प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

लाओ. - ही भाषा समुद्रकिनार्‍यापासून दूर राहणारें एक राष्ट्र वापरतें. यांनां पोर्तुगीच लोक लाओ असें म्हणत व तेंच नांव पुढें प्रचारांत आलें. या भाषेचा अभ्यास यूरोपीयांनीं मुळींच केलेला आढळत नाहीं. अलेक्झांडर डी र्‍होडस नांवाचा एक मनुष्य पूर्वीं या प्रांतांत गेला होता. कोहांफर {kosh History of Japan p. 26.}*{/kosh} यानें दिलेल्या माहितीवरून लाओ (लाव) राष्ट्र हें सयामी राष्ट्रापासून भाषा व लिपी या बाबतींत फारसें भिन्न नाहीं.

ब्रह्मी व सयामी लोक आपला धर्म, शास्त्रें इत्यादि सर्व संस्कृति लाव राष्ट्रापासून मिळालीं असें म्हणतात. लाव लोकांच्या देशांत बौद्ध संप्रदायाच्या संस्थापकांनीं आपल्या अस्तित्वाचे बरेच अवशेष ठेवले आहेत असें त्यांचें म्हणणें आहे. सिंहलद्वीपांत ज्याप्रमाणें अमलश्रीपाद पर्वतावर बुद्धाच्या डाव्या पायाची खूण आहे असें सांगतात, त्याप्रमाणें त्याच्या उजव्या पायची खूण सयाममध्यें ‘स्वन्नबपतो’ (सुवर्णपर्वत) या पर्वतावर आहे असें सांगतात. दुसरीं कांहीं पावलें पेगु, आवा, आराकान यांमध्यें आहेत असें म्हणतात. परंतु लाव देशामध्यें सर्व खुणा एकत्र आढळतात व बरेच यात्रेकरु या देशांत ‘प्रकुकुसोन,’ ‘प्रकोन्नकोन,’ ‘प्रपुत्थकत्सोप,’ आणि ‘प्रसमुत्तकोदोम’ यांच्या पादुकांचें दर्शन घेण्यास येतात. हीं सर्व नांवें हेमचंद्राचार्यांच्या अभिधानचिंतामणीमध्यें  जीं शेवटच्या चार बुद्धांचीं क्रुद्रुच्छन्द (क्रकुच्छन्द), कांचन, काश्यप आणि शाक्यसिंह {kosh हेमचंद्र ५. २३६.}*{/kosh} अशीं संस्कृत नांवें आहेत त्यांचींच अपभ्रष्ट रूपें असावीं. लाव लोकांच्या भाषेंत बरेच ग्रंथ आहेत असें म्हणतात.