प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.
सुराष्ट्रां [काठेवाडां] तील वलभी येथील राजघराणें.- पांचव्या शतकाच्या अखेरीस मैत्रक नांवाच्या, बहुधा परकी असलेल्या जातीच्या, भट्टारक नांवाच्या पुढा-यानें सुराष्ट्राच्या पूर्वभागांतील वलभी येथें राज्य स्थापलें. हें राजघराणें इ. स. ७७० पर्यंत टिकलें. नंतर अरबांच्या स्वा-यामुळें तें नष्ट झालें असें वाटते. प्रथम वलभीचे राजे स्वतंत्र नव्हतेसें दिसतें, कारण ते हूणांनां खंडणी देत असत. पण हूणांची सत्ता नष्ट झाल्यावर स्वतंत्र होऊन पश्चिम हिंदुस्थानांत त्यांनीं मोठें बलिष्ठ राज्य बनविलें. सातव्या शतकांत ह्य-एन-त्संगानें या शहराला भेट दिली होती. याच सुमाराचा इत्सिंग हा चिनी प्रवासी म्हणतो कीं, त्या वेळी नालंद व वलभी दोनच ठिकाणें विद्येच्या बाबतींत चीनांतील मोठमोठ्या शहरांच्या बरोबरीचीं होतीं. ह्यु-एन-त्संगानें याच अर्थाचा उल्लेख केला आहे. पुढें वलभीचें राज्य नष्ट झाल्यावर अनहिलवाडा व त्यानंतर वलभीचें राज्य नष्ट झाल्यावर अनहिलवाडा व त्यानंतर पंधराव्या शतकापासून अहमदाबाद, ही ठिकाणें महत्त्वास चढलीं.