प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

मलायी व जावानी.- मलायी लोक व कलिंग देशांतील लोक यांचा ज्या कारणांमुळें संबंध होता असें वर म्हटलें आहे त्याच कारणामुळें मलायी व जावानी लोकांचा संबंध असावा असें वाटतें. मलायी लोकांच्या पौराणिक कथा पूर्वीं जावांतूनच त्यांच्याकडे आल्या व बरेचसे मलायी ग्रंथ जावांतील ग्रंथांचीं भाषांतरेंच आहेत; आणि जे ग्रंथ कलिंग भाषेंतील ग्रंथांवरून भाषांतर केलेले आहेत त्यांमध्येंहि त्या कथांचीं जावांतील नांवें दिलेलीं आहेत. त्याप्रमाणेंच मलय भाषेंत जेवढे संस्कृत शब्द आढळतात ते सर्व उच्च जावा भाषेंत सांपडतात परंतु जावा भाषेंतील सर्व संस्कृत शब्द मलयु भाषेंत आढळत नाहींत. शिवाय, बर्‍याचशा मलायी संस्थानांची स्थापना अरब येण्यापूर्वींच जावांतील कांहीं धाडशी प्रवाश्यांनीं केली होती; आणि मलायी लोकांतील ऐतिहासीक आख्यायिकांचें जर अधिक ज्ञान होईल तर अनेक मलायी संस्थानें अशाच प्रकारचीं असल्याची माहिती मिळेल.

मलयूचें मूळ.- मलयु भाषेंत जे संस्कृतजन्य शब्द आढळतात ते पाली भाषेंतून आलेले दिसत नाहींत. कारण बरेचसे मलयु भाषेंतील शब्द पाली भाषेंतील शब्दांपेक्षां संस्कृत शब्दांशीं अधिक सदृश दिसतात व बर्‍याचशा पौराणिक कथा व पुरुष मलयु भाषेंत आढळतात पण तेच पाली किंवा इतर इंडोचिनी भाषांत आढळत नाहींत असेंहि दृष्टोत्पत्तीस येतें.

परंतु संस्कृत व अरबी भाषांतील शब्द व तद्‍भव शब्द सोडून दिले तरी बरेचसे शब्द या भाषेंत शिल्लक राहतात व ते साध्या रोजच्या व्यवहारांतील गोष्टी व साध्या कल्पना यांचे वाचक आहेत; आणि हे शब्द हेच येथील मूळ भाषेचे अवशेष अथवा मार्सडेनच्या मताप्रमाणें दक्षिणसागरांतील देशांच्या मूळ भाषेचे अवशेष होत.

परंतु ज्या मलयु भाषेच्या भागाला आपण मूळ अथवा साधा भाग असें म्हटलें आहे तो संस्कृत अथवा अरबी यांच्यापासून बनलेल्या भागापेक्षां बराचसा विकृत व मिश्रणसंभव असावा असें मानण्यास अनेक कारणें आहेत असें लेडेन याचें मत आहे. त्याच्या मतें जे शब्द अगदीं साध्या पदार्थांचे वाचक आहेत ते केवळ जावा, बूगी, तहइ, ब्रह्मी इत्यादि अधिक प्राचीन पौरस्त्य भाषांतील शब्दांवरूनच श्रवणदोषमूलक अपभ्रंशानें बनलेले आहेत.

बॅरो व इतर कांहीं प्रसिद्ध ग्रंथकारांच्या मतें मलायी लोक हे चिनी लोकांचीच एक जात आहे; व बॅरो यानें सुमात्रांतील बरेच शब्द चिनी शब्दांसारखे आहेत असें म्हटलें आहे. परंतु चिनी भाषांचें ज्ञान अद्यापि फारसें वाढलें नसल्यामुळें या गोष्टीवर मत देतां येत नाहीं.

