प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.
समुद्रगुप्त इ. स. ३३०-३७५.- यानें पुष्कळ वर्षें राज्य केलें. त्यांपैकीं बरींच वर्षें त्यानें साम्राज्य वाढविण्याकरितां युद्धें करण्यांत घालविलीं. त्यानें आपल्या विजयाचीं वर्णनें संस्कृत पंडितांकडून लिहवून तीं अशोकानें उभारलेल्या जयस्तंभांवर खोदून ठेविलीं. स्वतः समुद्रगुप्त हा चांगला विद्वान् असून त्याचप्रमाणें तो महत्त्वाकांक्षी, शूर व लढवय्याहि होता. बौद्ध साधू वसुबंधु याच्या जवळून बौद्ध संप्रदायाचीं तत्त्वेंहि त्यानें समजावून घेतलीं होतीं. पण एकीकडे बुद्धाच्या अहिंसातत्त्वाची तारीफ करीत असतांना त्याबरोबरच तो आपल्या समरांगणावरील विजयांची प्रौढीहि मिरवीत असे. समुद्रगुप्ताच्या पराक्रमांचें त्याच्या हरिसेन नांवाच्या राजकवीनें जें गद्यपद्यमय वर्णन करून ठेविलें होतें तें आज उपलब्ध असून त्यावरून तत्कालिन विश्वसनीय माहिती मिळते. हा ग्रंथ इ. स. ३६० च्या सुमारास लिहिलेला असावा. समुद्रगुप्तानें केलेल्या स्वा-यांचें एकंदर वर्णन, दक्षिणेकडील अकरा राजांवर केलेल्या स्वा-या, आर्यावर्तांतील म्हणजे गंगेच्या कांठच्या प्रदेशांतील नऊ राजांवर केलेल्या स्वा-या, रानांत रहाणा-या रानटी लोकांच्या मुख्यांवर केलेल्या स्वा-या आणि सरहद्दीवरील राजांवर आणि लोकसत्ताक राज्यांवर केलेल्या स्वा-या अशा चार विभागांत केलें आहे. या ग्रंथांत आलेल्या बहुतेक भौगोलिक स्थळांचा शोध हल्लीं लागतो. त्यावरुन समुद्रगुप्त हा मोठा पराक्रमी व प्रख्यात राजा होता असें इतिहासकारांस आतां निश्चितपणें मानण्यास प्रत्यवाय उरला नाहीं. समुद्रगुप्ताची अनेकांगीं विद्वत्ता आणि युद्धकौशल्य हीं दोन्हीं विचारांत घेतां त्याला हिंदुस्थानचा नेपोलियन असें म्हणतां येईल. त्यानें प्रथम उत्तर हिंदुस्थानांतील बहुतेक राज्यें जिंकून तीं आपल्या राज्यांत सामील केलीं होतीं. त्यापैकीं हल्लींच्या शिद्यांच्या मुलुखांत असलेलें पद्मावती नांवाचें प्रसिद्ध शहर ज्याची राजधानी होती त्या गणपति नांवाच्या राजाचा उल्लेख आलेला आहे. उत्तरेकडील राज्यें जिंकल्यावर दक्षिण हिंदुस्थानांतील महानदीच्या कांठच्या दक्षिण कोसल राज्यावर त्यानें प्रथम हल्ला केला. तेथील राजा महेंद्र याला पदच्युत करून ओरिसांतील आणि मध्यप्रांतांतील राज्यें त्यानें जिंकली. नंतर अधिक दक्षिणेकडे चाल करून त्यानें कलिंगाची प्राचीन राजधानी पिष्टपुर (गोदावरी जिल्ह्यांतील पिठापुरम्) व जंगम मधील महेंद्रगिरि व कोत्तुर या किल्ल्यांचे अधिपती, कोलेरू (कोलेर) सरोवरानजीकच्या प्रदेशाचा राजा मंतराज, कृष्णा