प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

ब्राह्मणी संस्कृतीचा र्‍हासकाल :— पूर्वेकडील या ब्राह्मणी साम्राज्याचें वैभव शिखरास पोंचण्याचा काल व इकडे पश्चिम आशियामध्यें नवा पैगंबर उत्पन्न होऊन त्याच्या संप्रदायाचा पौरस्त्य देशांत उपसर्ग पोंचण्यास सुरवात होण्याचा काल हे जवळ जवळ एकच होते. महंमदानुयायांनीं भारतीयांवर मिळविलेल्या विजयांचा परिणाम अर्थातच इंडोचीनास लवकरच जाणवूं लागला. कारण भरतखंडांतून त्या देशास जाणार्‍या लोकांचा प्रवाह बंद झाला. येथूनच इंडोचीनमधील ब्राह्मणी साम्राज्यास उतरती कळा लागून तें साम्राज्य लवकरच उत्तरेकडून येणार्‍या ‘थई’ लोकांच्या हस्तगत झालें. थई लोकांच्या या स्वार्‍यास ख्रि. श. च्या दहाव्या शतकांत आरंभ होऊन त्यांनीं लवकरच सर्व ब्राह्मणी वसाहती पादाक्रान्त केल्या. एक एक वसाहत घशांत टाकीत टाकीत ते बरेच बलिष्ठ झाले. याच वेळीं त्या वसाहतींत बौद्ध संप्रदायाचा पालीभाषेसह प्रवेश होत होता. या संप्रदायांतील लोकांचें ध्येय संप्रदायप्रसार हें असल्यामुळें व त्याचे प्रवर्तकहि सामान्य जनतेपैकींच असल्यामुळें तो सामान्य जनांस विशेष आवडत असे व ब्राह्मणी धर्माच्या र्‍हासामुळें रिकाम्या पडलेल्या क्षेत्रांत या संप्रदायास यथेच्छ वावरण्यास अवसर सांपडला. या थई लोकांच्या स्वार्‍यांच्या सपाट्यांत प्रथमच सयाम देश सांपडला व तेथें ब्राह्मणी साम्राज्याची जागा थई साम्राज्यानें घेऊन सुखोदय शहर या साम्राज्याची राजधानी बनलें.

या थई लोकांच्या स्वारीचा ब्राह्मणांनीं इतके दिवस जोपासना करून वाढविलेल्या संस्कृतीवर फार महत्त्वाचा परिणाम झाला. तेराव्या शतकाच्या सुमारास ब्राह्मणी धर्माचा अस्त झाल्यामुळें शिवाची जागा बुद्ध या देवतेनें घेतली,  शिल्पकारांचा वर्ग नाहींसा झाला व त्यांचेबरोबर वास्तुसौंदर्याच्या कल्पनांचा लय झाला. पूर्वींच्या इमारतींचें स्वरूप बदलून टाकण्यांत आलें व कांहींचें सामानहि काढून नेण्यांत आलें.  थई किंवा ब्रह्मी लोकांनां ब्राह्मणी शिल्पकामाचें अनुकरण कसें करावें हें मुळींच समजेना आणि ख्मेर लोकांनां तर हें सर्व केवळ गौडबंगालच होतें.

सयाममध्यें रिअप व सायेम या प्रांतांत जरी बौद्ध देवालयें आढळत नाहींत तरी कांहीं बुद्धाच्या मूर्ती आढळतात यावरून असें दिसतें कीं, बौद्ध संप्रदायाचा प्रवेश तेथें ब्राह्मणी धर्माच्या र्‍हासापूर्वीं होऊन बुद्धास दैवतांमध्यें जागा मिळाली असावी किंवा ब्राह्मणी देवालयांतून बुद्धाच्याहि मूर्ती बसविण्याची चाल असावी. लोफबुरी (लोणवो) येथील एका ख्मेर शिलालेखावरून असें समजतें कीं, ख्रि. श. च्या दहाव्या शतकांत कांबोजमध्यें बौद्धसंप्रदायाचा प्रवेश झालेला असून कांहीं हिंदू ब्राह्मणहि त्या संप्रदायांत शिरलेले होते; आणि या संप्रदायातील लोकांस राजानें कांहीं विशिष्ट हक्क दिलेले होते. हे दोन्ही संप्रदाय एका शेजारीं एक सलोख्यानें वागत असून शिल्पकार हे राजाच्या आज्ञेवरून दोघांचींहि कामें करीत असत. बुद्धमूर्तीनें याप्रमाणें प्रथमतः सलोख्यानें ब्राह्मणी देवळांत प्रवेश करून नंतर हळू हळू परिस्थितीच्या जोरावर तेथून मूळच्या देवांस हुसकून लाविलें असावें. ब्राह्मणी देवांप्रमाणेंच ब्राह्मणांची पदच्युति घडून आली. ब्राह्मण वर्ग हा क्षत्रिय जेत्या लोकांहून श्रेष्ठ असून तो जित लोकांपासून फार दूर असे. परंतु बौद्धसंप्रदायानें स्वतः लवकरच तेथील लोकांच्या चालीरीतींचा स्वीकार करून, जातिभेदाचा मोड करून, सर्वांनां सारखेंच वागवून व राजांनांच धर्माध्यक्ष बनवून, सर्व लोकांस सर्व देवालयें व मठ खुले ठेवून आपल्या संप्रदायामध्यें सर्व लोकांस गुरफटून टाकलें; आणि सर्वांना एका संस्कृतींत आणण्याचें काम जें 'थई' राजांनां तरवारीच्या जोरावर करतां येणें अशक्य होतें ती गोष्ट या बौद्ध भिक्षूंनीं फारच थोड्या श्रमांनीं करून दाखविली.

सयाममध्यें इ. स. १५१० तील एक शिलालेख आहे, त्यामध्यें धर्मशोकराज यानें एका शिवमूर्तीची पुनःस्थापना केल्याचा उल्लेख आहे. ही शिवमूर्ति व आणखी एक विष्णुमूर्ति या 'सज्जनालय' नांवाच्या मंदिराचा नाश झाल्यानंतर कोठें तरी पडून राहिल्या होत्या. या वर उल्लेखिलेल्या राजानें दोन्ही धर्मांचे ऐक्य करण्याचा प्रयत्‍न केला होता. त्यानें बौद्ध विहारांचे जीर्णोद्धार केले व हिंदू मूर्तींचीहि स्थापना केली.