मलयु भाषेंतील सुलभ व मधुर वर्णोच्चारांमुळें व तिच्या रचनेच्या सौकर्यामुळें ती पूर्वेकडील द्वीपसमूहांची सामान्य भाषा होण्यास फारच योग्य आहे. परंतु तिच्या ज्या पोटभाषा आहेत त्या अधिक क्लिष्ट आहेत. कोणत्याहि मलयु उपभाषेची शुद्धता मापावयास तिचें सौंदर्य, माधुर्य व साधेपणा हींच प्रमाणें आहेत.

मलायी ग्रंथ.- मलयु भाषा जरी काव्य करण्याच्या विशेष लायकीची असली तरी तींत स्वतंत्र ग्रंथ फारच थोडे आहेत. मलायी लोकांत 'पान्तुन' नांवाच्या सुभाषितांसारख्या श्लोकांचा प्रचार फार आहे. या श्लोकांचें आपणांकडील दोहर्‍यांशीं बरेंच साम्य दिसतें. सायेर या नांवाची एक प्रकारचीं नैतिक काव्यें अथवा उपदेशपर कथाहि या लोकांत प्रचलित आहेत. चेरित्र अथवा हिकायत हे ग्रंथ बहुतकरून गद्य असतात, परंतु कांहींत मधून मधून 'पान्तुन' अथवा 'सायेर' चालीचीं पद्येंहि आढळतात. या चेरित्रांत मलायीं लोकांत प्रचलित असलेल्या पौराणिक कथा, ऐतिहासिक दंतकथा व आख्यायिका इत्यादि विषय असतात. याखेरीज एक प्रकारच्या कथा मलायी लोकांत प्रचलित आहेत त्यांना सुसुपन असें म्हणतात. या एका प्राचीन जावानी राजघराण्याबद्दल असून त्या घराण्याचेंच नांव त्यांनां मिळालें असावें असें दिसतें. यांपैकीं कांहि गोष्टी कांहीं सयामी गोष्टींशीं जुळतात. जेव्हां संस्कृत पुराणांतील व्यक्तींचा संबंध मलायी गोष्टींत येतो तेव्हां त्या गोष्टी जावा बेटाच्या अंतर्भागांत घडल्या असें दाखविलेलें असतें. त्याप्रमाणेंच कांहीं अरबी व्यक्तींचींहि पराक्रमाचीं कृत्यें मलायामध्यें घडल्याचें वर्णन आढळतें. या कथांपैकीं कांहीं गद्यांत व कांहीं पद्यांत आढळतात. काहीं कथांचे भिन्न पाठ आढळतात, एक जावा भाषेवरून घेतलेला व दुसरा संस्कृत व तैलंग भाषेवरून घेतलेला.

संस्कृत अथवा तैलंग कथांवरून घेतलेल्या कथा. - यांपैकीं प्रमुख म्हटल्या म्हणजे हिकायत पिंडव अथवा पांडवकथा होत. या महाभारताच्या निरनिराळ्या भागांच्या संक्षिप्‍त आवृत्ती आहेत. यांमध्यें कांहीं कथा अगदीं मराठींत आढळतात त्याप्रमाणेंच आहेत असें लेडेन म्हणतो. या कथांपैकीं काहींचीं नांवें द्यावयाचीं म्हणजे 'पिंडव लिम' (पांच पांडवांची कथा), 'पिंडव जय' (पांडवविजय), 'पिंडव बर्जद्दि' (पांडवद्यूत), 'पांडव पिंजम बलि' (पांडव वाडा उसना घेतात), 'पिंडव बेर्जेवल कपुर' (पांडव चुना विकतात), हीं होत, पुरिचु निकस्सनचा महाराजा बूम याची हिकायत ही कलिंग नाटककार मुंगकर्त निगर याच्या ग्रंथावरून घेतलेली असून तींत ब्रह्मा आणि विष्णु यांच्यामधील वादाची हकीकत आहे असें म्हणतात. 'साह सिंपुदिअ' ही एका कलिंग राजाची कथा त्या देशांतूनच आलेली असावी. 'हिकायत श्रीराम' हें सुसुपन वर्गांतील काव्य आहे. त्याप्रमाणेंच 'कुसोम इन्द्र' (इन्द्राची कथा); 'बलिंत सेन'; 'साह कोबुत' (वानरांच्या युद्धाची कथा); 'राजहुलर निग्गवोंग'; 'हिकायत बिद श्री'; 'हिकायत राजा पिकेरमदि' (विक्रमादित्यचरित्र); 'हिकायत दर्भो राजा'; 'हिकायत कलिल ओ दम्म' (कलिल व दम्म यांची गोष्ट) या आणखी कांहीं कथा आहेत.

