प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १५ वें.
अराजकापासून महंमदी स्वा-यापर्यंत हिंदुस्थान.
उत्तर हिंदुस्थानांतील प्रमुख राज्यें.- हर्षानंतर सर्व हिंदुस्थानावर साम्राज्य करणारा कोणी निघाला नाहीं. तथापि प्रांतानिहाय अनेक लहान लहान राज्यें सुव्यवस्थित रीतीनें नांदत होतीं. त्यांपैकीं प्रथम उत्तर हिंदुस्थानांतील प्रमुख राज्यांची माहिती थोडक्यात येथें देतों.
का श्मी र.- कल्हण पंडिताचा राजतरंगिणी ग्रंथ, ह्युएनत्संगाचे लेख वगैरे आधारांवरून काश्मीरचा इतिहास समजतो. काश्मिरावर अशोकाचें व नंतर कुशान घराण्यांतील कनिष्क व हुविष्क यांचें साम्राज्य होतें. पुढें इ. स. ६०२ मध्यें पूर्वींच्या गोनर्दीय वंशातील बालदित्य नांवाचा निपुत्रिक राजा मरण पावला; तेव्हा त्याचा दुर्लभवर्धन नांवाचा अधिकारी व जामात राज्यावर आला. ह्या राजवंशाला कर्कोटक वंश असें नांव आहे. या वंशांत एकंदर १७ राजे झाले व त्यांनीं इ .स. ६०२ पासून ८५६ पर्यंत काश्मिरांत राज्य केलें. यांतील प्रमुख राजांची सनावली येणें प्रमाणें.- १ दुर्लभवर्धन (इ. स. ६०२-६३७), २ दुर्लभक उर्फ प्रतापादित्य (६३७-६८७), ३ चंद्रापीड (६८७-६९५), ४ तारापीड (६९५-६९९), ५ मुक्तापीड उर्फ ललितादित्य (६९९-७३५), ६ कुवलयापीड [७३६], ७ वज्रापीड [७३६-७४३], ८ संग्रामपीड [७४३-७५०], ९ जयापीड (७५०-७८२).
पहिला राजा दुर्लभवर्धन राज्य करीत असतां ह्युएनत्संग काश्मिरांत आला. त्या वेळीं बौद्धसंप्रदायाला उतरती कळा लागलेली त्याच्या दृष्टीस पडली. दुसरा राजा प्रतापादित्य याच्या न्यायप्रियतेच्या व प्रजाहिततत्परतेच्या पुष्कळ गोष्टी कल्हणानें सांगितल्या आहेत. ललितादित्य हा या घराण्यांतील सर्वांत पराक्रमी राजा होय. त्याच्या दिग्विजयाचें वर्णन राजतरंगिणींत सविस्तर केलें आहे. त्यानें मोठमोठी देवालयें व विहार बांधले पैकीं मार्तंडाचें (सूर्याचें) मंदिर अद्याप प्रसिद्ध आहे.
जयापीड हा या घराण्यांतील आणखी एक प्रसिद्ध राजा होय. यानेंहि दिग्विजयास निघून कनोज, बंगाल वगैरे दोन चार प्रांतांतील राजांचा पराभव केला. विद्वानांचा आश्रयदाता म्हणून जयापीडाची प्रसिद्धि त्याचा आजा ललितादित्य याहूनहि अधिक आहे. जयापीडानंतर या घराण्यास उतरती कळा लागून शेवटचा राजा अनंगपीड याला इ. स. ८५५ मध्यें उत्पल घराण्यांतील अवन्तिवर्मा यानें पदच्युत करून स्वतःगादी बळकावली.
या पुढील काळांत काश्मिरांत उत्पल घराणें (८५५-९४०), (२) वीरदेवाचा वंश (९४०-९४९), (३) दिविर वंश (९५०-१००३), (४) लोहर वंश (१००३-११०१), (५) सातवाहन वगैरे घराणीं झालीं. पैकीं उत्पल घराण्याचा पहिला राजा अवन्तिवर्मा हा विद्वानांचा आश्रयदाता होता. त्यानें आपल्या सुय्य नांवाच्या मंत्र्याच्या साहाय्यानें अनेक नद्यांनां बंधारे घालून ठिकठिकाणीं कालव्याचीं कामें करून घेतलीं व हजारों एकर पडित जमीन लागवडीखाली आणली. उत्पल घराण्यांतील पुढील राजे जुलुमी किंवा दुर्बल निघाले. पार्थ नांवाच्या राजाच्या कारकीर्दींत इ. स. ९१७-१८ सालीं काश्मिरांत इतका भयंकर दुष्काळ पडला कीं 'वितस्ता (झेलम) नदी प्रेतांनीं भरून गेली व जमीन हाडांनीं आच्छादून गेल्यामुळें सर्वत्र श्मशानभूमीसारखा देखावा दिसूं लागला' असें एक ब्राह्मण बखरकार म्हणतो. पार्थ व त्याचा मुलगा उन्मत्तावंति यांनीं प्रजेचा भयंकर छळ केला.