व गोदावर यांच्या मधील वेंगी येथील (बहुधा पल्लव) राजा, कांची किंवा कांजीवरम् येथील राजा विष्णुगोप, व बहुधा नेलोर जिल्ह्यांत असलेले पालक्क शहर येथील राजा उग्रसेन यांचा पराभव केला. पुढे स्वदेशीं परत येतांना त्यानें देवराष्ट्र म्हणजे हल्लींचा महाराष्ट्र आणि एरंडपल्ल उर्फ खानदेश हे प्रांत जिंकून घेतले. या स्वारींत त्याचीं इ. स. ३५० च्या सुमाराचीं निदान दोन वर्षें खर्च झालीं असावीं. या दक्षिणेकडील स्वारींत त्यानें कोणतेंहि राज्य खालसा न करतां तेथील राजांस फक्त आपलें सार्वभौमत्व कबूल करावयास लाविलें. तथापि त्यानें आपल्या बरोबर सोनें व इतर बरीच लुट मात्र आणली होती. पूर्वेकडे समतट म्हणजे गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्यामधील प्रदेश, कामरूप म्हणजे आसाम, आणि डवाक म्हणजे गंगेच्या उत्तरेकडील बोग्रा (बग्रहा), दिनाजपुर व राजशाही हे जिल्हे, हिमालयाच्या कांठचे नेपाळ आणि कर्तृपूरचें राज्य म्हणजे बहुधा कुमाऊन, अलमोरा, गढवाल, व कांग्रा हा मुलूख इत्यादि राज्यें जिंकून घेतलीं. नंतर पश्चिमेकडील पंजाब, पूर्व राजपुताना व माळवा येथील लोकसत्ताक राज्यें सतलजच्या कांठचें यौधेय जातीचें राज्य व भोपाळ कडील प्रदेशांतील राज्यें त्यानें जिंकलीं. याप्रमाणें चौथ्या शतकांत समुद्रगुप्ताच्या साम्राज्यसत्तेखालीं उत्तर हिंदुस्थानांतील सर्व मुलूख व दक्षिणेकडील बराचसा प्रदेश होता; आणि त्याच्या पलीकडे गंधार व काबुल येथील कुशान राजे, ऑक्झस नदीकांठच्या साम्राज्याचा सिथीयन बादशहा व त्याचप्रमाणें सिलोन व इतर दूरच्या बेटांतील राजे यांच्या दरबाराशीं त्याचें दळण वळण असे. उलटपक्षीं समुद्रगुप्ताच्या दरबारींहि परराज्यांतील वकील येत असत. त्यांपैकीं सिलोन येथून आलेल्या वकिलांची हकीकत विशेष प्रसिद्ध आहे. इ .स. ३६० च्या सुमारास सिलोन येथील बौद्ध राजा सिरिमेघवन्न (श्री मेघवर्ण) यानें दोन भिक्षू बोधगया येथें पाठविले होते. त्यांपैकीं एक राजाचा भाऊ होता असें सांगतात. या दोघांचा अबौद्ध हिंदूंनीं चांगलासा सत्कार केला नाहीं, व त्यामुळें त्यांनां प्रवासांत ब-याच अडचणी सोसाव्या लागल्या. ही हकीकत मेघवर्ण राजाला कळल्यावर त्यानें समुद्रगुप्ताकडे मोठमोठे नजराणे देऊन वकील पाठविले, व गयेस एक मोठा मठ बांधण्याची परवानगी मागितली. समुद्रगुप्तानें ही परवानगी आनंदानें दिली व तदनुसार गया येथें बोधिवृक्षाजवळ ३०-४० फूट उंचीची तीन मजली इमारत बांधली गेली. ह्युएनत्संगानें सातव्या शतकांत जेव्हां या मठाला भेट दिली त्या वेळीं तेथें महायान पंथांतील स्थविर मताचे एकहजार भिक्षू होते.
