्याची सोय करण्यांत येते.
या लोकांची वांटणी करितेवेळीं कित्येक लोकोपयोगी खात्यांच्या मुख्य कामगारांच्या मागणीचा प्रथम विचार करण्यांत येतो; नंतर मळेवाल्यांसारख्या खासगी लोकांच्या मागण्यांचा विचार होतो. या लोकांच्या गरजा भागल्यानंतर घरकामाकरितां ज्यांनां चाकर पाहिजे असतात अशा लोकांच्या अर्जांचा विचार करण्यांत येतो. परदेशी मजुरांनीं हरकत न केल्यास या क्रमानें त्यांची विभागणी केली जाते. ही विभागणी करितांना पुरुषांची त्यांच्या बायकांपासून व मुलांची त्यांच्या आईबापांसून ताटातूट करीत नाहींत. मित्र, शेजारी किंवा एकाच गांवांतून येणार्या लोकांची होतां होईल तों ताटातूट करीत नाहींत.
परदेशी लोकांच्या (मूळ) देशांत त्यांनां वसाहतींत नेतेवेळीं केलेले करार वसाहतींत गेल्यावर पाळण्यांत येतात; परंतु राजाची परवानगी घेतल्याशिवाय हिंदुस्थानांत केलेले करार कायदेशीर होत नाहींत असा नियम कांहीं वसाहतींमध्यें आहे. कराराची नेहमींची मुदत पांच वर्षांची असते. धन्यानें वाचन, लेखन व गणित शिकविण्याची व्यवस्था केल्याशिवाय अज्ञान मुलगा करारनाम्यानें धन्याशीं बांधला जात नाहीं.
परदेशांतून आलेल्या लोकांच्या राहण्याच्या जागेवर, अन्न पाण्यावर व दवाखान्यावर, सरकारच्या वैद्यक खात्याची देखरेख असते. जे धनी आपल्या करारबद्ध मजुरांनां दवाखान्यांत पाठविण्याची हेळसांड करितात त्यांनां दंड द्यावा लागतो. मजुरीसंबंधीं व कामाच्या विभागणीसंबंधीं इमिग्रेशन कायद्यांत नियम आहेत. आठवड्यांतून ४२ तासांपेक्षां अधिक काम परदेशांतून आलेल्या लोकांपासून घेऊं नये असा नियम आहे.
परदेशी लोक वसाहतींत आणणार्या गुमास्ताला या परदेशांतून आलेल्या लोकांच्या विवाहांची व घटस्फोटांची नोंद ठेवावी लागते; व यासाठीं कित्येक नियम केलेले आहेत.
या परदेशी नोकरांसाठीं हे जे कायदे केलेले आहेत, यांपेक्षां चांगले कायदे असणें क्वचितच संभवनीय आहे हें उघड आहे. हिंदी लोकांनां न्याय मिळून त्यांनां चांगल्या प्रकारें वागविण्यांत यावें यासाठीं वसाहतींनीं योग्य कायदे केलेले आहेत; तथापि हिंदी लोकांनां फार वाईट प्रकारें वागविण्यांत येतें ही गोष्ट कोणाहि प्रामाणिक मनुष्याला नाकबूल करितां येणार नाहीं. तर मग, हें काय गूढ आहे ?
