प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

मलायी व जावानी.- मलायी लोक व कलिंग देशांतील लोक यांचा ज्या कारणांमुळें संबंध होता असें वर म्हटलें आहे त्याच कारणामुळें मलायी व जावानी लोकांचा संबंध असावा असें वाटतें. मलायी लोकांच्या पौराणिक कथा पूर्वीं जावांतूनच त्यांच्याकडे आल्या व बरेचसे मलायी ग्रंथ जावांतील ग्रंथांचीं भाषांतरेंच आहेत; आणि जे ग्रंथ कलिंग भाषेंतील ग्रंथांवरून भाषांतर केलेले आहेत त्यांमध्येंहि त्या कथांचीं जावांतील नांवें दिलेलीं आहेत. त्याप्रमाणेंच मलय भाषेंत जेवढे संस्कृत शब्द आढळतात ते सर्व उच्च जावा भाषेंत सांपडतात परंतु जावा भाषेंतील सर्व संस्कृत शब्द मलयु भाषेंत आढळत नाहींत. शिवाय, बर्‍याचशा मलायी संस्थानांची स्थापना अरब येण्यापूर्वींच जावांतील कांहीं धाडशी प्रवाश्यांनीं केली होती; आणि मलायी लोकांतील ऐतिहासीक आख्यायिकांचें जर अधिक ज्ञान होईल तर अनेक मलायी संस्थानें अशाच प्रकारचीं असल्याची माहिती मिळेल.

मलयूचें मूळ.- मलयु भाषेंत जे संस्कृतजन्य शब्द आढळतात ते पाली भाषेंतून आलेले दिसत नाहींत. कारण बरेचसे मलयु भाषेंतील शब्द पाली भाषेंतील शब्दांपेक्षां संस्कृत शब्दांशीं अधिक सदृश दिसतात व बर्‍याचशा पौराणिक कथा व पुरुष मलयु भाषेंत आढळतात पण तेच पाली किंवा इतर इंडोचिनी भाषांत आढळत नाहींत असेंहि दृष्टोत्पत्तीस येतें.

परंतु संस्कृत व अरबी भाषांतील शब्द व तद्‍भव शब्द सोडून दिले तरी बरेचसे शब्द या भाषेंत शिल्लक राहतात व ते साध्या रोजच्या व्यवहारांतील गोष्टी व साध्या कल्पना यांचे वाचक आहेत; आणि हे शब्द हेच येथील मूळ भाषेचे अवशेष अथवा मार्सडेनच्या मताप्रमाणें दक्षिणसागरांतील देशांच्या मूळ भाषेचे अवशेष होत.

परंतु ज्या मलयु भाषेच्या भागाला आपण मूळ अथवा साधा भाग असें म्हटलें आहे तो संस्कृत अथवा अरबी यांच्यापासून बनलेल्या भागापेक्षां बराचसा विकृत व मिश्रणसंभव असावा असें मानण्यास अनेक कारणें आहेत असें लेडेन याचें मत आहे. त्याच्या मतें जे शब्द अगदीं साध्या पदार्थांचे वाचक आहेत ते केवळ जावा, बूगी, तहइ, ब्रह्मी इत्यादि अधिक प्राचीन पौरस्त्य भाषांतील शब्दांवरूनच श्रवणदोषमूलक अपभ्रंशानें बनलेले आहेत.

बॅरो व इतर कांहीं प्रसिद्ध ग्रंथकारांच्या मतें मलायी लोक हे चिनी लोकांचीच एक जात आहे; व बॅरो यानें सुमात्रांतील बरेच शब्द चिनी शब्दांसारखे आहेत असें म्हटलें आहे. परंतु चिनी भाषांचें ज्ञान अद्यापि फारसें वाढलें नसल्यामुळें या गोष्टीवर मत देतां येत नाहीं.

मलयु भाषेंतील सुलभ व मधुर वर्णोच्चारांमुळें व तिच्या रचनेच्या सौकर्यामुळें ती पूर्वेकडील द्वीपसमूहांची सामान्य भाषा होण्यास फारच योग्य आहे. परंतु तिच्या ज्या पोटभाषा आहेत त्या अधिक क्लिष्ट आहेत. कोणत्याहि मलयु उपभाषेची शुद्धता मापावयास तिचें सौंदर्य, माधुर्य व साधेपणा हींच प्रमाणें आहेत.

मलायी ग्रंथ.- मलयु भाषा जरी काव्य करण्याच्या विशेष लायकीची असली तरी तींत स्वतंत्र ग्रंथ फारच थोडे आहेत. मलायी लोकांत 'पान्तुन' नांवाच्या सुभाषितांसारख्या श्लोकांचा प्रचार फार आहे. या श्लोकांचें आपणांकडील दोहर्‍यांशीं बरेंच साम्य दिसतें. सायेर या नांवाची एक प्रकारचीं नैतिक काव्यें अथवा उपदेशपर कथाहि या लोकांत प्रचलित आहेत. चेरित्र अथवा हिकायत हे ग्रंथ बहुतकरून गद्य असतात, परंतु कांहींत मधून मधून 'पान्तुन' अथवा 'सायेर' चालीचीं पद्येंहि आढळतात. या चेरित्रांत मलायीं लोकांत प्रचलित असलेल्या पौराणिक कथा, ऐतिहासिक दंतकथा व आख्यायिका इत्यादि विषय असतात. याखेरीज एक प्रकारच्या कथा मलायी लोकांत प्रचलित आहेत त्यांना सुसुपन असें म्हणतात. या एका प्राचीन जावानी राजघराण्याबद्दल असून त्या घराण्याचेंच नांव त्यांनां मिळालें असावें असें दिसतें. यांपैकीं कांहि गोष्टी कांहीं सयामी गोष्टींशीं जुळतात. जेव्हां संस्कृत पुराणांतील व्यक्तींचा संबंध मलायी गोष्टींत येतो तेव्हां त्या गोष्टी जावा बेटाच्या अंतर्भागांत घडल्या असें दाखविलेलें असतें. त्याप्रमाणेंच कांहीं अरबी व्यक्तींचींहि पराक्रमाचीं कृत्यें मलायामध्यें घडल्याचें वर्णन आढळतें. या कथांपैकीं कांहीं गद्यांत व कांहीं पद्यांत आढळतात. काहीं कथांचे भिन्न पाठ आढळतात, एक जावा भाषेवरून घेतलेला व दुसरा संस्कृत व तैलंग भाषेवरून घेतलेला.