जावामधील कथांवरून घेतलेल्या कथा.- 'हिकायत चिक्किल वुन्नंगपुत्ति' (कुरिपनच्या राजाची कथा); 'हिकायत जरन तमस' (अंदिककृत मजपहित येथील एका राजाच्या प्रेमकथा); ‘किलन पेर्बुजय चेरित्र’ (कुरिन येथील राजाची कथा); ‘मिस पेर्बुजय चेरित्र’, ‘मिस किआमोंगचेरित्र’ (दह येथील राजकन्या तिमु गुंग बपंग चकर बिम यानें पळवून नेली होती तीस बितर कल यानें सोडविल्याबद्दल कथा); ‘जरन किलिनंग चेरित्र’; ‘रतु बदेर किस्न चेरित्र’; ‘पंज वितिन’ (इन कुर्तपुत्ति याची कथा) ; 'गंबर विर-पुत्र'; ‘गंबर श्री रतु अनुम अनि मलयु’ (दह येथील राजकन्या गंबर आणि मलय येथील राजा अतुम यांची कथा); 'नाग बिसरु' (दह येथील एक राजकन्या सर्पाचें रूप देऊन तळ्यांत बंदिवासांत ठेविली होती तिची कथा) ; ‘पुत्ति कोल बिस्नु’ (विष्णु-कथा) ; ‘किंत् बुहिन्’ (जावामधील बंजरकुलिन येथील राजाची कथा) ; ‘कलिन जयंग सित्रु’ (रदिन जरन तिनंग्लु याची कथा) ; ‘अंग्लिंग दर्मविराज चेरित्र’; ‘हिकायत परंग पुतिंग’ (मुठीशिवाय कुर्‍हाडीची गोष्ट). त्याप्रमाणेंच पुढील गोष्टीहि जावांतूनच आलेल्या असाव्या (या स्वतंत्र मलयुकथा असणेंहि संभवनीय आहे): ‘हिकायत पेलंदुक जिनक’ (एक धूर्त मृगाची गोष्ट) ; ‘हिकायत बुरूंग पिंगे’ (एका विचित्र पक्ष्याची गोष्ट) ; ‘देव मंदु चेरित्र’; ‘सायेर श्री वतिन’ ‘हिकायत  बिआन’; ‘हिकायत राजा बूदक’.

अरबी भाषेंतून रूपांतर करून घेतलेल्या कथा.—
‘हिकायत अमिर हुमदा’; ‘हिकायत राजा खैबर’ (अरबस्थानांतील खैबर येथील यहुदी राजाची कथा) ; ‘हिकायत राजा हिंदुक’; ‘हिकायत महमद हनीफा’; ‘हिकायत खाजे मैमुन’; ‘हिकायत एब्लिस’; ‘हिकायत राजा शाह मर्दान’; ‘हिकायत सुलतान इब्राहिम इब्न अढेम’; ‘हिकायत सेकंदर दुलखरनैनी.’ फारसी भाषेंतील भाषांतराप्रमाणें मलयु भाषेंतहि कुराणाचें भाषांतर झालें आहे.

