प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.

गुप्त साम्राज्यकालीन परिस्थिति.- ख्रिस्ती शकारंभाच्या पूर्वीं दोन शतकें व नंतर दोन शतकें उत्तर हिंदुस्थान, कश्मीर, अफगाणिस्तान व सुवात इतक्या प्रदेशांत बौद्धधर्म ब-याच प्रमाणांत पसरलेला होता ही गोष्ट त्या काळांतील बुद्धाच्या अनेक स्मारकालयांवरून व शिलालेखावरून स्पष्ट दिसतें. बौद्धधर्माशीं विशेष सदृश असा जो जैनधर्म तो मात्र विशेष पसरलेला नव्हता. तथापि मथुरा वगैरे कांहीं विशिष्ट स्थळीं त्याचे अनुयायी पुष्कळ होते. या चार शतकांत बौद्धधर्माचा पगडा उत्तरहिंदुस्थानांत मोठा होता, तथापि जुना हिंदुधर्म व त्यांतील यज्ञयाग पूर्णपणे नष्ट झाले नव्हते. दुसरा कडफिसेस या परकी कुशान राजालाहि हिंदुधर्मानें वश करून घेऊन त्याला शिवाची भक्ति करण्यास लाविलें होते बौद्धधर्माच्या महायानपंथांत जातिसंस्थाविहीन अशा परकीयांच्या मनांमध्यें पूज्यभाव उत्पन्न होण्यासारख्या गोष्टी होत्या आणि कनिष्क व तदनंतरचा हुविष्क या परकी राजांनीं बौद्धांच्या मठादि संस्थांना सढळ हातानें देणग्या दिल्या होत्या. पण दुसरा कॅडफिसेस राजा पुन्हां हिंदुधर्माकडेच वळला, तसेंच सुराष्ट्र येथील शक क्षत्रपांनींहि हिंदुधर्म व ब्राह्मणांची संस्कृत विद्या यांनांच आश्रय दिला. शिवाय महायानपंथ व हिंदुधर्म यांच्यामध्यें कित्येकदेवतांच्या बाबतींत इतकें साम्य आहे की कोणत्या देवतेचा कोणत्या धर्मपंथांत अन्तर्भाव होतो हें ठरविणें चांगल्या तज्ज्ञांनाहि कठीण पडतें. याला कारणें काय झाली हें अद्याप नक्की समजत नाहीं. परंतु येवढें खरे कीं, ख्रिस्तोत्तर दुस-या शतकांत ब्राह्मणीधर्म व संस्कृत भाषा यांनां पुन्हां चढती कळा लागली. तिस-या शतकांत गुजराथ व सुराष्ट्र येथील परकी क्षत्रयांनीसुद्धां त्यांचा पुरस्कार केला आणि चवथ्या व पांचव्या शतकांत तर गुप्त सम्राटांनीं हिंदुधर्माचा अम्मल पूर्ववत् सर्वत्र बसविला. गुप्त राजे बौद्ध व जैन धर्मीयांनां पूर्ण सहिष्णुतेनें वागवीत असत, पण ते स्वतः पक्के हिंदु होते, संस्कृत भाषेचे व पंडितांचे आश्रयदाते होते व ब्राह्मणांच्या सल्ल्यानें चालणारे होते. बौद्धांचा यज्ञयागनिषेध खोटा ठरवून त्यांनीं अश्वमेधासारखे यज्ञ पुन्हां सुरू केले, तात्पर्य गुप्तांच्या कारकीर्दींत बौद्धधर्म मागें पडून ब्राह्मणी हिंदुधर्म पुन्हां चांगला बळावला.

गुप्तांच्या काळात संस्कृत वाङ्मयांत चांगली भर पडली. चंद्रगुप्तविक्रमादित्यानें उज्जनी जिंकून घेतली होती उज्जनींतील विक्रमराजाच्या दरबारीं कालीदासादि नऊ विद्वद्रत्नें होतीं अशी आख्यायिका आहे. अर्थात् कालीदास हा श्रेष्ठ कवि ख्रिस्तोत्तर पांचव्या शतकांतील होय. तसेंच मृच्छकटीक, मुद्राराक्षस, वायुपुराण, मनुस्मृति वगैरे ग्रंथहि याच गुप्तकाळांतील होत असें व्हिन्सेंट स्मिथचें मत आहे. गणित व ज्योतिष या शास्त्रांतील प्रसिद्ध ग्रंथकार आर्य व वराहमिहिर हेहि याच काळातले होत.

ललित वाङ्मय व शास्त्रीय वाङ्मय याप्रमाणें कलाकौशल्यहि चांगलें वाढलेलें या काळांत दृष्टीस पडतें. समुद्रगुप्त स्वतः संगीताचा ज्ञाता व चहाता होता. संगीताप्रमाणें शिल्पकला, चित्रकला, मूर्तिकला यांची अनेक उत्तम कामें या काळांत झालीं. परंतु पुढें मुसुलमानांच्या अनेक हल्ल्यांत तीं बहुतेक नष्ट होऊन गेलीं. तथापि अलीकडील संशोधनांत त्या काळांतले पुष्कळ अवशेष उपलब्ध होत आहेत. त्यांवरून गुप्त घराण्याचे वेळीं सर्वच प्रकारचे बौद्धिक हुषारीचे व्यवसाय फारच जोमांत होते असें नक्की ठरतें. हिंदुधर्माभिमानी, विद्वान् व रसिक अश गुप्तराजांनी दिलेला आश्रय हें या उत्कषीचें एक कारण आहे. तथापि इतिहासाचा असा अनुभव आहे की, परस्पर भिन्न अशा संस्कृतीचा संबंध व झगडा जेथें सुरू असतो तेथे बौद्धिक व कलाविषयक प्रगति झपाट्यानें होते, आणि गुप्तांच्या वेळची प्रगति याच कारणानें झाली. त्या वेळी एकीकडे चीन देश व दुसरीकडे रोमन साम्राज्य यांच्याशी हिंदुस्थानचा संबंध येऊन चिनी व ग्रीकोरोमन संस्कृतींचा परिणाम होऊं लागला. या स्पर्धेमुळें हिंदुसंस्कृतीचें पुनरुज्जीवन झालें व त्याबरोबर परकी संस्कृतीतील ज्ञानाची कांहीं भर हिंदुशास्त्रें व कला यांत पडली. (ज्ञानकोश पहिला विभाग पृष्ठ ३२५).