प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.

कुमारगुप्त (४११-४५५).- विक्रमादित्यानंतर त्याचा मुलगा पहिला कुमारगुप्त इ. स. ४१३ मध्यें गादीवर आला. त्यानें चाळीसाहून अधिक वर्षें राज्य केलें पण त्याच्या कारकीर्दींतील गोष्टींची माहिती नाहीं. शिलालेख व नाणीं यावरून एवढें मात्र ठरतें कीं, याच्या दीर्घ कारकीर्दींत साम्राज्याचा विस्तार मुळींच कमी झाला नव्हता. उलटपक्षीं ज्याअर्थीं त्यानेहि अश्वमेध यज्ञ केला त्याअर्थीं त्यानें कांहीं नवीन दिग्विजय केला असावा. मात्र या कारकीर्दींच्या अखेरीस म्हणजे इ .स. ४५० च्या सुमारास परकी हूण लोकांनीं हिंदुस्थानावर स्वारी केल्यामुळें हें गुप्तसाम्राज्य लयास गेलें.