प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.
समुद्रगुप्त इ. स. ३३०-३७५.- यानें पुष्कळ वर्षें राज्य केलें. त्यांपैकीं बरींच वर्षें त्यानें साम्राज्य वाढविण्याकरितां युद्धें करण्यांत घालविलीं. त्यानें आपल्या विजयाचीं वर्णनें संस्कृत पंडितांकडून लिहवून तीं अशोकानें उभारलेल्या जयस्तंभांवर खोदून ठेविलीं. स्वतः समुद्रगुप्त हा चांगला विद्वान् असून त्याचप्रमाणें तो महत्त्वाकांक्षी, शूर व लढवय्याहि होता. बौद्ध साधू वसुबंधु याच्या जवळून बौद्ध संप्रदायाचीं तत्त्वेंहि त्यानें समजावून घेतलीं होतीं. पण एकीकडे बुद्धाच्या अहिंसातत्त्वाची तारीफ करीत असतांना त्याबरोबरच तो आपल्या समरांगणावरील विजयांची प्रौढीहि मिरवीत असे. समुद्रगुप्ताच्या पराक्रमांचें त्याच्या हरिसेन नांवाच्या राजकवीनें जें गद्यपद्यमय वर्णन करून ठेविलें होतें तें आज उपलब्ध असून त्यावरून तत्कालिन विश्वसनीय माहिती मिळते. हा ग्रंथ इ. स. ३६० च्या सुमारास लिहिलेला असावा. समुद्रगुप्तानें केलेल्या स्वा-यांचें एकंदर वर्णन, दक्षिणेकडील अकरा राजांवर केलेल्या स्वा-या, आर्यावर्तांतील म्हणजे गंगेच्या कांठच्या प्रदेशांतील नऊ राजांवर केलेल्या स्वा-या, रानांत रहाणा-या रानटी लोकांच्या मुख्यांवर केलेल्या स्वा-या आणि सरहद्दीवरील राजांवर आणि लोकसत्ताक राज्यांवर केलेल्या स्वा-या अशा चार विभागांत केलें आहे. या ग्रंथांत आलेल्या बहुतेक भौगोलिक स्थळांचा शोध हल्लीं लागतो. त्यावरुन समुद्रगुप्त हा मोठा पराक्रमी व प्रख्यात राजा होता असें इतिहासकारांस आतां निश्चितपणें मानण्यास प्रत्यवाय उरला नाहीं. समुद्रगुप्ताची अनेकांगीं विद्वत्ता आणि युद्धकौशल्य हीं दोन्हीं विचारांत घेतां त्याला हिंदुस्थानचा नेपोलियन असें म्हणतां येईल. त्यानें प्रथम उत्तर हिंदुस्थानांतील बहुतेक राज्यें जिंकून तीं आपल्या राज्यांत सामील केलीं होतीं. त्यापैकीं हल्लींच्या शिद्यांच्या मुलुखांत असलेलें पद्मावती नांवाचें प्रसिद्ध शहर ज्याची राजधानी होती त्या गणपति नांवाच्या राजाचा उल्लेख आलेला आहे. उत्तरेकडील राज्यें जिंकल्यावर दक्षिण हिंदुस्थानांतील महानदीच्या कांठच्या दक्षिण कोसल राज्यावर त्यानें प्रथम हल्ला केला. तेथील राजा महेंद्र याला पदच्युत करून ओरिसांतील आणि मध्यप्रांतांतील राज्यें त्यानें जिंकली. नंतर अधिक दक्षिणेकडे चाल करून त्यानें कलिंगाची प्राचीन राजधानी पिष्टपुर (गोदावरी जिल्ह्यांतील पिठापुरम्) व जंगम मधील महेंद्रगिरि व कोत्तुर या किल्ल्यांचे अधिपती, कोलेरू (कोलेर) सरोवरानजीकच्या प्रदेशाचा राजा मंतराज, कृष्णा