प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

बूगी. - ज्याप्रमाणें  जावा बेटाची मूळची भाषा जावा अथवा जावानी मानतात त्याप्रमाणेंच सेलिबिस बेटाची मूळची भाषा बूगी ही होय. या शूर आणि लढवय्यें लोकांच्या प्राचीन राष्ट्राची ओळख यूरोपीयांस त्यांच्या र्‍हासकालींच झाली तथापि बर्‍याच गोष्टींवरुन हें राष्ट्र जावापेक्षांहि प्राचीन असावें अशी कल्पना होते.  धैर्य, धाडस, विश्वास, व्यापारांतील सचोटी या बाबतींत ते सर्व पौरस्त्य लोकांत श्रेष्ठ आहेत असें मलायी व जावानी लोकहि सांगतात; आणि यांची चिनी अथवा इंडोचिनी लोकांशी तुलना करावयाची म्हणजे एखाद्या सोनेरी खोगीर घातलेल्या गाढवाची एखाद्या उमद्या घोड्याबरोबर तुलना करण्यासारखें आहे असें म्हणण्यापर्यंत लेडेन या लोकांवर फिदा झाला होता.  या राष्ट्रामध्यें आणि जपानी लोकांत बरेंच साम्य आहे परंतु त्यांच्या भाषांत साम्य आहे किंवा नाहीं हें सांगतां येत नाहीं.

सेलिबिस बेटांत प्रथम लहान लहान संस्थानें होतीं परंतु पुढें तीं एकत्र होऊन एका नियतसत्ताक व लोकनियुक्त राजाच्या सत्तेखालीं आलीं.  यानंतर हें बेट म्हणजे पूर्वेकडील व्यापाराचें केंद बनलें आणि त्यांनीं बलीपासून मोलक्कापर्यंत आपली सत्ता पसरली.  बूगी भाषेच्या वृध्दीसाठी बरेच परिश्रम करण्यांत आले आणि त्यांची पुराणें, परंपरागत कथा, कायदेकानू व धर्मशास्त्र व इतिहास यांचा ग्रंथांमध्यें समावेश करण्यांत आला.  या ग्रंथांपैकीं बरेचसे ग्रंथ या बेटाच्या अंतस्थ भागांत व जे लोक आपले प्राचीन धर्म पाळतात त्या लोकांत अद्यापीहि उपलब्ध आहेत.  किनार्‍यावरील प्रदेशांत मात्र महंमदी संप्रदाय प्रचलित आहे आणि या प्रदेशांतील ग्रंथ मलायी लोकांतील नंतरच्या चरित्रग्रंथांप्रमाणें आहेत.  ख्रि. श. १६०३ या वर्षी मंकासर राजानें मक्कासर राष्ट्राच्या साहाय्यानें विलक्षण क्रांति करून जुन्या धर्माचा त्याग केला व महंमदी संप्रदायाचा स्वतः स्वीकार करून इतर राष्ट्रांसहि त्यानें आपलें अनुकरण करावयास लावलें.

किनार्‍यावरील प्रदेशांतील बूगी भाषा बरीचशी पूर्वेकडील मलयु भाषेशीं मिश्र झाली आहे.  हिचें शुध्द स्वरूप प्राचीन धर्मग्रंथांत व अंतर्देशांत मात्र सांपडतें.  या भाषेंतील शब्दांवरून ही स्वतंत्र भाषा असावी अशी कल्पना होते पण हिची रचना मलयु व तागाल या भाषांसारखी आहे.  या भाषेचें एकंदरींत मलयु, जावानी, व तागाल या भाषांशीं साम्य आहे.  परंतु हिच्या मूळच्या स्वरूपांत संस्कृतजन्य शब्द मुळींच सांपडत नाहींत.  तेरनत अथवा मोलक्का या भाषेशीं देखील बूगी भाषेचें थोडेसें साम्य आहे, परंतु या दोन्ही भाषांचा विशेष अभ्यास झाल्यावर या बाबतींत निश्चित मत देतां येईल.  मलयु व जावानी भाषांपेक्षां ही भाषा अधिक स्वतंत्र दिसते.

बूगी भाषेंत बावीस वर्ण असून त्यांचे अ, उ, इ, ए, ओ, उंग अशा सहा स्वरांनीं निरनिराळे उच्चार होतात.  वर्णांचा आकार चमत्कारिक दिसतो पण तो बत्ता व तागाल भाषांच्या वर्णांप्रमाणें कांहींसे दिसतात.  परंतु या वर्णांचे आकार निरनिराळया राज्यांत निरनिराळे असून कांहीं ठिकाणीं त्यांच्या अनुक्रमांत व संख्येंतहि फरक आहे.  यांची संख्या १७ पासून २२ पर्यंत आहे.  हीं अक्षरें छापलेलीं अशीं फारेस्ट यानें आपल्या 'मेर्गुइ द्वीपसमूहाचा प्रवास' या ग्रंथांस जोडलेल्या नकाशांत पहावयास सांपडतात.  मलयु ग्रंथांतहि बूगी लिपीचा उपयोग केलेला आढळतो.