यानंतर उत्पल घराणें नष्ट होऊन वीरदेवाचा वंश राज्य करूं लागला. त्यानंतरच्या दिविर घराण्याचा वेळीं दिद्दा नांवाच्या राणीनें सुमारें पन्नास लोकांस फार त्रास दिला. या घराण्यांतील संग्रामदेवाच्या कारकीर्दीत गझनीच्या महमदानें काश्मिरावर स्वारी केली. तथापि तो देश पर्वतांच्या ओळींनीं संरक्षित असल्यामुळें काश्मिरचें स्वातंत्र्य कायम राहिलें.
त्यानंतरच्या लोहर घराण्यांपैकीं कलश व हर्ष हे राजे फार जुलमी झाले. कल्हणानें राजतरंगिणीमध्यें इ. स. ११४८ पर्यंतचा इतिहास दिला आहे. त्या नंतरच्या दोन शतकांत काश्मिरांत अंतस्थ कलहांनीं फाटाफूट झालेल्या स्थितींत एक लहानसें स्वतंत्र राज्य होतें. शेवटी इ. स. १३३९ त काश्मिरच्या दक्षिणेकडून आलेल्या एका शहामीर नांवाच्या धाडशी मुसुलमानानें काश्मिरच्या शेवटच्या हिंदुराजाच्या कोटानामक राणीला पदच्युत करून तेथें आपलें मुसुलमानी घराणें चालू केलें. मुसुलमानी संप्रदायानें क्रमाक्रमानें आपलें पाऊल तेथें रोवण्यास सुरूवात केली. तथापि ब्राह्मणांनीं आपलें वर्चस्व धर्मत्याग न करतां कायम ठेविलें आणि विद्या व सरकारी महत्त्वाचीं कामें आपल्या हातून जाऊं दिलीं नाहींत.
काश्मीर देश पहिल्यापासून विद्येबद्दल प्रसिद्ध आहे. तेथील राजे पंडितांचे मोठे आश्रयदाते असत. काश्मिरी पंडितांची ख्याति सर्व हिंदुस्थानभर असे. त्यांच्या नांवांत एक विशेष आढळतो तो असा कीं, त्यांच्या शेवटीं ट किंवा ण हें अक्षर नेहमी येतें. उद्भट, मम्मट, लवट, कय्यट, तसेंच कल्हण, बिल्हण, सल्हण वगैरे नांवे प्रसिद्ध आहेत.
ने पा ळ.- हा हिमालयाच्या पायथ्याचा देश बहुतेक डोंगरांनीं व द-यांनीं आच्छादिलेला आहे. अद्यापहि तेथील सरकार यूरोपीय वगैरे सर्व परकीयानां स्वराज्यांत फिरकुं देत नसल्यामुळें या देशाची फारशी माहिती उपलब्ध नाहीं. काश्मिरातील वंशावळीप्रमाणें इ. स. १७६८ सालीं पृथिवीनारायणाच्या नेतृत्वाखालीं गुरखे लोक नेपाल जिंकीपर्यंतच्या राजांचा इतिहास बहुतेक दंतकथात्मक असून तो डॉ.राइटनें लिहिला आहे. अशोकाच्या व समुद्रगुप्ताच्या शिलालेखांवरून हा प्रांत त्या सम्राटांच्या राजकीय वर्चस्वाखालीं होता असें दिसते.
नेपाळांतील मूळ रहिवाशी नेवार नांवाचे असून ते मोंगोलियन लोकांच्या वंशाचे आहेत. शिवाय भारतीय आर्य व मिश्रआर्य यांची वस्ती तेथें आहे. भारतीय आर्यांनीं ऐतिहासिक काळांत नेपाळांत प्रवेश केला. त्यांतील अगदीं अलीकडची स्वारी म्हणजे चितोडच्या शिशोद्यांचे वंशज म्हणविणा-या गुरख्यांची होय. नेवारांपेक्षां गुरखे लोक अधिक गौरवर्ण असून त्यांच्यांत हिंदुधर्माचा कडक अभिमान आहे.