याप्रमाणें चारहि दिशांनीं दिग्विजय केल्यावर हिंदुस्थानांतील प्राचीन पद्धतीप्रमाणें समुद्रगुप्तानें अश्वमेध यज्ञ करून ब्राह्मणांनां मोठाल्या देणग्या दिल्या. त्या वेळीं अग्निकुंडापुढें यज्ञिय अश्व उभा आहे असें चित्र असलेलीं जीं सोन्याचीं पदकें त्यानें ब्राह्मणांनां दिलीं त्यांपैकीं थोडींशीं हल्लीं सांपडलीं आहेत. या अश्वमेधाचें दुसरें स्मारक उत्तरअयोध्या प्रांतांत सांपडलेली पाषाणावर कोरलेली अश्वाची मूर्ति हे होय. या स्मारकावर एक लेखहि खोदलेला असून तो हल्लीं लखनौ म्यूझिअममध्यें ठेविलेला आहे. उपर्युक्त राजकवीनें केलेलें समुद्रगुप्ताचें गुणवर्णन अतिशयोक्तीचें आहे. तथापि हा राजा संगीतनिपुण होता याबद्दल तरी निदान संशय नाहीं. कारण या वर्णनास हातांत तंतुवाद्य घेऊन बसलेली राजाची मूर्ति असलेलीं जीं सोन्याचीं नाणीं सांपडतात त्यांनीं पुष्टि मिळते. संगीत कलेशीं संबद्ध असलेलीं काव्यकलाहि या अष्टपैलू राजाला अवगत होती. शिवाय त्याला मोठमोठे विद्वान जमवून त्यांच्या सभेंत धर्मतत्वांवर वादविवाद करण्याची अवड असे. समुद्रगुप्त आणि त्याचा राजकवि यांची तुलना अकबर बादशहा आणि त्याचा चरित्रकार अबुल फजल यांच्याशीं करण्यास हरकत नाहीं. दुदैवानें त्याची नाण्यावरील मूर्ति स्पष्ट नसल्यामुळें त्याच्या स्वरूपाबद्दल नीटशी कल्पना करतां येत नाहीं. हा प्राचीन हिंदु सम्राट सुमारें पन्नास वर्षें मोठ्या भरभराटींत राज्य करून इ. स. ३७५ च्या सुमारास मरण पावला.
दु स रा चं द्र गु प्त इ .स. ३७५-४१३.- याला बापाच्या हयातींतच युवराजपद मिळून प्रत्यक्ष राजकारभाराची जबाबदारी उचलावी लागली होती. त्यानें राज्यावर आल्यावर विक्रमादित्य ही पदवी धारण केली. त्याच्या राज्यारोहणाचें साल अद्याप निश्चित झालेलें नाहीं तथापि नाणीं आणि शिलालेख यांच्या सहाय्यानें इ. स. ३७५ हें सालच अखेर नक्की ठरेल अशी खात्री वाटते. चंद्रगुप्तविक्रमादित्यानें माळवा व गुजराथमधून चाल करून, बरींच शतकें परकी शक लोकांच्या ताब्यांत असलेलें सुराष्ट्र उर्फ काठेवाड जिंकून घेतलें. माळवा आणि सुराष्ट्र हे प्रांत-चांगले सुपीक व सुसंपन्न होते; आणि पश्चिमकिना-यावरील बंदरें हातीं आल्यामुळें समुद्रावरून हिंदुस्थानचा इजिप्तच्या मार्गानें यूरोप बरोबर चालणारा व्यापार दुस-या समुद्रगुप्ताच्या हाती आला. अलेक्झांड्रियांतील व्यापा-यांनीं आणलेल्या मालाबरोबर चंद्रगुप्ताच्या दरबारावर व प्रजाजनावर यूरोपीय कल्पनांचा परिणाम होऊं लागला. अशा रीतीनें वाङ्मय, कलाकौशल्य आणि शास्त्रें यांवर गुप्तराजांच्या कारकीर्दींत परकीय संस्कृतीचा जो परिणाम झाला त्याचें वर्णन पुढें येईल.
