प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.

पुढील गुप्त राजे व हूणांच्या स्वा-या. - इ .स. ४५५ पर्यंत गुप्त साम्राज्याची अधिकाधिक भरभराट होत गेली, पण नंतर त्याला हूणांच्या स्वा-यांमुळें उतरती कळा लागली. पहिला कुमारगुप्त याच्या कारकीर्दींतच ४५० मध्यें पुष्यमित्र नांवाच्या बलिष्ठ राजानें गुप्तः सम्राटांच्या सैन्याचा पराभव केला. या धक्यामुळें डळमळूं लागलेलें गुप्त साम्राज्य पुढील सम्राट रकंदगुप्त (इ .स. ४५५-४८०) यानें ४५५ पूर्वीच पुष्यमित्र या शत्रूचा पराभव करून सावरून धरलें. परंतु तो राज्यावर आल्यानंतर लवकरच रानटी हूण लोकांनीं मध्य आशियांतून खालीं उतरून हिंदुस्थानावर स्वारी केली. तथापि या हूणांचाहि पराभव करून स्कंदगुप्तानें हिंदुस्थानचें संरक्षण केलें. हें युद्ध ४५८ पूर्वींच झालेलें असावें, कारण ४५८ मधील एका शिलालेखांत स्कंदगुप्ताच्या या विजयाचा उल्लेख आहे. पाटणा पासून ९० मैलांवर असलेल्या गोरखपुर जिल्ह्यांतील एका गांवीं असलेल्या एका स्तंभावरील लेखांत स्कंदगुप्ताचें साम्राज्य पूर्व व पश्चिम दोहोकडील प्रांतांत पसरलें होतें असें लिहिलें आहे. तथापि पुढें इ .स. ४६५ मध्यें हूणांची दुसरी टोळी हिंदुस्थानाकडे चालून आली व तिनें गंधारा (वायव्य पंजाब) देश घेऊन कुशान राजाला पदच्युत केले. नंतर इ. स. ४७० चे सुमारास हूणांनीं हिंदुस्थानांत शिरून गुप्तांच्या साम्राज्यावर पुन्हां हल्ला केला. नव्या नव्या टोळ्यांची भरती होत जाऊन हूणांनीं वाढत्या सैन्यानिशीं अनेक हल्ले केल्यामुळें गुप्त सम्राटाचा पराभव झाला, व लढायांच्या खर्चामुळें पैशाची इतकी अडचण झाली कीं, स्कंदगुप्तानें हलक्या दर्जाचें नाणें पाडलें. पूर्वी नाण्यांत शुदृध सोन्याचें प्रमाण १०८ ग्रेन होतें ते ७३ ग्रेन पर्यंत उतरत गेले.

स्कंदगुप्त ४८० मध्यें मरण पावला व साम्राज्यावरील संकटास तोंड देण्यास लायक असा पुत्र नसल्यामुळें स्कंदगुप्ताचा भाऊ पुरगुप्त यानें ४८० ते ४८५ पर्यंत राज्य केलें. त्यानें हलकीं नाणीं सुधारून पुन्हां पूर्ववत् केली. या वेळीं साम्राज्याचा विस्तार नष्ट होऊन मगध व शेजारच्या प्रांतांवरच कायतो गुप्तांचा अम्मल चालू राहिला. पुरगुप्तानंतर त्याचा मुलगा नरसिंहगुप्त बालादित्य यानें इ .स. ४८५ ते ५३५ पर्यंत राज्य केलें. तो बौद्ध धर्माचा पक्षपाती होता याला पुरावा असा आहे कीं, मगध देशांतील नालंद येथे त्यानें ३०० फूट उंचीचें विटांचे बौद्धपंथी देवालय बांधिले. त्याच्या कारकीर्दींतहि हूणांचे हल्ले झाले व त्यांना बालादित्यानें यशस्वी रीतीनें तोंड दिलें. बालादित्यानंतर त्याचा मुलगा दुसरा कुमारगुप्त राज्यावर आला. त्याच्या कारकीर्दीची माहिती सांपडत नाहीं. गुप्तसम्राटांच्या घराण्यापैकीं हा शेवटचा होय. यानंतर गुप्तांचे एक दुय्यम दर्जाचें राजघराणें चालू होतें. त्यांत अकरा राजे झाले, ते फक्त मगधावर राज्य करणारे स्थानिक राजे होते. शिवाय मगधांतच त्या वेळीं नांवाला वर्मन् हा प्रत्यय असलेले मौखरी जातीचे राजघराणें राज्य करीत असे. या दोन घराण्यांत कधीं शत्रुत्व तर कधीं मित्रत्व असे. याप्रमाणें मगधाचें साम्राज्यवैभव नष्ट झालें तरी बौद्धपंथी विद्येचें केंद्रस्थान ह्या नात्यानें नालंदाचे व इतर कित्येक स्थानांचे महत्त्व कायम होतें. पुढें बाराव्या शतकांत येथील अनेक बौद्ध मठांचा व त्यांतील ग्रंथसंग्रहांचा मुसुलमानांनीं जाळून नाश केला. उत्तर कालीन गुप्त राजांच्या वेळीं मगधाचें बौद्धधर्मदृष्ट्या महत्त्व होतें याला पुरावा असा आहे कीं, इ. स. ५३९ मध्यें चीनांतील लिआंग घराण्याचा पहिला बादशाह व कट्टा बोद्धधर्माभिमानी वु-ति ऊर्फ सिऔयेन यानें हिंदुस्थानांतून महायान पंथाचे ग्रंथ व त्यांचें भाषांतर करण्यास विद्वान पंडित मिळवून आणण्याकरितां एक चिनी भिक्षुमंडळ मगधदेशीं पाठविलें होतें. त्याला मगधांतील तत्कालीन राजा, बहुधा पहिला जौवितगुप्त किंवा कुमारगुप्त, यानें चांगली मदत केली. परमार्थ नांवाचा विद्वान त्या मंडळाच्या मदतीला दिला व कित्येक वर्षें हिंदुस्थानांत राहिल्यानंतर बरेच हस्तलेख व उपर्युक्त विद्वान परमार्थ यास बरोबर घेऊन तें मंडळ चीनला परत गेलें. परमार्थ इ. स. ५४६ पासून ५६९ पर्यंत चीनमध्यें राहून त्या सालीं तेथेच मरण पावला. याच चिनी बादशाहाच्या कारकीर्दींत दक्षिणहिंदुस्थानांतील एका राजाचा मुलगा बोधिधर्म हा ५२० मध्यें चीनमध्यें जाऊन राहिला. त्यानें केलेले अद्भुत चमत्कार हा चिनी चित्रकारांचा आवडीचा विषय आहे.

उत्तर कालीन गुप्त राजांपैकीं अत्यंत प्रसिद्ध राजा आदित्यसेन हा होय. यानें सम्राट हर्ष इ .स. ६४७ त मरण पावल्यावर स्वतंत्र होऊन सार्वभौमत्त्वाचें लक्षण म्हणून अश्वमेध यज्ञहि केला. या घराण्यांतला शेवटचा ज्ञात राजा दुसरा जीवितगुप्त हा आठव्या शतकाच्या आरंभींच्या काळांत राज्यावर होता. आणि नंतर आठव्या शतकाच्या अखेरीस किंवा नवव्याच्या आरंभीं मगध देश बंगालच्या पाल राजांच्या अमलाखालीं गेला.