ह्युएनत्संगाच्या वेळीं तेथें लिच्छवी जातीचें घराणें राज्य करीत होतें. पुढें एक दोन शतकें नेपाळवर तिबेटचें अधिराज्य होतें. इ .स. ८७९ मध्यें नेपाळ स्वतंत्र झाला असें दिसतें. कारण त्या सालाच्या आक्टोबर महिन्यापासून नवीन नेपाळी शक सुरू झाला. इ. स. १७६८ मध्यें गुरखे लोकांनीं नेपाळ देश जिंकला. तेव्हांपासून गुरखा जातीचें घराणें नेपाळवर राज्य करीत आहे.
अशोकाच्या वेळीं बौद्धसंप्रदाय नेपाळांत शिरला. सातव्या शतकांत तेथें महायान पंथाचें प्राबल्य होतें. परंतु पुढें त्या संप्रदायास उतरती कळा लागून हल्लींच्या गुरखे राजांच्या अमलामध्यें बौद्ध लोक हिंदू बनत असल्यामुळें बौद्ध संप्रदाय लवकरच पूर्ण नष्ट होईल असें दिसतें.
नेपाळांतील व हिंदुस्थानांतील बौद्ध लोक हिंदूनीं मोठाल्या लढाया, छळ व कत्तली करून नष्ट केले असें जे एक मत आहे तें निराधार असल्याबद्दल नेपाळचें उदाहरण उत्तम साक्ष पटवितें.
कनोज.- हर्षराजा इ. स. ६४७ मध्यें मरण पावला. त्यावेळीं त्याला कोणी वारस नव्हता. त्यामुळें जिकडे तिकडे अस्वस्थता माजून महत्त्वाकांक्षी लोकांनां चांगलें फावलें. येथें ७ व्या शतकाच्या अखेरीस मौखरी घराण्यापैकीं यशोवर्मा नांवाचा पुरूष राज्य करीत होता असें दिसतें. हा यशोवर्मा विद्वानांचा मोठा चहाता असून भवभूति, वाक्पतिराज इत्यादि सुप्रसिद्ध कवी त्याच्या पदरीं होते. गौडवाहो नामक काव्यांत यशोवर्म्याचेंच पराक्रमवर्णन आलेलें आहे. त्यानें हर्षाप्रमाणें दिग्विजयाचा उपक्रम केला, पण काश्मीरचा राजा ललितादित्य यानें त्याचा पराभव केला व त्याला मांडलिक बनविलें. यशोवर्म्यांच्या कारकीर्दींतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैदिकधर्माचें पुनरुज्जीवन व बौद्धसंप्रदायाचा -हास ही होय. यशोवर्म्यानंतर या घराण्यात उतरती कळा लागून तें इ. स. ८१६ मध्यें नागभट्ट नांवाच्या प्रतिहार राजानें लयास नेलें. प्रतिहार घराण्यांत नागभट्ट, रामभद्र व मिहिर यांच्यानंतर मिहिरमोज (इ. स. ८४०-८९०) हा मोठा पराक्रमी राजा झाला. त्यानें आग्रा, अयोध्या, ग्वालेर, राजपुताना, पंजाब, काठेवाड, वगैरे प्रांतांवर आपलें साम्राज्य स्थापलें. याच्यानंतर कनोजच्या राज्यास पुन्हां उतरती कळा लागली. या घराण्यांतले पुढील राजे येणेंप्रमाणे:-
१ महेंद्रपाल ४ देवपाल (९४०-५५)
२ दुसरा भेज ५ विजयपाल (९५५-९०)
३ महिपाल (इ. म. ९१०-४०) ६ राज्यपाल
राज्यपालाच्या वेळीं हिंदुस्थान व वर गझनीचा राजा सबक्तगीन व त्याचा मुलगा सुलतान महमूद यांनीं स्वा-या केल्या त्या वेळी जयपालाच्या नेतृत्वाखाली हिंदु राजांनी या परकीयांच्या स्वारीस जो विरोध केला त्यांत कनोजचा राज्यपाल सामील होता. पुढें इ.स. १०१९ मध्यें सुलतान महमुदानें खुद्द कनोजवर स्वारी करून राज्यपालाचा पराभव केला. तथापि पुढेंहि बरीच वर्षे प्रतिहार घराणें टिकाव धरून होते. १०९० मध्यें तें नष्ट होऊन कनोज येथें गहखार नांवाचें किरकोळ घराणें राज्य करीत राहिले. अखेर दिल्लीच्या महंमदघोरीनें कनोजचें राज्य खालसा केलें.