या काळांत पश्चिमेकडील दोन ठिकाणचे क्षत्रप विशेष बलाढ्य होते. त्यांपैकीं एक महाराष्ट्रांतील नाशिक ही राजधानी असलेले शहरात क्षत्रप असून यांनीं आपली सत्ता इसवी सनाच्या पहिल्या शतकांत स्थापन केली. परंतु ती इ .स. १२६ च्या सुमारास आंध्र राजा गौतमीपुत्र यानें नष्ट केली, व तो प्रदेश आंध्र राज्यास जोडला. दुसरी क्षत्रपी सत्ता माळव्यांतील उज्जनी येथें इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या अखेरीस शक चष्टानें स्थापिली व चष्टनाचा नातु पहिला रुद्रदामा यानें इ .स. १२६ ते १५० यांच्या दरम्यान गौतमीपुत्राचा मुलगा दुसरा पुलुमायी याच्यापासून गौतमीपुत्रानें नाशिकच्या क्षहरातांपासून जिंकून घेतलेला बहुतेक सर्व प्रदेश जिंकून घेतला व इतर बाजूंनीहि आपल्या सत्ताक्षेत्राची व्याप्ति पुष्कळ वाढविली. याप्रमाणें पहिल्या रुद्रदामाची सत्ता सुराष्ट्र, माळवा, कच्छ, कोंकण, व इतर ब-याच जिल्ह्यांवर म्हणजे बहुतेक पश्चिम हिंदुस्थानवर स्थापन झाली. चष्टन व तदुत्तर राजे यांची राजधानी उज्जनी हें प्राचीन काळांतील एक मोठें प्रसिद्ध शहर होय. पश्चिम किना-यावरील बंदरें व अंतर्भागांतील प्रसिद्ध ठिकाणें यांच्या मधील व्यापारी संबंध जोडून देणारें उज्जनी हें मध्यवर्ती ठिकाण फार महत्त्वाचें होतें. त्याप्रमाणें प्राचीन संस्कृतविद्येचेंहि तें केंद्रस्थान होतें व हिंदुस्थानांतील मध्यवर्ति ठिकाण समजून तेथून यूरोपांतील सांप्रतच्या ग्रीनिच शहराप्रमाणें पूर्वपश्चिम रेखांश मोजण्यांत येत असत. उज्जयिनीचें विषुववृत्तापासून अंतर ''निरक्षदेशात् क्षितिषोडशांशे भवदेवंती गणितेनयस्मात्'' या श्लोकपादांत दिलेलें आहे. अशी सुप्रसिद्ध राजधानी असलेल्या राज्याचा या वेळीं रुद्रसिंह हा क्षत्रप होता. हें बलाढ्य व सुसंपन्न पण परकी अमलाखालींल राज्य नष्ट करून तो मुलुख आपल्या राज्यास जोडण्याच्या हेतूनें दुस-या चंद्रगुप्तानें त्याच्यावर स्वारी केली, रूद्रसिंहाला पदच्युत करून ठार मारलें, आणि तो मुलुख आपल्या साम्राज्यास जोडला. या परकी क्षत्रपाची नालस्ती करणारी अशी एक दंतकथा आहे कीं, हा शकांचा राजा दुस-या एका माणसाच्या बायकोशीं प्रेमयाचना करीत असतां व चंद्रगुप्त आल्यामुळें भिऊन त्या स्त्रीच्या अंगावरील वस्त्राखालीं लपला असतां ओढून काढून चंद्रगुप्तानें त्याला ठार मारलें. अर्थात् या दंतकथेंत ऐतिहासिक सत्य असेलसें दिसत नाहीं. सदरहू राजाचा अंत इ. स. ३८८ नंतर लवकरच झाला.
