प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

मलयु स्वयंभू कीं मिश्र ?— मार्सडेन याचें या भाषेबद्दल असें मत आहे कीं ही भाषा पूर्वीं या पूर्व द्वीपसमूहामध्यें सर्वत्र प्रचिलत असलेल्या एका मातृभाषेची शाखा अथवा पोटभाषा आहे. ही मातृभाषा प्राचीनकाळीं सुमारें २०० रेखांशांमध्यें मावेल इतक्या मोठ्या प्रदेशावर चालत होती व तिच्या क्षेत्रांत सध्या मादागास्कर या नांवानें प्रसिद्ध असलेल्या बेटापासून पूर्वेकडे 'ईस्टर बेटें' म्हणून प्रसिद्ध असलेलीं बेटें इतका पृथ्वीचा भाग येत असे;  आणि एवढ्याच कारणावरून देखील ही भाषा बरीच प्राचीन व स्वयंभू (मूल भाषांपैकीं एक) असावी असें मानण्यास हरकत नाहीं. हिच्या पोटभाषांवर काले, संबंधाभाव व इतर आकस्मिक कारणांचा परिणाम झाल्यामुळें, त्यांच्या मध्यें एक प्रकारचें मूलतत्त्वविषयक साम्य असलें तरी त्यांच्या बाह्य स्वरूपांमध्यें पुष्कळ फरक झाला आहे. त्यामुळें त्यांचा परस्परांहून भिन्न अशा अनेक भाषांत समावेश केला जातो. {kosh Asiatic Researches Vol. IV.}*{/kosh}  मार्सडेन यानें एका लेखांत मलयु भाषा व इतर पौरस्त्य उपभाषा यांतील साम्याचीं अनेक उदाहरणें दिलीं आहेत.{kosh Archaeologia Vol. VI.}*{/kosh}  परंतु लेडेन याच्या मतें हीं साम्याची उदाहरणें पुरेशी नसुन तीं एकाच मूलभाषेपासून आलीं असण्याचा संभव आहे. याच्या मतें सर डब्यू. जोन्स यानें या सर्वांची मूलभाषा संस्कृत असावी असें जें अनुमान केलें तेंहि तितपतच चूक आहे. जगाचा इतिहास (युनिव्हर्सल हिस्टरी) या ग्रंथामधील सयामच्या वर्णनांत असें म्हटलें आहे कीं "मलयु भाषा ही अनेक भाषांतील शब्द निवडून घेऊन बनलेली आहे त्यामुळें येथें येणारे सर्व लोक हीच भाषा बोलतात व सर्व पूर्वद्वीपांत हीच भाषा सर्व लोकांस बरी वाटते व व्यापारी लोक सर्वत्र हीच भाषा वापरतात आणि म्हणून तिचें अध्ययन करितात." लेडेनच्या मतें अशा तर्‍हेनें भाषा बनणें हें राष्ट्रांच्या इतिहासांतील पहिलेंच उदाहरण म्हणावें लागतें. तथापि या म्हणण्यांत निःसंशय सत्याचा अंश आहे, कारण मलयु भाषा ही स्वयंभू नाहीं हें लक्षांत यावयास तिचें अध्ययन फारसें सूक्ष्मतेनें करावयास लागत नाहीं. जी एक सामान्य भाषा पूर्वद्वीपसमूहामध्यें  प्रचलित आहे ती व इतर पोटभाषा यांचा समावेश सामान्यतः मलयु या नांवाच्या भाषेंतच होतो.

मलयु भाषेमध्यें दोन परकीय भाषांतील शब्द आलेले आहेत. त्या भाषा म्हटल्या म्हणजे संस्कृत आणि अरबी या होत.