बूगी भाषेंतील जुन्या ग्रंथांमध्यें सर्वत्र सामान्यतः एकच भाषा आढळते.  परंतु सध्याच्या भाषेमध्यें व संभाषणांतून पाहिल्यास निरनिराळ्या संस्थानांतील भाषांत बराच फरक आढळतो.  मंकासर अथवा मकासर या सर्वांत शूर व प्रसिध्द बूगी राष्ट्रजातीची भाषा मूळ बूगी भाषेपेक्षां बरीच निराळी आहे.  त्याप्रमाणें लुबु, एनरेकग, मन्दर, व विशेषतः तरज्ज या जातींच्या भाषा जवळ जवळ अगदीं स्वतंत्र दिसतात.

बूगी भाषेचा यूरोपीयांनीं फारसा अभ्यास केलेला दिसत नाहीं.  डच लोकांनीं त्यांच्या ऐतिहासिक कथांपैकीं कांहींच्या संक्षिप्त आवृत्त्या काढल्या आहेत.  लेडेन यानें एक बूगी व मंकासर भाषेचा लहानसा शब्दकोश केला आहे पण तो त्याच्याच म्हणण्याप्रमाणें अपुरा व चुकीचाहि असावा कारण तो त्यानें किनार्‍यावरील लोकांच्या माहितीवरून तयार केला आहे.  त्याला मिळालेल्या माहितीवरून त्यानें बूगी भाषेंतील कांहीं ग्रंथांची नांवें दिलीं आहेत तीं अशीं आहेत :—

(१) नाम सगुनि (२) बतर गुरु (3) गुरु दे सिलंग (४) तोजोरिसुंपा (५) लसिनि लेले (६) बतर लतो (७) ओपुतोलग (८) अरौलंगी (९) पनोरि तवगे (१०) लजिरि होइ (११) जमुरि चिन (१२) लौरुपोयसि (१३) रोतुन नरि-तत्त, दतु नगिम (१४) लमपुतोद तुरिपो (१५) लतुम मुल्लुरुंग (१६) लौधुम रेओ (१७) लप बिचर लरि सिंदेनरे (१८) गुतुपत लोतोपलगुन (१९) लप्पंग ङरिसंग (२०) ओपुसंगमुद (२१) ओपुल मरु दतुन सोपेंग (२२) लातु गेतान पजु लिंपोय (२३) सविर गदिंग (२४) अदेवत (२५) रोतुन दिलिविंग (२६) दतपमुसु (२७) लगन लदुंग (२८) रोतुन रिसोसु (२९) ल गलिगो (३०) तोबल ओंजि (३१) रदओंग लबे (३२) लमद रोमंग (३३) पलवगो (३४) लवजुलंगि (३५) लमप पुलि (३६) दतु मोवुनले (३७) ललुंपंगमेग (३८) लसवुगं लंगि (३९) रोतन दि पपंग (४०) अजि लेदे (४१) लमपंग अनिरो (४२) लतन नरिजिवि (४३) बयपगुलि (४४) लतुपु सल्लौ (४५) लतुपुगुल्ल (४६) लतन नरि पुलंग (४७) सत्यबोंग (४८) लसतुंगपुगे (४९) लगलिगो तोकोलिंगेंघ (५०) लतन नरौगि (५१) दतुल किल (५२) लपनदोन (५३) रोतन दि तिमंग तोअन लनिउ. {kosh याखेरीज डॉ. बी. एफ. मत्थेस (B. F. Matthes 1815, 1881,1883) यानें बूगी व मकासर वाङमयांतील ग्रंथांच्या वर्णनात्मक सूची तयार केल्या आहेत, आणि व्याकरणें व कोश लिहिले आहेत.  त्याप्रमाणेंच के. जी. नीमन (K. G. Niemann) यानें अलफुरु म्हणून किनार्‍यावर प्रचलित असलेल्या भाषांवर एक ग्रंथ लिहिला आहे तो अ‍ॅम्स्टरडॅम येथें १८६६ सालीं छापला आहे.}*{/kosh}

या सर्व ग्रंथांत त्यांच्या ऐतिहासिक पुरुषांच्या कथा आहेत.  वरील ग्रंथांखेरीज 'अद्दत' अथवा नियमसंग्रह म्हणून जे कायद्याचे ग्रंथ आहेत ते फार जुने असून सर्व पौरस्त्य जातींत प्रसिध्द आहेत.  यांपैकीं कांहीं ग्रंथांची मलयु व जावा भाषांत भाषांतरें झालीं आहेत.  बूगी भाषेंत कुराणाचें भाषांतर झालें आहे.

बूगी भाषेंतील गाणीं व अद्भुत कथा या सर्व पूर्वेकडील बेटांत प्रसिध्द आहेत; व त्यांतील कल्पना आणि प्रतिभा हींहि वाखाणण्याजोगीं आहेत असें लेडेन याचें मत आहे.  यांच्या गाण्यांत यमकाचा उपयोग फारसा नाहीं.  यांच्या गाण्यांतलें माधुर्य तालावर अवलंबून असतें. ऐतिहासिक काव्यांतील वृत्तें बरींचशीं संस्कृतसारखीं असतात. या भाषेंतील गाण्यांचे पुष्कळ प्रकार आहेत. कांही गाणीं दोहरे किंवा सुभाषित श्लोकांसारखीं लहान लहान असतात. तीं मलयु भाषेंतील पतुनइतकीं सुंदर नसतात. परंतु यांवरून त्यांच्या आयुष्यक्रमाची व स्वाभावची बरीच ओळख पटते.

मकासर काव्येंहि बूगी भाषेंतील काव्यांप्रमाणेंच असतात व त्यांचा आवडता विषय म्हणजे त्यांच्या डच लोकांबरोबर झालेल्या लढाया हा होय.