ही जी विसंगतता दिसते, तिचा उलगडा करण्यास फार खोल जाण्याची अवश्यकता नाहीं. कायदे उत्तम आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी नीट होत नाहीं अशी खरी स्थिति आहे. दिसण्यांत उत्तम असलेल्या कायद्यांची अयोग्यपणें बजावणी झाल्यास ते उघड उघड अन्यायी कायद्यापेक्षां सहजच अधिक अपायकारक होतात. त्यांच्या योगानें सुधारणेचें काम अधिक अवघड होतें व ते लांबणीवर पडतें. इमिग्रेशन एजंट जनरल किंवा संरक्षक (प्रोटेक्टर ऑफ दि इमिग्रंट्स) हा खरोखर संरक्षक आहे किंवा नाहीं हें पाहिलें पाहिजे. या सर्व पद्धतीची उपयुक्तता व निर्दोषता सर्वस्वीं या कामगारावर अवलंबून आहे. तत्त्वतः हा कामगार हिंदी लोकांचा मित्र असला पाहिजे. तसा तो असल्यास त्याचे बरेच हाल कमी होतील यांत संशय नाहीं. ज्ञानानें व अनुभवानें या विषयासंबंधीं मत देण्याला जे योग्य आहेत त्यांनीं ही गोष्ट कबूल केलेली आहे. लंडनमधील ‘ट्रॉपिकल लाइफ्’ नांवांच्या मासिक पुस्तकाचा संपादक, हॅरॉल्ड एच् स्मिथ, यानें आपल्या मासिकांत अनेकदां हा महत्त्वाचा मुद्दा आग्रहपूर्वक मांडला आहे. परदेशांतून आलेल्या लोकांच्या संरक्षकाला नेहमीं आपल्या स्वतःच्या महत्त्वाची फाजील कल्पना असते; व ज्यांच्याशीं त्याचा नेहमीं संबंध घडतो, त्या कनिष्ठ दर्जाच्या हिंदी मजुरांबद्दल त्याला क्वचितच आस्था वाटते. मजुरांच्या धन्यांबद्दल याला अधिक सहानुभूति वाटते, कारण ते बहुधा त्याचे मित्र असतात; मित्र नसले तरी सांपत्तिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या ते त्या कामगाराच्या बरोबरीचे असून त्यांची व याची जात व धर्म हींहि एकच असतात.
हिंदुस्थानसरकारला या गोष्टींत काय करितां येण्यासारखें आहे ? इ. स. १८४०-४५ पासून हिंदुस्थानसरकार साम्राज्यसरकाराकडे पाठविण्यांत येणार्या खलित्यांत वसाहतींतील हिंदी लोकांच्या वागवणुकीबद्दल टीका करीत आहे. परंतु या टीकेचा कांहींएक उपयोग झाला नाहीं. साम्राज्य सरकारला पाठविण्यांत येणार्या खलित्यांत एक सरकार दुसर्या सरकारबद्दल वाईट भाषा वापरूं लागलें हाच काय तो त्या टीकेचा परिणाम झाला. हिंदी लोकांचे हाल कमी करून परदेशवास त्यांनां सुखावह व प्रिय व्हावा यासाठीं बर्याच गोष्टी करितां येतील. वसाहतींतील परदेशीयसंरक्षक व त्याचे मदतनीस हे नेहमी इंग्लिश लोक असतात. वसाहतींतील इमिग्रेशन खात्याच्या मोठमोठ्या जागा योग्य हिंदी सद्गृहस्थांनां देण्यासंबंधीं हिंदुस्थानसरकार व वसाहतकार यांनीं एकविचारानें ठरवून, तसें करण्याबद्दल वसाहतवाल्यांचें मन त्यांनां वळवितां आल्यास चांगले परिणाम होतील असें वाटतें. कनिष्ठ दर्जाच्या हिंदी लोकांचा कैवार घेण्यासाठीं म्हणून, वसाहतींतील न्यायधीशाच्या कांहीं जागा हिंदी लोकांनां देण्याचाहि प्रयत्न हिंदुस्थानसरकारनें करावा. हीं कामें करण्यालायक ईस्ट इंडियन लोक वसाहतींत सांपडणें शक्य दिसत नाहीं. परंतु अनुभविक व लायक लोक हिंदुस्थानांतून बोलवितां येतील. हिंदुस्थानसरकारनें या लोकांची शिफारस केल्यास निरनिराळ्या सरकारांचा एकमेकांविषयीं असलेला गैरसमज नाहींसा होऊन बर्याच अडचणी दूर होतील. हिंदी मजुरांच्या नीतिमत्तेसंबंधाचें वसाहतसरकारचें धोरणहि गर्हणीय आहे.