ऐतिहासिक ग्रंथ.— याखेरीज मलयु भाषेंत कांहीं ऐतिहासिक ग्रंथहि आहेत. ‘हिकायत राना बंग्षु’ या ग्रंथांत मलायी राजांचा वंशेतिहास आहे असें म्हणतात. ‘हिकायत मलाका’ या ग्रंथात एका जावानी धाडशी गृहस्थानें त्या शहराची स्थापना केल्यापासून पुढें पोर्तुगीज लोक येऊन मलायी लोकांचीं अल्बुकर्क व पोर्तुगीज सरदार यांच्याशीं युद्धें झालीं तेथपर्यंतची हकीकत आहे. ‘हिकायत पित्रजय पुत्ति’ (एका मलाक्का येथील प्राचीन राजाची हकीकत) ; ‘हिकायत अचि’ (मलाक्कामधील अचि अथवा अचिनचा इतिहास) ; ‘हिकायत हंग तुह’ (मलाक्का येथील शेवटच्या राजाच्या कराकीर्दींतील एक सरदाराचे पराक्रम आणि पोर्तुगीज लोकांच्या विरूद्ध मदत मागण्याकरितां मक्का व कॉन्स्टँटिनोपल येथें पाठविलेल्या वकिलातीची हकीकत) ; ‘हिकायत देव राजा’; ‘हिकायत दतु पेरजंग’; ‘हिकायक राजा बोसमन दन लोकमन’; ‘हिकायत राजा तंबिक बज’; ‘हिकायत राजा कुरि पन’; ‘हिकायत राजा कंबयु’; ‘हिकायत राजा निल दतु कबज’; ‘हिकायत रंग ररि’; इत्यादि. अशा प्रकारचे किरकोळ ऐतिहासिक ग्रंथ बरेच आहेत. प्रत्येक राज्याचा अथवा जातीचा अशा प्रकारचा एक एक ग्रंथ असावा असें वाटतें, आणि या ग्रंथांतून जरी काल्पनिक भाग मधूनमधून असला तरी मलाया देशाचा इतिहास समजण्यासाठीं मुख्य सामग्री म्हणजे हेच ग्रंथ होत. या देशांतील कायदेकानू व चालीरीती आणि परंपरा यांचेंहि कांहि ग्रंथांत एकत्र ग्रथन केलेलें आहे. अशा प्रकारचे महत्त्वाचे ग्रंथ म्हटले म्हणजे ‘उंदंग उंदंग’ आणि ‘आद्दत मलयु’ हे होत. यांतील जे जुने नियम आहेत ते बहुतेक जावा व बुगीस या भाषांतून घेतलेले दिसतात. या खेरीज निरनिराळ्या राज्यांमध्ये केव्हां केव्हां स्वतंत्र नियमसंग्रह करण्यांत येत असत. अशा प्रकारचा एक संग्रह राजा शाह अलम यानें केलेला ‘आद्दत किद्देह’ म्हणून प्रसिद्ध आहे.

लेडेन यास मलयु भाषेंतील एकहि नाट्यग्रंथ उपलब्ध झाला नाहीं. परंतु अशा प्रकारचे पुष्कळ ग्रंथ आहेत असें म्हणतात. ‘वयंग वयंग’ नांवाचे खेळ कांहीं काळापूर्वीं करीत असत. परंतु ते हळूहळू मागें पडले. मलयु नाटकांचे विषय म्हणजे त्यांच्या ऐतिहासिक व अद्‍भत कथा हेच होते. त्यांच्या नाटकांत संभाषणें व आत्मगत भाषणेंहि असत.

मलयु लिपी, कोश, इ.— मलयु भाषा लिहिण्याकरीतां अरबी लिपी वापरतात. मात्र त्या लिपींतील अक्षरांपेक्षां सहा अक्षरें अधिक वापरतात. जावांतील मलायी लोक जावानी लिपी वापरतात. मोलक्कामध्यें लॅटिन लिपी वापरण्याचा कोठें कोठें प्रघात आहे.

