प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

आतां आपण सिलोन व ब्रह्मदेश यांहून कमी परिचित अशा प्रदेशांकडे वळलें पाहिजे. अफगाणिस्तान, तार्तरी, सायबेरिया, बलुचिस्तान, कांबोजान्त पूर्वदेश, तसेंच जावा, बलि, सेलबिस, लाँबक, बोर्निओ इत्यादि आग्नेयीकडील द्वीपें आणि मादागास्कर हें नैऋत्येकडील द्वीप या संबंधानें आतां माहिती करून घेऊं. ज्या स्थलाविषयीं थोडीच माहिती उपलब्ध आहे तेथें भारतीय संस्कृतीचा पूर्वींचा विस्तार आणि आजकालचें त्या देशाकडे होणारें प्रयाण यांचें विवेचन करतांना विषयपृथक्त्व राखण्याची जरूर नाहीं. अशा स्थलांसंबंधानें भारतीय संस्कृतीच्या प्राचीन कार्यांचे व त्यांच्या परिणामांचें वर्णन करतांना अनुषंगानें तेथील अर्वाचीन भारतीयांची माहिती दिली आहे. या विषयास प्रारंभ करण्यापूर्वीं हिंदुस्थान सरकाराच्या सत्तेखालीं असलेल्या आणि त्यामुळें हिंदुस्थानांतीलज समजल्या जाणार्‍या एका भागाकडे त्या भागाच्या अल्प महत्त्वामुळें दुर्लक्ष होऊं नये म्हणून लक्ष दिलें पाहिजे. या भागांत हिंदूंची वस्ती हिंदूंस मोठी अभिमानास्पद नाहीं आणि पुढेंमागें ते भाग जरी संपन्न झाले तरी त्यांस पैतृक इतिहास अभिमानानें सांगतां येणार नाहीं. 'मान सांगावा जनांत आणि अपमान ठेवावा मनांत' या प्रकारच्या सामान्य प्रवृत्तीमुळें समाजाच्या कांहीं गोष्टींकडे आपण कानाडोळा करितों आणि ज्या गोष्टी वाखाणण्यासारख्या असतील त्यांचें वारंवार वर्णन करतों. समाजाच्या एकंदर हालचालींचें निरिक्षण करणार्‍या तत्त्ववेत्त्यास समाजाचें व्यंग दाखविणार्‍या गोष्टीच अधिक महत्त्वाच्या असतात. म्हणून बलि द्वीपांतील वाङ्‌मय, जावा व पूर्वेकडील द्वीपकल्प येथें असलेलीं हिंदूंचीं साम्राज्यें यांच्या आंनददायक वर्णनांच्या अगोदर जे लोक भयंकर गुन्हा केल्यामुळें आपणापासून वियुक्त होतात अशा अंदमान व निकोबार बेटांतील लोकांकडे आणि त्यांच्या संततीकडे आपण प्रथम लक्ष दिलें पाहिजे. तेथें सुमारें १८००० लोकवस्ती भारतीयांची आहे; आणि तेथील एकंदर जनतेंत भारतीयांचें प्रमाण दोन तृतीयांशाहून अधिक आहे. तेथील लोकसंख्येचे भाषावार, जातवार आणि पंथवार आंकडे प्रथम देऊन समाजस्थिति निदर्शक कांहीं टीपा १९११ सालच्या शिरोगणतीच्या अहवालावरून देतों.

अंदमान व निकोबारमधील लोकांचें पंथभेद दाखविणारें कोष्टक.
 पंथ  एकंदर   पुरुष  स्त्रिया
 सर्व पंथ  २६,४५९  १९,५७०  ६,८८९
 एकंदर हिंदु   ९,५२७    ७,९७९  १,५४८
 हिंदु ब्राह्मणी   ९,४६७  ७,९२७  १,५४०
 हिंदु आर्यसमाजी  ६०  ५२    ८
 शीख  ४५५   ४१९  ३६
 बौद्ध  १,६१८  १,६०५  १३
 मुसुलमान  ४,५८०  ४,०८०  ५००
 ख्रिस्ती   ५६६   ३८४  १८२
 यहुदी  २  २  ....
 एकंदर वसाहतवाले  १६,७४८  १४,४६९  २,२७९
 वन्य   ९७११  ५,१०१  ४,६१०
 अंदमान व निकोबारमधील लोकसंख्येचें भाषावार कोष्टक
 अंदमान व निकोबारमधील लोकांचें जातिवार कोष्टक.