माळवा- इ. स. ८०० च्या सुमारास माळव्यांतील उज्जयिनी येथें परमार नांवाच्या घराण्याचे राजे राज्य करीत होते. या घराण्याचा संस्थापक उपेंद्र उर्फ कृष्णराज हा होय. या घराण्यांतला संस्थापक उपेद्र उर्फ कृष्णराज हा होय. या घराण्यांतला सातवा राजा मुंज हा मोठा विद्वान व वक्ता होता; इतकेंच नव्हे तर तो कवींचा आश्रयदाता असून शिवाय स्वतःहि कवि होता. मुंजाचा पुतण्या सुप्रसिद्ध भोजराजा हा इ. स. १०१८ मध्यें राज्यावर येऊन त्यानें चाळीस वर्षांवर राज्य केलें. तो फार विद्वान असून त्याप्रमाणेंच युद्धकलेंतहि निपुण होता, ज्योतिष, शिल्प, काव्य व इतर अनेक विषयावर भोजकृत ग्रंथ आहेत असें मत प्रचलित आहे. एकंदरीनें समुद्रगुप्तप्रमाणें भोजराजाची बुद्धिमत्ता असामान्य होती यांत संशय नाहीं. भोजराजानें स्थापन केलेलें एक संस्कृत महाविद्यालयहि प्रसिद्ध होतें. भोपाळजवळील विस्तिर्ण तलाव (ज्याचें क्षेत्र फळ २५० चौरस मैल होतें,) हें भोजराजाचें एक फार मोठें स्मारक होय. नंतर एका मुसुलमान राजानें त्याचा बंधारा फोडून पाणी बाहेर काढून लावल्यामुळें हल्लीं त्या तलावाच्या जागीं उत्तम सुपीक जमीन झाली आहे. पुढें गुजराथ व चेदी येथील राजांनीं हल्ला केल्यामुळें या राज्याचें वैभव कमी झालें. तथापि १३|१४ व्या शतकापर्यंत तेथें लहान लहान हिंदू घराण्यांनीं राज्य केलें. १४०१ मध्यें तेथें एक मुसुलमान घराणें राज्य करूं लागलें व अखेर १५६९ मध्यें अकबरानें माळवा प्रांत आपल्या साम्राज्यांत सामील केला.
ब हा र व बं गा ल.- हर्षाची साम्राज्यसत्ता या प्रांतावर होती. त्याच्या मरणानंतर तेथील स्थानिक राज्यें स्वतंत्र होऊं लागलीं. रा. चिं .वैद्य यांच्या मतें इ. स. ७८० च्या सुमारास बंगालवर गोपाळ नांवाचा राजा राज्य करूं लागला. हाच बंगाल्यांतील सुप्रसिद्ध पाल घराण्याचा आदिपुरूष होय. गोपाल हा बौद्ध संप्रदायी होता. या घराण्यांतील राजांची नांवें व त्यांपैकीं कांहींचे अजमासें सन येणें प्रमाणें. १ गोपाल (७८०-८००), २ धर्मपाल (८००-८२५), ३ देवपाल (८२५-८५०), ४ विग्रहपाल (८५०-७५), ५ नारायणपाल (८७५-९००), ६ राज्यपाल (९००-२५), ७ गोपाल २ रा (९२५-५०), ८ विग्रहपाल (९५०-७५), ९ महीपाल १ ला (९७८-१०३०), १० नयपाल, ११ विग्रहपाल, ३रा, १२ महीपाल २ रा, १३ रामपाल, १४ गोविंदपाल इत्यादि.
१० व्या शतकाच्या उत्तरार्धांत कंभोज नांवाच्या डोंगरी लोकांनीं पाल घराण्याचा पराभव करून तेथे आपली सत्ता स्थापली. परंतु पहिला महीपाल यानें कंभोजांनां हांकून देऊन आपला अंम्मल पूर्ववत् बसविला. अखेर मुसुलमानांनीं इ. स. ११९७ मध्यें पाल घराणें नष्ट करून बंगालप्रांत काबीज केला.