यूरोपीय लोकांनीं ज्या पौरस्त्य भाषांचा प्रथम अभ्यास सुरु केला त्यांपैकीं पहिली मलयु भाषा ही होय. या भाषेचें व्याकरण रचण्याचा पहिला प्रयत्‍न डेव्हिड हिक्स यानें एक मलयु व डच भाषेंत कोश करून व त्याला व्याकरणाच्या टीपा जोडून केला. याचे लॅटीन भाषेंत भाषांतर झालें आहे (१६३१). यानंतर या भाषेसंबंधीं यूरोपीयांनीं केलेले ग्रंथ म्हटले म्हणजे कोशसंग्रह (बटेव्हिआ, १७०७-८) ; डच मलायी कोश (१७०८, बटेव्हिया) ; मलयी व्याकरण (अ‍ॅमस्टरडॅंम, १७२६) ; कोश (बटेव्हिया, १७८०) हे होत. इंग्रज ग्रंथकारांपैकीं बॉवरे याचें व्याकरण व कोश (१७०१) ; हॉविसन याचा कोश व व्याकरण (१८०१) ; कलकत्ता येथें प्रसिद्ध केलेला एक इंग्रजी-मलयी कोश (१७९८) हे महत्त्वाचे आहेत. या छापलेल्या ग्रंथांखेरीज हस्तलिखित ग्रंथ इंग्रजी, डच, पोर्तुगीज इत्यादि भाषांतून बरेच आहेत. याखेरीज प्रवासी लोकांनीं प्रसिद्ध केलेले किरकोळ कोश वगैरे आहेत, पण त्यांत बरेच दोष असतात.

ख्रिस्ती ‘पवित्र शास्त्रा’चींहि मलयु भाषेंत बरींच भाषांतरें झालीं आहेत.

वर दिलेल्या माहितीमध्यें मलाया द्वीपकल्पांत ऐतिहासिक ग्रंथांचें अस्तित्व वाचकांचें लक्ष वेधीलच. भावी इतिहाससंशोधकांनीं आपलें अवलोकनक्षेत्र अधिक विस्तृत केल्यास त्या ग्रंथांचा उपयोग होऊन हिंदुस्थानच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडणार आहे.

याखेरीज लंडन येथील रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ताब्यांत असलेल्या हस्तलिखित ग्रंथांवरील कांहीं टीपा पुढें देत आहों, त्यांचाहि या कामीं बराच उपयोग होईल.

मलायी ग्रंथांविषयीं कांहीं टीपा :— या टीपा व्हान देर तुक (H. N. Van der Tuuk) याच्या 'जर्नल रॉयल एशियाटिक सोसायटी' मधील एका लेखाच्या (मिसलेनिअस पेपर्स रिलेटिंग टु इंडो चायना) १८८७ मध्यें छापलेल्या पुनरावृत्तीवरून घेतलेल्या आहेत. इतिहासविषयक ग्रंथ येथें दिले आहेत. तथापि इतिहास या सदरामध्यें बर्‍याच संशयित दंतकथांचा आणि अद्‍भुत गोष्टींचा समावेश होतो असें समजावें. लेखामधील पुष्कळ हस्तलिखितांस नांवें नाहींत; आणि कांहींचीं नांवें संपादकानें अंदाजी धरलीं आहेत. म्हणून प्रत्येक  पुस्तकाचें नांव दिलें नाहीं. अनुक्रमदर्शक आंकडे मात्र दिले आहेत.

(१) मलाका येथील राजा, सिगुंतांग पर्वतावरील राज्य आपल्या एका मुलास देण्याचा प्रयत्‍न करितो, असा एका ग्रंथाचा प्रारंभ आहे, आणि त्यांत मलायी लोकांचें आयुष्य चित्रित करणारीं वर्णनें आहेत. हा शुद्ध मलयूमध्यें लिहिलेला आहे.

(२) भारतयुद्धाची कथा यांत जावानीवरून दिली आहे आणि त्यांत शेवटीं हिकायत पांडवजय म्हणून एक कथा घातली आहे. त्यांस मलायी भाषांतरकार जावा येथील नाट्यविषयभूत होणार्‍या सुंदर कथा आहेत असें म्हणतो. यांत कंस पाण्डूच्या पांच पुत्रांपाशीं अर्धराज्य मागतो; आणि चार ऋषी मध्यस्थी करण्याकरितां कंसाबरोबर जातात. याशिवाय पुढें असें दाखविलें आहे कीं 'ते सर्व रणभूमीवर यज्ञ करितात. पाण्डव राजांच्या यज्ञिय पशूचें नांव रावण होतें आणि कुरूंचा पशु एक ब्राह्मण होता. तेथें द्विजांनीं त्याला सहकुटुंब युद्धांत मरशील असा शाप दिला. {kosh याचा अर्थ काय असावा म्हणून व्हान तुक पृच्छा करितो.}*{/kosh}