आशियांतील करारबद्ध मजुरांमधील स्त्रीपुरुषांच्या निषिद्ध संबंधाबद्दल जे कायदे केलेले आहेत त्यांत सांपत्तिक फायद्यापेक्षां स्त्रीधर्मास आणि गृहस्थधर्मास गौण मानिलेलें आहे. उदाहरणार्थ, ब्रिटिश गियानाची गोष्ट घ्या. इजा करण्याची किंवा खून करण्याची भीति दाखवून एखाद्या करारबद्ध हिंदी मजुरानें मजूर स्त्रीशीं संभोग केल्यास त्याला साधी किंवा सक्तमजुरीची शिक्षा एक महिन्यापेक्षां अधिक देऊं नये असा येथें कायदा आहे. व दुरर्याच्या बायकोला एखाद्यानें फसवून नेल्यास, त्याला चोविस डॉलरपेक्षां अधिक दंड होऊं नये असाहि कायदा आहे (१८९१ चा १८ वा कायदा, १५७-१६० पहा.) वसाहतींत मजुरांनें जें काम करावयाचें ठरलेलें असतें त्यापेक्षां कमी काम एखाद्या मजुराला पडावें व तें तो वरील प्रकारचा गुन्हेगार म्हणून कमी पडावें ही गोष्ट वसाहत सरकारला पंसत नाहीं!
ज्या अर्थी हे मजूर हिंदुस्थानांत परत येऊन हिंदी समाजाचे घटक बनतात, त्या अर्थी ढिल्या व घातुक कायद्याच्या योगानें करारबद्ध मजुराची नीतिमत्ता बिघडणार नाहीं अशी तजवीज करणें हें हिंदुस्थानसरकाचें कर्तव्य आहे; या गोष्टीचा हिंदुस्थानसरकार विचार करील अशी फार आशा आहे.
कूली म्हणून ज्यांनीं करार करून आपणांस बांधून घेतलें त्यांचा छळ प्रत्येंक देशांत झालाच आणि त्याचा विचार करण्याकरितां आज तीस वर्षें अनेक चवकशा होऊन त्यांचे रिपोर्टहि बाहेर आलेले आहेत. तसेंच या हिंदूंचा उपयोग माणसांची अवलाद सुधारण्याकरितां कसा काय करावा या संबंधानें तत्तवत्ते आणि मुत्सद्दी दोघेहि विचार करितांनां दृष्टीस पडतात. डॉ. ए. एच्. कीन हा आपल्या ‘एथ्नॉलॉजी’ नामक ग्रंथांत म्हणतो कीं, निग्रो लोकांची सुधारणा गोर्या लोकांशीं संबंध जडवून होत नाहीं तर जेथें जेथें निग्रो म्हणून असतील तेथें हिंदू आणून सोडावेत म्हणजे त्यांची व निग्रोंची लग्नें होऊन जी जात उत्पन्न होईल तिच्यांत हिंदूंची परिश्रम करण्याची संवय येईल आणि निग्रोंचा कणखरपणाहि येईल. प्रस्तुत तत्त्ववेत्त्यानें विचार करितांनां शक्याशक्यतेचा विचार मुळींच केला नाहीं असें दिसतें. किंग्सले, ब्राँकहर्स्ट आणि हेनरी कर्क हे सर्व अशी साक्ष देतात कीं, हिंदूंचा लग्नव्यवहार निग्रोशीं मुळींच होत नाहीं. ब्राँकहर्स्ट म्हणतो कीं, हिंदूलोक निग्रोस इब्लिस म्हणजे सैतानाची पिल्लें समजतात आणि चिनी आणि हिंदू यांची तुलना करितांना हेनरी कर्क असें दाखवितो कीं, चिनी लोक निग्रो बायका खुशाल करितात आणि निग्रो बायका करितांनां निग्रोंतल्या सगळ्यांत देखण्या मुली तेच पटकावतात. हिंदू मात्र चार पांच जण मिळून एकाच स्त्रीबरोबर राहतात. पण निग्रोशीं संबंध करीत नाहींत. फार तर काय हिंदू यूरोपीयांशीं देखील संबंध करावयास अजून नाखूष आहेत. ब्रिटिश गियानामध्यें पोर्तुगीज बायका निग्रोशीं देखील लग्न करितात आणि इंग्लंडमध्यें, फ्रान्समध्यें, निग्रोशीं लग्न करणार्या यूरोपीय बायका तर पुष्कळच दिसून येतात. यावरून इतर लोकांची अवलाद सुधारण्याकरितां यूरोपीय राजकारणी आणि व्यापारधोरणी मनुष्यांस हिंदूंचा कितपत उपयोग होईल हें सहज कळ्याजोगें आहे. फिजी बेटांतील लोक दिवसानुदिवस नष्ट होत चालले आहेत. त्यांचीं पुष्कळांस कींव येऊन त्यांनां सुधारण्याकरितां हिंदूंची व त्यांची लग्नें लावून द्यावीं अशा प्रकारचे विचार व्यक्त करणारे पुष्कळ लेखक व तत्त्ववेत्ते होऊन गेले; आणि या गोष्टीची इष्टानिष्टता पाहण्यासाठीं एक सरकारी कमिशनहि बसलें होतें. त्याचा एक लठ्ठ रिपोर्ट पाहण्यांत आला आहे. तथापि रक्तांचें मिश्रण करून हिंदू लोक फिजी येथील काळ्या लोकांत समाविष्ट करावेत या हेतूनें खटपट झाल्याचें आणि त्यांत सरकारचें अंग असल्याचें कोठें दिसत नाहीं. असो.