हिंदुसथानच्या इतिहासांत पाल घराणें विशेष नांवाजण्यासारखें आहे. कारण आंध्र घराण्याखेरीज सतत चार साडेचार शतकें राज्य करणारें दुसरें घराणें आढळत नाहीं. प्रथम पाल घराण्याची सत्ता बहार वगैरे ब-याच भागावर होती. परंतु इ. स. १०८० मध्यें झालेल्या कैवर्तबंडाच्या सुमारास दक्षिणेकडील सामन्तदेव नांवाच्या पुढा-यानें बंगालकडे स्वारी केली व पुढें त्याचा नातु विजयसेन यानें १२ व्या शतकाच्या आरंभीं बंगालचा बराचसा भाग पाल राजांपासून जिंकून घेतला. हळू हळू हें सेन घराणें बरेंच प्रबळ बनलें. हे सेन राजे हिंदू ब्राह्मण असल्यामुळें ते बौद्धसंप्रदायी पाल राजांचा द्वेष करीत असत. या सेन घराण्यांत विजयसेन (इ .स. १११९-५८), बल्लाळसेन (११५८-११७०) व लक्ष्मणसेन (११७०-१२००) हे राजे झाले. १२०० च्या सुमारास हीं दोन्हीं राज्यें मुसुलमानांनीं बुडविला. या मुसुलमानांच्या स्वारींत बंगाल्यांत मृतप्राय बनलेला बौद्ध संप्रदाय गतप्राण झाला. मुसुलमानांनीं बौद्ध भिक्षूंची इतकी सररहा कत्तल केली कीं, पुढें त्यांच्या मठांमधें सांपडलेल्या ग्रंथांचा अर्थ सांगण्यासहि कोणी उरला नाही. मुसुलमानांच्या तडाक्यांतून जे बौद्ध लोक निसटले ते तिबेट व नेपाळ देशांत पळून गेले.
सेन राजेहि स्वतः विद्वान् व संस्कृत पंडितांचे मोठे आश्रयदाते होते. गीतगोविंदाचा कर्ता जयदेव हा याच सुमारास होऊन गेला.
रा ज पु ता ना.- हर्षानंतरच्या काळांत राजपुतान्यांत अनेक रजपूत घराणीं उदयास आलीं. रजपूत लोक मोठे पराक्रमी, युद्धप्रिय व स्वसंस्कृतीचे अभिमानी असून मध्ययुगीन इतिहासांत त्यांचें फार महत्व आहे. कारण इंग्रजादि यूरोपीयांच्या सत्तेला मराठ्यांनीं ज्या प्रमाणें जबरदस्त अडथळा केला त्याचप्रमाणें परकी मुसुलमान सत्तेचा हिंदुस्थानांत प्रसार होण्यास रजपूतांनींच भयंकर विरोध केला. तथापि अशी ही पराक्रमी रजपूत लोकांची जात एकाएकी कोठून व कशी उद्भवली याबद्दल इतिहासकारांनां कोडें असून त्यांच्या मूळ उत्पत्तीबद्दल मतभेद आहेत. कर्नल टॉड, व्हिन्सेंटस्मिथ, वगैरे इतिहासकारांनीं रजपूत हे सिथियन, शक, हूण वगैरे परकी भारतबाह्य जातीचे वंशज आहेत असें मत दिलें आहे तर त्याच्या विरुद्ध रा. चिंतामणराव वैद्य यांनीं आपल्या 'मध्ययुगीन भारत' या ग्रंथांत रजपूत हे प्राचीन भारतीय क्षत्रियांचे वंशज आहेत असें प्रतिपादन केलें आहे.
असो. राजपुतान्यांत रजपुतांचीं अनेक संस्थानें व राजकुलें आहेत. मुसुलमानांच्या स्वा-यांस तोंड देणा-या या रजपूतांमध्यें मेवाडचें गुहिलोत राजघराणें हे सर्वांत प्रमुख असून रजपुतांचीं जी ३६ कुळें इतिहासांत प्रसिद्ध आहेत तीं सर्व मेवाडच्या घराण्यास रामचंद्राचे वंशज या नात्यानें अग्रपूजेचा मान देतात. याशिवाय सांबरचे चाहमान, अनहिलवाड पाटणचे चावडा, धारचे परमार, वगैरे अनेक रजपूत घराणीं सुप्रसिद्ध आहेत.
यांशिवाय उत्तरहिंदुस्थानांत कामरुप उर्फ आसाममध्यें, सिंध प्रांतांत, काबूल प्रांत व प्राचीन गांधार देश म्हणजे पुरूषपुर उर्फ पेशावर याच्या आसपासचा प्रदेश, वगैरे ठिकाणीं हिंदू राज्यें होतीं. पैकीं सिंध व काबुल या प्रांतांवर मुसुलमानी हल्ल्यांनां तोंड देण्याचें व आसाममधील राजांनां चिनी मोंगोलियन लोकांच्या स्वा-यांनां तोंड देण्याचें काम करावें लागलें. आणि या वामांत सिंध व काबूलपेक्षा आसामाची कामगिरी फार प्रशंसनीय आहे. कारण आसामच्या हिंदू राजांनी चिनी मोंगोलियनांनां व पुढें मुसुलमानांनांहि परतवून लावून १९ व्या शतकांत ब्रिटिश अम्मल बसेपर्यंत आपले स्वातंत्र्य कायम राखले.