(३) इनुकर्तपतीचीं साहसकृत्यें. कुरिपनच्या राजास पुत्र होतो. त्याचें नांव अस्मारनिंगरत् ओंदकजय लस्मिनिंगपुरिचंद्रकिरण. दहराजकन्या इच्या जन्माची कथा. तिला रानांत बतार काल यानें पळवून नेलें आणि तिचें व तिच्या दासीचें नांव बदललें, तिच्या शोधार्थ कुरिपनचा राजपुत्र जातो आणि त्या प्रंसगी रंग्ग अरिय कुद नष्टप हें नांव धारण करितो.
(४) शुकानें सांगितलेल्या कथा.
(५) एका जावानी कथेची पुनरावृत्ति.
(६) नंबर ३१ पहा.
(७) राजाचें नांव सरिनरइन्दर दिचंपक जजर. स्त्रीपात्रांची नांवें किन् नदहान, किन् पंगलिपुर. पुरूष पात्रांचीं नांवें, वीर दंडनि, वीर पंडप, वीरकर्ता. नायक नायिकेवर प्रेम करितो. नायिकेचें नांव पुष्पकंचना. तिचे सौंदर्य प्रेमदेवता (यंग् यंग् कसुम) जनुवति आणि स्वर्गीय अप्सरा निल उतमा यांसारखें होतें. निरोप पाठविण्यास पंगलसन् याची योजना होते. पदुक लिकु, पदुक महादेवी, पदुक मतुर या त्याच्या पूर्वींच्या बायका होत्याच. इन्द्र प्रेम्यजनांस एकत्र करितो.
(८) नंबर १७ पहा.
(९) बकरम पुस्प याचा मुलगा इन्दर पुतर याचीं साहसकृत्यें. बकरम पुस्प हा सामन्त पुराचा राजा. एका सुवर्णमयूरानें नायकास पळवून नेलें. नायकास शाहसियायनें बर्मसक्तीकडे पाठविलें. इन्दर किल पर्वतावर तो राक्षस मारतो. जगांतच एक चमत्कारिक समुद्र पाहतो. कुमाल रत्‍नासारी नामक राजकन्येला भेटतो. लेलामंगरण नामक प्रतिस्पर्धि राजपुत्रास राजकन्याग्रहणयोग्यतासिद्ध्यर्थ आपल्या अमानुष शक्ती दाखवितो. एक राक्षस त्यास नेतो. त्याच्या मुलास तो मारतो. सोन्याचे व रत्‍नांचे पर्वत पाहतो. चमत्कारांचे व प्रेमाचे समुद्र पाहतो. एका गुहेंत एक महिना प्रवास करितो. एक मोठा साप व एक मोठा राक्षस मारतो. त्यास धर्मगंग भेटतो. तो त्यास शत्रुस जिंकण्याचीं अमानुष साधनें शिकवितो. शेवटीं तो घरीं येतो आणि इन्दर  मगिन्दर नांव धारण करून समन्तपुराचा राजा होतो.
(१०) डच ईस्ट इंडिया कंपनीशीं झालेले तहनामे.
(११) नंबर ५ पहा.
(१२) ही एक गोष्ट असून तिचीं सोळा प्रकरणें आहेत. आरंभीं कथेचा थोडक्यांत सारांश दिला आहे. नायक एक मोठा राजा होता. तो काफ पर्वतावर (चीन देशांत) व देवलोकांत जाऊन येतो. तो मनुष्यें, पिशाच्चें वगैरे आपल्या सत्तेखालीं आणतो. समन्द पुरी नांवाचें राज्य होतें. तेथील राजा सरियवन नांवाचा होता. तो इन्दरदेव महरम रुप या राजाचा पुत्र होता. त्याची राणी एक मानवी होती. त्याला राजा अर्दान व राजा मर्सदन नांवाचे पुत्र होते. ते दोघे राजपुत्र समन्त बरन्त नांवाच्या अरण्यांत गेले. तेथें सरम देव हा