व गोदावर यांच्या मधील वेंगी येथील (बहुधा पल्लव) राजा, कांची किंवा कांजीवरम् येथील राजा विष्णुगोप, व बहुधा नेलोर जिल्ह्यांत असलेले पालक्क शहर येथील राजा उग्रसेन यांचा पराभव केला. पुढे स्वदेशीं परत येतांना त्यानें देवराष्ट्र म्हणजे हल्लींचा महाराष्ट्र आणि एरंडपल्ल उर्फ खानदेश हे प्रांत जिंकून घेतले. या स्वारींत त्याचीं इ. स. ३५० च्या सुमाराचीं निदान दोन वर्षें खर्च झालीं असावीं. या दक्षिणेकडील स्वारींत त्यानें कोणतेंहि राज्य खालसा न करतां तेथील राजांस फक्त आपलें सार्वभौमत्व कबूल करावयास लाविलें. तथापि त्यानें आपल्या बरोबर सोनें व इतर बरीच लुट मात्र आणली होती. पूर्वेकडे समतट म्हणजे गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्यामधील प्रदेश, कामरूप म्हणजे आसाम, आणि डवाक म्हणजे गंगेच्या उत्तरेकडील बोग्रा (बग्रहा), दिनाजपुर व राजशाही हे जिल्हे, हिमालयाच्या कांठचे नेपाळ आणि कर्तृपूरचें राज्य म्हणजे बहुधा कुमाऊन, अलमोरा, गढवाल, व कांग्रा हा मुलूख इत्यादि राज्यें जिंकून घेतलीं. नंतर पश्चिमेकडील पंजाब, पूर्व राजपुताना व माळवा येथील लोकसत्ताक राज्यें सतलजच्या कांठचें यौधेय जातीचें राज्य व भोपाळ कडील प्रदेशांतील राज्यें त्यानें जिंकलीं. याप्रमाणें चौथ्या शतकांत समुद्रगुप्ताच्या साम्राज्यसत्तेखालीं उत्तर हिंदुस्थानांतील सर्व मुलूख व दक्षिणेकडील बराचसा प्रदेश होता; आणि त्याच्या पलीकडे गंधार व काबुल येथील कुशान राजे, ऑक्झस नदीकांठच्या साम्राज्याचा सिथीयन बादशहा व त्याचप्रमाणें सिलोन व इतर दूरच्या बेटांतील राजे यांच्या दरबाराशीं त्याचें दळण वळण असे. उलटपक्षीं समुद्रगुप्ताच्या दरबारींहि परराज्यांतील वकील येत असत. त्यांपैकीं सिलोन येथून आलेल्या वकिलांची हकीकत विशेष प्रसिद्ध आहे. इ .स. ३६० च्या सुमारास सिलोन येथील बौद्ध राजा सिरिमेघवन्न (श्री मेघवर्ण) यानें दोन भिक्षू बोधगया येथें पाठविले होते. त्यांपैकीं एक राजाचा भाऊ होता असें सांगतात. या दोघांचा अबौद्ध हिंदूंनीं चांगलासा सत्कार केला नाहीं, व त्यामुळें त्यांनां प्रवासांत ब-याच अडचणी सोसाव्या लागल्या. ही हकीकत मेघवर्ण राजाला कळल्यावर त्यानें समुद्रगुप्ताकडे मोठमोठे नजराणे देऊन वकील पाठविले, व गयेस एक मोठा मठ बांधण्याची परवानगी मागितली. समुद्रगुप्तानें ही परवानगी आनंदानें दिली व तदनुसार गया येथें बोधिवृक्षाजवळ ३०-४० फूट उंचीची तीन मजली इमारत बांधली गेली. ह्युएनत्संगानें सातव्या शतकांत जेव्हां या मठाला भेट दिली त्या वेळीं तेथें महायान पंथांतील स्थविर मताचे एकहजार भिक्षू होते.