आतां अर्वाचीन परदेशगमन दाखविणारे आंकडे येथें देऊन त्यांवर कांहीं विचार प्रकट करुं.
ब्रिटिश राज्यांतील हिंदुस्थानी लोक. (खानेसुमारी १९११)
स्थान | भारतीय वंशाचे | हिंदुस्थानांत जन्मलेले |
इंग्लंड आणि वेल्स | ४००३ | ४००३ |
स्कॉटलंड | १४८ | १४० |
जिब्राल्टर | ५३ | ५३ |
माल्टा | २३ | २३ |
मालदिव | १६५ | १६५ |
सिलोन | ५८००७६ | ४७३८३० |
हाँगकाँग | ३०४९ | २३९७ |
स्ट्रेट्स सेटलमेंट्स | ८२०५५ | ६५९५७ |
फेडरेटेड मलायस्टेट्स | १६५९९८ | १५३७६४ |
ब्रिटिश संरक्षित इतर मलाय संस्थानें |
११०७६ | ११०७६ |
अँग्लो इजिप्शिअन सुदान | २३५ | २२१ |
युगांडा | १६८७ | १६८७ |
नायगेरिया | ६ | ६ |
न्यासालँड | ४७४ | ४७४ |
बेचुआनालँड | ४५ | ३६ |
केप ऑफ गुड होप | ६६०६ | ४७८३ |
नाताळ | १३३०३१ | ७३३२१ |
ट्रान्सवाल | १००४८ | ६८५४ |
ऑरेंज फ्रिस्टेट | १०६ | ४८ |
बॅसुटोलँड | १३४ | १३४ |
स्वाझीलँड | ७ | ६ |
र्होडेशिया | ७७१ | ६४७ |
सायरालिओन | २६ | २१ |
सेचिलिस | ४८९ | ३९३ |
मॉरिशस | २५८२११ | ३५३४९ |
झांझीबार | ८१२२ | ८१२२ |
बाहामा | ४ | ४ |
ग्रेनाडा | ४०६ | ४०६ |
ब्रिटिश हांडुरास | ३५ (खा). | १०४ |
त्रिनिदाद | १०७४३३ | ५०५८३ |
फॉकलंड बेटें | ३ | ३ |
जमेका | १७३८० | ७७८८ |
सेंट व्हिन्सेन्ट | ३७६ | ११४ |
ब्रिटिश गियाना | १२६५१७ | ८८२०१ |
कानडा | २३४२ | २३४२ |
डोमिनिका | ८ | ८ |
बारवडॉस | ८ | ५ |
सेंटलुसिआ | २०६४ | ६१२ |
ब्रिटिश नॉर्थ बोर्निओ | ९०२ | ९०२ |
* फिजी | ३९९७७ | २८९०८ |
न्यूझीलंड | १५ | १५ |
ब्रह्मदेश | ४,९३,६९९ | |
बलुचिस्तान | ४१,२३२ | |
अंदमान | १४,११४ | |
५४९०४५ | ५४०४५ | |
एकूण | २११३४७४ | १५७२५५० |
* फिचीमध्यें एकंदर हिंदी लोक ६११५३ आहेत. ही ३१ डीसेंबर १९१७ ची अंदाजी लोकसंख्या आहे. हिंदी लोक करारानें बांधले गेलेले फक्त ९०६२ होते त्यांत १७६७ मुलें करारबद्ध होतीं. १९१६ सालीं १७५६ हिंदी लोक फिजी बेटांत गेले आणि १९१७ मध्यें कोणीच गेले नाहींत, कारण कराराची पद्धति हिंदुस्थान सरकारनें बंद केली. फिजी बेटांतील लोकसंख्येमध्यें स्थानिक लोक ८७००० आहेत आणि भारतीयांचा नंबर दुसरा लागतो. यूरोपीयांची संख्या ३७०७ आहे. |