विहार करण्याकरितां येत असे. हा देव त्या राजपुत्रांच्या पित्याचा द्वेष करीत असें. कारण त्यानें पूर्वीं त्याच्या घराचा नाश केला होता. त्या देवानें म्हातार्‍याचें रूप घेऊन त्या राजपुत्रांची आपल्याला चाकरीस ठेवण्याविषयीं प्रार्थना केली. पुढें त्या राजपुत्रांस त्यांच्या लोकांपासून दूर नेल्यावर त्या देवानें एका हत्तीचें रूप घेतलें. त्याच्या पाठीस लागून अर्दान हा आपल्या भावापासून बराच दूर गेला. तेव्हां तो देव त्याला उचलून आकाशांत उडाला; परंतु त्या राजपुत्रानें त्यास ठार मारिलें. नंतर अर्दान खालीं उतरल्यावर त्याची व बायु राम नांवाच्या ऋषीची भेट झाली. त्या ऋषीनें त्याला सर्व अमानुष विद्या शिकविल्या. मर्सदन आपल्या भावाचा शोध करीत इन्दपुर येथें येतो व तेथील राजाच्या एकुलत्या एक मुलीशीं लग्न लावतो आणि सासर्‍याचें सिंहासन पटकावतो. अर्दान याजकडून अनेक साहसकृत्यें होतात. उदाहरणार्थ, एका राजकन्येची तिच्या दासीकडून सोडवणूक. या कथेचा नायक वर्म शेहगंद हा कलिंगदेव येथील राजा मर्सदनशाह याचा मुलगा होता आणि याच्या ज्येष्ठ बंधूचें नांव राजादिराज असें होतें.
(१३) सांपडत नाहीं.
(१४) पंजि कथासंग्रहांतील एक कथा. कुरिपनचा राजपुत्र आणि दह राजकन्या यांजविषयीं.
(१५) भौम काव्याचें जें संविधानक तेंच याचेंहि आहे. भौम हा पृथ्वीला विष्णूपासून झालेला पुत्र होता. तो बलवान झाला. देव त्यास भिऊं लागले. तो तपस्व्यांस त्रास देऊं लागला म्हणून कंसाने (कृष्णानें) त्याजवर आपला पुत्र सांब यास पाठविलें. भौमास शेवटीं हनुमानानें मारलें. भौमानें सांबास व अर्जुनास मारिलें होतें, पण नारदानें त्यांस जिवंत केलें. धर्मदेव व धर्मदेवी यांची कथा यांत आली आहे.
(१६) धर्मदेव विष्णूच्या आराधनेनें सांब होतो व धर्मदेवी जनुवती होते.
(१७) ग्रंथकाराचें नांव नुरूद्दिन इब्न अली इब्न हसनजी. हमिद जातीच्या महंमदाचा मुलगा. १०४० हिजरीमध्यें हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचीं पुस्तकें सात आहेत. पहिलें पुस्तक-जग आणि पृथ्वी यांची उत्पत्ति. दुसरें पुस्तक-अनेक प्रकारणांचें-द्रष्टे व राजे यांविषयीं. तिसरें पुस्तक-सहा प्रकरणांचें-चांगले राजे आणि हुषार मंत्री यांविषयीं. चवथें पुस्तक-दोन प्रकरणांचें-चांगले राजे आणि सदाचरणी लोक यांविषयीं. पाचवें पुस्तक-दोन प्रकरणांचें-वाईट राजे आणि अन्यायी मंत्री यांविषयीं. सहावें पुस्तक-दोन प्रकरणांचें-उदार माणसें व थोर पुरुष यांविषयीं. सातवें पुस्तक-पांच प्रकरणें-सर्व शास्त्रें, वैद्यक, सामुद्रित, इतिहास इत्यादि.

