प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
मलयु व संस्कृत.- मलयु भाषा व संस्कृत भाषा यांचा संबंध प्रथम सर डब्ल्यु. जोन्स यानें निदर्शनास आणला व याच गोष्टीस दुजोरा देतांना मार्सडेन यानें मलयु भाषेंत शिरलेल्या संस्कृत शब्दांचीं काहीं उदाहरणें दिलीं आहेत व अशीं हजारों उदाहरणें देतां येतील असें म्हटलें आहे. याखेरीज त्यानें असें म्हटलें आहे कीं कल्पना, विचार व मनुष्याचे स्वभावधर्म दाखविणारे शब्द, तसेच समाजांतील व्यक्तींचे परस्परसंबंध इत्यादि गोष्टींचे वाचक शब्द संस्कृत भाषेंतून घेतलेले आहेत. परंतु मलयु भाषेंतील अगदीं कांहीं साध्या पण भाषेच्या दृष्टीनें अवश्यक अशा गोष्टी संस्कृतवरून मुळींच घेतलेल्या दिसत नाहींत व या गोष्टीवरून ती भाषा मूळची अगदीं वेगळी असावी असें दिसतें.