प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

मलायी व कलिंग.- मार्सडेन यानें असेंहि म्हटलें आहे कीं, "संस्कृत व भारतीय भाषांचा परिचय मलायी लोकांस प्रथम गुजराथी लोकांनीं करून दिला व तोहि अरबांचा भरतखंडाशीं संबंध येण्याच्या पूर्वीं करुन दिला; ही गोष्ट डी बॅरॉस व इतर विश्वसनीय ग्रंथकारांनीं गुजराथी लोकांचा मलाक्काशीं संबंध असल्याचे जे उल्लेख केले आहेत त्यांवरून स्पष्ट होते," परंतु लेडेन याचें म्हणणें असें आहे कीं, अरबी भाषेच्या मिश्रणामुळें जर कोणती भारतीय भाषा प्रथम दुषित झाली असेल तर ती गुजराथी होय व तीहि डी बॅरॉस व इतर ग्रंथकारांनीं उल्लेखिलेल्या काळाच्याहि बर्‍याच पूर्वीं दुषित झालेली होती. मलयु भाषेंत संस्कृतजन्य शब्दांचा भरणा व्हावयास जर कोणती भारतीय उपभाषा विशेष कारण झाली असेल तर ती बंगाली होय असें लेडेनचें मत आहे. बरेचसे संस्कृत शब्द ज्या रूपानें बंगाली भाषेंत आढळतात त्याच रूपानें ते मलयु भाषेंत आढळतात. त्यांतील ठळक उदाहरणें येणेंप्रमाणे :—

 बंगाली   मलयु  मराठी
 ततहापि  ततापि   तथापि
 पुनः  पुन   पुन्हा
 तत्काले  तत्काल  तत्काल
 बंग्श   वंग्स   वंश
 किच्छु अ  किच्छि किचि   (थोडे)किंचित्
 इंग्गित  इंगत    स्मरण, लक्ष
 बरंग  बरंग बरंग   कांहींतरी

परंतु अशा तर्‍हेचीं उदाहरणें अधिक देण्याचें कारणच नाहीं. कारण मलाया देशाचा व भाषेचा इतिहासहि आपणास असेंच दाखवितो कीं, मलायी लोकांचा प्राचीन काळापासून ज्या प्रांताशीं विशेष संबंध होता व ज्या प्रांताचा त्यांच्या भाषेवर विशेष परिणाम झाला तो प्रांत म्हटला म्हणजे कलिंग राज्य हा होय. तथापि मार्सडेनचें असें म्हणणें आहे कीं, तेलंग अथवा तमुल देशापासुन मलायी लोकांस कोणतीच सांस्कृतिक सुधारणा मिळाली नाहीं. परंतु लेडेन याचें मत याच्या अगदीं उलट आहे. कारण मलायी लोकांनां त्या कालीं कारोमांडल किनारा कलिंगांचा देश (तन्न कलिंग) या नांवानेंच ठाऊक होता. त्याप्रमाणेंच त्यांच्या देशांत प्रचलित असलेले बरेचसे ग्रंथ कलिंग भाषेंतील (वस कलिंग) ग्रंथांचीं भाषांतरें म्हणूनच प्रसिद्ध होते; आणि सध्याहि मलयु भाषेंत बरेचसे तामिळ, तेलुगु व मल्याळम् भाषेंतील शब्द आहेत, परंतु गुजराथी, हिंदी शब्द आढळत नाहींत.