प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
सयाम.— प्राचीनकाळीं सयाम देशावर भारतीय ब्राह्मणी संस्कृतीचा बराच परिणाम झाला. ब्राह्मणांनीं तेथील सामाजिक व राजकीय घडामोडींत बरेच महत्त्वाचे फेरफार घडवून आणले. तेथील मूळचे रहिवाशी जे ख्मेर लोक त्यांनीं आपल्या या नवीन सुसंस्कृत शिक्षकांच्या सल्ल्यानें व त्यांच्या अनुकरणानें शेतकी वगैरे धंद्यांत बरीच सुधारणा घडवून आणली व देशाची सांपत्तिक स्थिति सुधारली. त्यांची घरें अधिकाअधिक मोठीं होत चाललीं आणि त्यांच्या रचनेंत सौंदर्याची भर पडत चालली. मध्यवर्ती शासनसंस्था अधिकाधिक बलवान् होत जाऊन आणि असंस्कृत जनतेस दौर्बल्य येत जाऊन साम्राज्यस्थापनेस सुरुवात झाली. पूर्वेकडील द्वीपकल्प आणि हिंदुस्थानांतील सुपीक प्रदेश यांच्यामध्यें व्यापारी दळणवळण सुरू होऊन हिंदुस्थानांतील माणसें तिकडे जाऊं लागलीं. ब्राह्मणसंस्कृतीचा विकास झाला, हरिहरांची देवालयें वाढलीं आणि हीं देवालयें हिंदुस्थानपेक्षांहि प्रंचड व सुंदर होऊं लागलीं. या देवळांच्या अस्तित्वाचें श्रेय केवळ ख्मेरांसच देणें बरोबर नाहीं. कां कीं, कांबोज देशाचे जरी हे ब्राह्मणांच्या अगोदरचे रहिवाशी होते तरी ते साधारण असंस्कृत स्थितींत होते आणि अंकोरथोम, अंकोरवात येथील मोठ्यामोठ्या मयकल्पनांचें कर्तृत्व त्यांच्याठायीं स्थापित करणें योग्य होणार नाहीं. त्यांचें श्रेय ब्राह्मणांस दिलें पाहिजे, आणि ब्राह्मणांनीं देखील तें वास्तुसौंदर्य दक्षिणेंतील द्राविड लोकांपासून उचललेलें दिसतें. {kosh Le Siam Ancien Musee Guimet Vol. XXVII.}*{/kosh}
ख्मेर लोकांतील आजचीं थोर कुलें ख्मेर पदव्या धारण करतांना दृष्टीस पडतात आणि ब्राह्मणांचे विशिष्ट हक्क आपणांसहि असले पाहिजेत म्हणून आग्रह धरितात; तथापि कांबोजच्या राजकुलाचा सूर्यवंश किंवा सोमवंश यांशीं जितका संबंध पोंचतो तितकाच या ख्मेर मुत्सद्यांच्या थोर कुलांचा ब्राह्मणांच्या विशिष्ट अधिकारांशी पोंचतो.