प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती
जुन्या नव्या परदेशगमनांतील भेद.- कालदृष्टीनें प्राचीन परदेशगमन आणि आजचें परदेशगमन हें पृथक नाहीं तरी, प्राचीन परदेशगमन आणि अर्वाचीन परदेशगमन यांत कांहीं स्थूल भेद दृष्टीस पडतात. प्राचीन परदेशगमनामध्यें व्यापारासाठीं वैश्य हिंडत. कधीं कधीं एका ठिकाणाहून उच्चाटन झालेला क्षत्रियवर्ग दुसर्या ठिकाणीं जाऊन देश जिंकी व राज्य स्थापन करी, आणि संस्कृतिप्रसारासाठीं म्हणजे ब्रह्मकर्म चालविण्यासाठीं, यज्ञयाग करण्यासाठीं आणि शिक्षक या नात्यानें ब्राह्मण जात. ब्राह्मणांचा देशोदेशीं होत असलेला वैयक्तिक संचार कथासरित्सागरांत वर्णन केला आहे. क्षत्रियांचीं स्थलांतरे आपणांस पुष्कळ दिसून येत आहेत. दक्षिणेंतील बरींच राजकुलें आणि मराठ्यांचीं कुलें उत्तरेकडून आलीं आहेत. ब्रह्मदेशचें राजकुल भारतीय आहे. सयामचें राजकुल देखील ज्या शाक्यवंशांत बुद्ध झाला त्याच वंशांतील आहे असा समज तेथील भिक्षूंनीं तेथील राजांचा करून दिला आहे. बौद्ध भिक्षूंची स्थलांतरें तर पुष्कळच होत आहेत. हा संप्रदाय स्थापन झाल्यानंतर भारतांतील कित्येक पंडित परदेशीं गेले. ग्रीसपासून जपानपर्यंत भारतीय पंडितांचा संचार तद्देशस्थ ग्रंथांतून दिसून येतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यादि वर्गांची स्थलांतरें आपल्या नजरेस येतात. त्यावेळेस आपलें जें स्थलांतर होई त्यानें भारतीय संस्कृतीची वृद्धीच होत होती असें दिसून येईल.
आजचें परदेशगमन निराळ्या प्रकारचें आहे. आज मजूर म्हणून आपले लोक इतरत्र जातात आणि तेथें परकीय संस्कृतीचे पूर्णपणें झालें नाहींत तरी कांहीं अंशानें अंशभाक् होतात. दक्षिण आफ्रिकेंत ज्यांच्या दोन पिढ्या उलटल्या आहेत अशा लोकांपैकीं कांहीं माणसें इंग्लंडमध्यें शिक्षणास आलेलीं दृष्टीस पडलीं. त्या सर्वांची स्थिती पाहिली तर त्यांस एकहि भारतीय भाषा येत नव्हती, आणि त्यांपैकीं कांहीं ख्रिस्ती होते आणि कांहीं नव्हते. आज गुजराथी आणि हिंदी भाषांतील लेख समाविष्ट करणारीं कांहीं पत्रें हिंदुस्थानीयांचें हितसंरक्षण करण्यासाठीं चालविलीं जात आहेत. त्यांसारख्या पत्रांच्या द्वारा हिंदुस्थानांतून तिकडे जाणार्या वाङ्मयानें अशा लोकांचें भारतीयत्व थोडेंबहुत जिवंत राहील. येथून आफ्रिकेंत कांहीं भारतीय वाङ्मय जातें यांत शंका नाहीं. रामायणाच्या अनेक प्रती तेथें हिंदूस्थानांतून गेल्याची माहिती डॉ० कोमिन्स याला तद्देशस्थ अधिकार्यांनीं आपल्या रिपोर्टांत दिली आहे. हिंदुस्थानांतील वेंकटेश्वर समाचार (मुंबई), भारतमित्र (कलकत्ता), इत्यादि पत्रांत वसाहतींत गेलेल्या लोकांची पत्रें वारंवार प्रसिद्ध होतात. ग्रंथ वाचून दाखवून पैसे मिळविणार्या आणि त्यामुळें “आळसांत दिवस घालविणार्या” ब्राह्मणांचें मत्सरयुक्त वर्णन ब्राँकहर्स्टनें दिलें आहे. ब्राह्मणांविषयीं पूज्यबुद्धि नष्ट झाली नाहीं. ब्राह्मण गुन्हेगार पकडून सरकारच्या हवालीं करण्यास हिंदू पोलीस नाखूष असतात असा बोभाटा वसाहतीच्या अधिकार्यांकडून मधून मधून ऐकूं येतो-(कोमिन्स या केलेला रिपोर्ट). जागोजाग लहान लहान हिंदूंची देवळें व मुसुलमानांच्या मशीदी देखील वरील रिपोर्टांत वर्णिल्या आहेत. तेथें आढळणार्या मातापालो नांवाच्या, वडाची आठवण देणार्या, वृक्षाची पूजा गचाळ हिंदू करितात असें तेथील यूरोपीयन प्रवासी सांगतात. हें सर्व एखादी पिढी चालते, पण दुसर्या पिढींत नैतिक दुर्गति येते आणि हिंदी आचाराची ओळख पूर्णपणें जातांना दिसते, असे ब्यारिस्टर मणिलाल यांनीं आपल्या माडर्न रिव्हूमध्यें छापलेल्या ब्रिटिश गियानाच्या वर्णनांत म्हटलें आहे.