दुस-या चंद्रगुप्तानें सुमारें चाळीस वर्षें राज्य केलें. गुप्तराजे पाटलिपुत्र ही राजधानी बाजूला बसल्यामुळें प्राचीन अयोध्याशहरीं मधून मधून राहूं लागले व त्यामुळें पाटलिपुत्र नगरीचें महत्व कमी झालें आणि पांचव्या शतकांत या अयोध्या नगरीलाच अधिक महत्त्व होतें. शिवाय समुद्रगुप्तानें ज्यावर आपल्या कारकीर्दींतील हकीकत लिहून ठेविली तो अशोकाचा स्तंभ कौशांबी नगरी येथें होता असें मत आहे. या शहरींहि गुप्त राजे कधीं कधीं राहत असत व त्यामुळें त्या नगरीला तात्पुरतें राजधानीचें स्वरूप येत असें. चंद्रगुप्तविक्रमादित्यानंतरचे गुप्त राजे मात्र पाटलिपुत्र येथेंच कायम राहिल्यामुळें सहाव्या शतकांत हूणांच्या स्वारीपर्यंत पाटलिपुत्र हें शहर चांगलें भपकेदार व लोकांनीं गजबजलेलें होतें. इ .स. ६४० मध्यें चिनी प्रवाशी हुएनत्संग तेथें गेला तेव्हां या शहराचा बराचसा भाग नाश होऊन पडलेला त्यास दिसला व सुमारें १००० लोकवस्तीच्या, गंगेच्या कांठी असलेल्या व तट असलेल्या लहान शहराखेरीज बाकी सर्व ओसाड प्रदेश पडला होता असें त्यानें लिहून ठेविलें आहे. पुढें हर्ष राजानें आपल्या कारकीदींत (६१२-४७) या प्राचीन राजधानीचें पुनरुज्जीवन न करतां गंगा व यमुना या नद्यांमध्यें वसलेल्या कनोज शहरीं आपली राजधानी स्थापिली. पुढें बंगाल व बहार प्रांतांतील पाल राजांपैकीं सर्वात बलिष्ठ राजा धर्मपाल यानें पाटलिपुत्रनगर चांगलें बनवले. कारण इ. स. ८११ च्या सुमारास तेथें तो दरबार भरवून राज्य कारभार पहात असे अशी निश्चित माहिती मिळते. तथापि नंतर लवकरच पुन्हां पाटलिपुत्र नगर मार्गे पडून १५४१ पर्यंत त्याचे नांव इतिहासांत ऐकुं येत नाहीं. पुढें शीरशहानें युद्धविषयक हालचालींच्या सोयीच्या दृष्टीनें या शहराचें महत्त्व लक्षांत घेऊन तेथें एक किल्ला बांधिला व तेव्हांपासून हें नवें पाटणा शहर चांगले भरभराटींत आहे. १९१२ पासून बहार ओरिसा प्रांताची राजधानी पाटणाशहर झालें आहे व पाटणाशेजारचें बंकीपूर हें ठिकाण खुद्द प्राचीन पाटलिपुत्र नगरीच्या एका भागावर वसलेलें आहे.
प हि ला चि नी प्र वा शी फ हि आ न.- याच चंद्रगुप्ताच्या कारकीर्दींत चीनमधील पहिला प्रवासी फा- हिआन हा हिंदुस्थानांत येऊन बौद्धग्रंथ, कथा, व चमत्कार यांचें ज्ञान मिळविण्याकरितां सहा वर्षें (इ .स. ४०५-४११) राहिला होता. त्यानें आपल्या प्रवासवर्णनांत लिहून ठेविलेल्या वर्णनावरून हिंदुस्थानांतील तत्कालीन परिस्थितीची चांगली कल्पना येते. विक्रमादित्याच्या साम्राज्यांतील लोक शांततेंत, सुखांत व भरभराटींत होते असें त्याच्यावरून स्पष्ट दिसतें. पाटलिपुत्र येथील अशोकाचा राजवाडा पाहून त्याच्या मनावर फार परिणाम झाला. ती मनुष्यकृति नसून बादशहाला वश असलेल्या पिशाचांनीं तो बांधला अशी समजूत होती. तेथेंच अशोकाचा म्हणून प्रसिद्ध असलेला एक स्तूप होता व त्याच्या शेजारी दोन मोठाले मठ असून त्यांपैकीं एकांत महायानपंथाचे व दुस-यांत हीनयानपंथाचे मिळून एकंदर सहासातशें चांगले विद्वान् भिक्षू होते. तेथें तीन वर्षें राहून फाहिआननें संस्कृत भाषेचा व अनेक बौद्धग्रंथांचा अभ्यास