निरनिराळ्या वसाहतींत गेलेल्या हिंदूंची माहिती मिळविण्यास आपणास साधनें पुष्कळ आहेत. तीं येणेंप्रमाणेः- (१) हिंदुस्थान सरकारनें निरिक्षणासाठीं आपले जे प्रतिनिधी पाठविलेले असतात त्या प्रतिनिधींचे रिपोर्ट आणि त्या प्रतिनिधींनां तद्देशीय सरकारांनीं केलेले रिपोर्ट. (२) परकीय वसाहतींच्या मजूर गोळा करण्याकरितां कलकत्त्यास असलेल्या त्यांच्या प्रतिनिधींनीं केलेले रिपोर्ट. (३) त्या त्या वसाहतींचे इतिहास. (४) प्रत्येक वसाहतींतील हिंदी लोकांसंबंधानें केलेले कायदे. (५) इतर लोकांचीं प्रवासवर्णनें. (६) त्या त्या वसाहतींतील वर्तमानपत्रें. (७) वसाहतींत भांडवल घालणार्या लोकांनीं इंग्लंडमध्यें चालविलेलीं वर्तमानपत्रें. (८) हिंदुस्थानी लोकांस वाईट तर्हेनें वागविल्याबद्दल्या कागाळ्या इंग्लंडपर्यंत पोंचल्यावर झालेल्या चौकशांचे व कमिशनांचे रिपोर्ट.
(९) प्रत्येक वसाहतींतील प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्स याचे रिपोर्ट. या विषयावर वाङ्मय अत्यंत विपुल आहे. त्या सर्वांचा निष्कर्ष देण्यास किंबहुना सर्व ग्रंथांची वर्षानुक्रमानें यादी देण्यासही येथें अवकाश नाहीं. यासाठीं काहीं प्रमुख ठिकाणीं असलेल्या भारतीय जनतेची माहिती व्हावी आणि त्यांच्यावर आलेल्या अडचणी समजाव्या म्हणून थोड्या टीपा मात्र येथें देतों. थोडक्यांत सांगावयाचें म्हटल्यास असें म्हणतां येईल कीं, मारिशस, दक्षिण आणि पूर्व आफ्रिका, फिजी, ब्रिटिश गिआना, त्रिनिदाद, जमेका कानडा, युनायटेड स्टेस्ट्स या सर्व ठिकाणांहून दुःखाच्या आरोळ्या वारंवार ऐकूं आल्या. हिंदुस्थानास मांटेग्यूच्या खटपटीनें नवी सनद मिळाली तरी आफ्रिकेंतील आपल्या लोकांचा उपमर्द बंद झाला नाहीं. ब्रिटिश गियाना आणि फिजी येथून आंमत्रण येत आहे, तर कांहीं ठिकाणांहून दुःखाचीच माहिती मिळत आहे. प्रत्येक ठिकाणचे मजूर कोणत्या स्थितींत आहेत हें सांगण्यांत मतलब नाहीं. सिलोनमध्यें काय प्रकार सुरु आहे याची कल्पना मागें दिलीच आहे. इतर ठिकाणची स्थिति याहून फारशी निराळी नाहीं. आतां स्वतंत्र जनतेविषयीं विचार करूं.