प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

राजाची दिनचर्या.- थईच्या राजाबद्दल दर्शविण्यांत येणार्‍या अत्यंत पूज्यबुद्धीला अनुसरूनच त्याच्याशीं त्याच्या प्रजेचें वर्तन असतें. तो क्वचित् प्रसंगीं जेव्हां लोकांच्या दृष्टीस पडतो तेव्हां रस्त्यामध्यें लोकांनां त्याच्यापुढें साष्टांग प्रणिपात करावा लागतो; व त्यांनां त्याच्याकडे पहाण्याचीहि परवानगी नसते; त्यांनीं त्याला स्पर्श केल्यास त्यांनां देहान्त शासन मिळतें. तो एकटा कधींहि जाहीरपणें लोकांच्या दृष्टीस पडत नाहीं;  त्याच्या बरोबर नेहमीं बराच मोठा परिवार असतो. त्याची सत्ता अनियंत्रित आहे, तथापि सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा त्याचा रोजचा सर्व कार्यक्रम अगदीं नियमबद्ध आहे. या सर्व नियमांचा येथें उल्लेख करितां येत नाहीं;  परंतु हिंदु धर्मशास्त्रांत ज्याप्रमाणें व्यापक अशा नियमांनीं राजाचा दिनक्रम बद्ध आहे, त्याप्रमाणेंच बहुतेक येथें स्थिती आहे एवढें सांगितलें म्हणजे पुरे आहे.

सयामच्या राजापांशी जरी पुष्कळ उपस्त्रिया असतात तरी त्याची धर्मपत्‍नी एकच असते. राजाशीं बहुधा तिचा निकट सहवास असून ती एका स्वतंत्र राजवाड्यांत राहते. आपल्या एका भावाला किंवा नातलग मांडलिक राजाला, उपराजाची जागा देण्याची सयामच्या राजांची चाल आहे. या पदवीचा अर्थ दुय्यम राजा असा आहे;  परंतु ‘उपराजा’ या पदवीच्या ऐवजीं अलीकडे ‘वनग्ना’ नांवाच्या दुसर्‍या एका पदवीचा उपयोग करण्यांत येतो;  सयामी भाषेंत वनग्ना व उपराजा यांचा अर्थ बहुदा एकच आहे. हा एक मोठ्या राजवाड्यांत राहतो;  त्याला रोज राजाला भेटावें लागतें;  बहुधा त्याच्याकडे सेनापतित्व असून राजाचा खजिनाहि त्याच्याच ताब्यांत असतो. वनग्लिंग किंवा राजप्रतिनिधि या नांवाचा दुसरा एक राजपुत्र असतो; सर्व मांडलिक राजांत हा वरिष्ठ असून त्यांनीं किंवा मोठमोठ्या अधिकार्‍यांनीं केलेल्या अपराधांची चौकशी करण्याचीं वगैरे महत्त्वाचीं कामें याला करावीं लागतात. थई राज्यांत यांशिवाच कित्येक राजपुत्र असतात; मुख्य राजा अनेक उपस्त्रिया ठेवतो त्याचा हा अपरिहार्य परिणाम आहे. आपल्या उपजीविकेसाठीं शेतकीसारखे हलके धंदे त्यांनां कधीं कधीं करावे लागतात; व सुंदर मुलींनां भ्रष्ट करण्यासारख्या चीड आणणार्‍या कृत्यांनीं ते लोकांनां पीडाहि देतात. सयामच्या राजाला सोन्याचा (Golden) किंवा पवित्र महाराजा असें म्हणतात व त्याच्या प्रकृतीबद्दल कोणीहि चौकशी करावयाची नाहीं असें असल्यामुळें राजाच्या मृत्यूविषयीं खबर कोणाला कधींच मिळत नाहीं; व त्याबद्दल कोणी विचार करावयाचा नसतो. यामुळें एक राजा जिंवत असतां त्याचा वारस नेमण्याची पद्धत नाहीं.