याप्रमाणें चारहि दिशांनीं दिग्विजय केल्यावर हिंदुस्थानांतील प्राचीन पद्धतीप्रमाणें समुद्रगुप्तानें अश्वमेध यज्ञ करून ब्राह्मणांनां मोठाल्या देणग्या दिल्या. त्या वेळीं अग्निकुंडापुढें यज्ञिय अश्व उभा आहे असें चित्र असलेलीं जीं सोन्याचीं पदकें त्यानें ब्राह्मणांनां दिलीं त्यांपैकीं थोडींशीं हल्लीं सांपडलीं आहेत. या अश्वमेधाचें दुसरें स्मारक उत्तरअयोध्या प्रांतांत सांपडलेली पाषाणावर कोरलेली अश्वाची मूर्ति हे होय. या स्मारकावर एक लेखहि खोदलेला असून तो हल्लीं लखनौ म्यूझिअममध्यें ठेविलेला आहे. उपर्युक्त राजकवीनें केलेलें समुद्रगुप्ताचें गुणवर्णन अतिशयोक्तीचें आहे. तथापि हा राजा संगीतनिपुण होता याबद्दल तरी निदान संशय नाहीं. कारण या वर्णनास हातांत तंतुवाद्य घेऊन बसलेली राजाची मूर्ति असलेलीं जीं सोन्याचीं नाणीं सांपडतात त्यांनीं पुष्टि मिळते. संगीत कलेशीं संबद्ध असलेलीं काव्यकलाहि या अष्टपैलू राजाला अवगत होती. शिवाय त्याला मोठमोठे विद्वान जमवून त्यांच्या सभेंत धर्मतत्वांवर वादविवाद करण्याची अवड असे. समुद्रगुप्त आणि त्याचा राजकवि यांची तुलना अकबर बादशहा आणि त्याचा चरित्रकार अबुल फजल यांच्याशीं करण्यास हरकत नाहीं. दुदैवानें त्याची नाण्यावरील मूर्ति स्पष्ट नसल्यामुळें त्याच्या स्वरूपाबद्दल नीटशी कल्पना करतां येत नाहीं. हा प्राचीन हिंदु सम्राट सुमारें पन्नास वर्षें मोठ्या भरभराटींत राज्य करून इ. स. ३७५ च्या सुमारास मरण पावला.
दु स रा चं द्र गु प्त इ .स. ३७५-४१३.- याला बापाच्या हयातींतच युवराजपद मिळून प्रत्यक्ष राजकारभाराची जबाबदारी उचलावी लागली होती. त्यानें राज्यावर आल्यावर विक्रमादित्य ही पदवी धारण केली. त्याच्या राज्यारोहणाचें साल अद्याप निश्चित झालेलें नाहीं तथापि नाणीं आणि शिलालेख यांच्या सहाय्यानें इ. स. ३७५ हें सालच अखेर नक्की ठरेल अशी खात्री वाटते. चंद्रगुप्तविक्रमादित्यानें माळवा व गुजराथमधून चाल करून, बरींच शतकें परकी शक लोकांच्या ताब्यांत असलेलें सुराष्ट्र उर्फ काठेवाड जिंकून घेतलें. माळवा आणि सुराष्ट्र हे प्रांत-चांगले सुपीक व सुसंपन्न होते; आणि पश्चिमकिना-यावरील बंदरें हातीं आल्यामुळें समुद्रावरून हिंदुस्थानचा इजिप्तच्या मार्गानें यूरोप बरोबर चालणारा व्यापार दुस-या समुद्रगुप्ताच्या हाती आला. अलेक्झांड्रियांतील व्यापा-यांनीं आणलेल्या मालाबरोबर चंद्रगुप्ताच्या दरबारावर व प्रजाजनावर यूरोपीय कल्पनांचा परिणाम होऊं लागला. अशा रीतीनें वाङ्मय, कलाकौशल्य आणि शास्त्रें यांवर गुप्तराजांच्या कारकीर्दींत परकीय संस्कृतीचा जो परिणाम झाला त्याचें वर्णन पुढें येईल.