या ग्रंथांत मलायी वाङ्‌मयाच्या नवीन वाचकांस उपयुक्त अशा बर्‍याच कथा आहेत. दुसर्‍या पुस्तकाच्या बाराव्या प्रकरणांत बराच इतिहास आलेला आहे आणि तेराव्या प्रकरणांत अचिन संस्थानचा इतिहास आलेला आहे.
(१८) मलायी ऐतिहासिक कथांचा संग्रह-शेवटचें प्रकरण मलाका येथील पोर्तुगीजांच्या विरूद्ध नयांचा कट हें आहे.
(१९-२०) राजपुत्र कुरिपन यास बतर इन्दर यानें स्त्री करून टाकलें त्याची हकीकत.
(२१) कौरवपाण्डवयुद्ध.
(२२) मलायी रामायण.
(२३) हिकायत दरंग इन्दर केसरी. पुस्तकाचे अनेक भाग असून प्रत्येक भागांत एक गोष्ट आहे; व ती मुख्य गोष्टीशीं संबद्ध आहे. दह राजकन्येच्या गोष्टीभोंवतींच या सर्व गोष्टी विस्तारलेल्या आहेत.
(२४) शंभु, ब्रह्मा, महादेव, विष्णु, देवी सारी, हे चार पुरुष व एक कन्या यांची उत्पत्ति गुरूनामक एका अडामच्या वंशजापासून वर्णिली आहे.
(२५) कुरिपन राजपुत्र व दह राजकन्या यांची कथा.
(२६) वरील विषयावरच दुसरी कथा.
(२७-२८) वरील विषयावरील कथा.
(२९) दह राजकन्येला सर्प केलें आणि एका सरोवरांत रहावयास पाठविलें.
(३०) चेरिबोन येथील राजे यांची नुरूद्दिन नांवाच्या एका मंहमदाच्या वंशजापासून उत्पत्ति. चेरिबोन येथील राजांचा सुलतान अनामपर्यंतचा वृत्तांत. यांत जरी मूर्खपणा बराच भरला आहे तरी ऐतिहासिक माहिती सांपडणें अशक्य नाहीं.
(३१) थरफचा राजा शाह प्रस्ताद इन्दर लक्षण याचा मुलगा हा नायक आहे. राजा बलाढ्य परंतु वानर राजा बलिय इन्दर यास खंडणी देणारा. बलिय इन्दराचें राहणें कुर्दरी येथें असे. ज्येष्ठ राजपुत्राचें नांव कुबाद लेला इन्दर असें आहे आणि पुढें शाह कुबाद जहिम अरिफिन असेंहि आहे. मुलास बापाला खंडणी द्यावी लागते याबद्दल वाईट वाटतें व तो बापास मुक्त करण्याचा प्रयत्‍न करितो. या कामांत त्याला एका राक्षसाचें साहाय्य होतें व तो राक्षस पुढें त्याचा नातेवाईक ठरतो.
(३२)-(अ) रीतीभाती आणि राजे व मंत्रिमंडळें यांचे विधी, निशाणें वगैरे बद्दल.
(आ) तोडक नांवाच्या माशानें इन्दर पुरावर केलेला हल्ला आणि त्यापासून इन्दर पुराची सोडवणूक.
(इ) पोर्तुगीजांचें आगमन आणि त्यांची मलाका घेण्याकरितां खटपट.
(ई) निशाणांवरील चिन्हांचे अर्थ.
(उ) राजपुत्र देव विष्णु याचीं साहसकृत्यें.
वर दिलेल्या माहितीवरून मलायी वाङ्‌मयाची बरीचशी कल्पना वाचकांस येईल. इकडील भाषांचें मिश्रण तिकडील भाषांत कसें झालें आहे तें दाखविलेंच आहे. वरील कथांमधून अ‍ॅडाम व भारतीय पौराणीस व्यक्ति यांचे संबंध कसे जोडण्यांत आले आहेत व पौराणिक व इतर कथांचीं रूपें कशीं पालटण्यांत आलीं आहेत तेंहि या वर्णनावरून दिसुन येईल.