केला. मगधांतील शहरेंहि चांगलीं संपन्न होतीं. देणग्यांवर चाललेल्या संस्था पुष्कळ होत्या, प्रवाशांनां उतरण्याकरितां धर्मशाळा मोठाल्या रस्त्यावर जागजागीं होत्या, व राजधानीच्या शहरीं मोठा मोफत दवाखाना होता. त्यांत ''सर्व गरीब व निराश्रित अशा लोकांस आजारीपणांत औषधपाणी देण्याची व शुश्रूषा करण्याची उत्तम सोय होती'' असें फा-हिआन लिहितो. सिंधूनदीपासून यमुनेच्या कांठच्या मथुरानगरीपर्यंत जागजागीं अनेक मोठाल्या मठांत हजारो भिक्षू राहत असलेले त्याला आढळले व त्यावरून बौद्धधर्माची लोकप्रियता त्या प्रांतांत वाढत होती असें दिसतें. मथुरेच्या दक्षिणेकडील माळव्याचा प्रदेश हवापाण्याच्या, लोकस्थितीच्या व राजकारभाराच्या दृष्टीनें या चिनी प्रवाशाला फारच आवडला. चिनीदेशाच्या मानानें हिंदुस्थानांत प्रवाशास वाटेल तिकडे जाण्यायेण्यास फार मोकळीक असे, फौजदारी कायदा सौम्य होता, पुष्कळशा गुन्ह्यांना दंडाची शिक्षा असे, व फांशीची शिक्षा बहुतेक कधींच होत नसे, सरकारी अधिका-यांचे पगार ठरलेले असल्यामुळें त्यांचा रयतेवर जुलुम होत नसे, वगैरे अनेक गोष्टी पाहून फा हिआननें समाधान व्यक्त केलें आहे. तो म्हणतो, 'या सर्व देशांत कोणी कोणतीहि हिंसा करीत नाहीं, दारू पीत नाहीं, कांदे किंवा लसून खात नाहीं. कोणी कोंबड्याबदकें पाळीत नाहीं, गुरें विकीत नाही, बाजारांत खाटकांची दुकानें किंवा दारु गाळण्याच्या भट्या नाहींत.'' चलनामध्यें कवड्या होत्या, बौद्ध मठांना राजाकडून मोठाल्या देणग्या होत्या, व बौद्ध भिक्षूंना अन्न, वस्त्र वगैरे सर्व प्रकारची भिक्षा निःसंकोचपणानें मिळत असे.
या एकंदर वर्णनावरून चंद्रगुप्त विक्रमादित्याचा राज्यकारभार फार चांगला होता व लोक सुखी होते हें स्पष्ट दिसतें. सदरहू चिनी प्रवाशाला पाटलिपुत्र येथें तीन वर्षें व ताम्रलिप्ति (तमलूक) येथें दोन वर्षें संस्कृतचा अभ्यास निर्वेध करतां आला व वाटेनें प्रवासांतहि कोठें चोरादिकांचे संकट आलें नाहीं. उलटपक्षीं सातव्या शतकांतला चिनी प्रवाशी ह्युएनत्संग यानें प्रवासांत संकटें आल्याचें नमूद केलें आहे. यावरून प्राचीन पौरस्त्य पद्धतीची चंद्रगुप्ताची अमदानी शेवटची होय. सरकार प्रजेवर शक्य तितके कमी निर्बंध ठेवून लोकांना मोकळीक फार देत असे व त्यामुळें सरकार लोकप्रिय असे. बौद्ध, जैन वगैरे कोणाचाहि धर्मछळ होत नसे, असें बौद्ध संप्रदायभक्त फा-हिआन स्वतः म्हणतो. पण ब्राह्मणी गुप्त राजांच्या कारकीर्दींत बौद्ध धर्माला उतरती कळा लागून ब्राह्मणधर्माचें वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होण्यास सुरूवात झाली होती, ही गोष्ट मात्र या चिनी प्रवाश्याच्या लक्षांत आली नव्हती असें दिसतें. शिवाय गया शहर रिकामें निर्जन झालें होतें. तेथून सहा मैलावरचें बौद्ध-गया हें ठिकाण जंगलानें व्यापलें होतें, रावी नदीच्या कांठचें मोठें शहर श्रावस्ती, येथें फक्त दोनशें कुटुंबेच उरलीं होतीं. आणि कपिलवस्तु व कुशिनगड हीं पवित्र स्थानें पूर्ण ओसाड पडलीं होतीं फक्त क्वचित् कोठें थोडे भिक्षू राहत असत. या स्थानांची अशी स्थिति होण्याचीं कारणें कळत नाहींत.