प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

मलयु व अरबी.- मलयु आणि अरबी या भाषांच्या संबंधाबद्दल मार्सडेन याचें असें म्हणणें आहे कीं "मलयु भाषेमध्यें जे अरबी शब्द आढळून येतात ते मुख्यत्वेंकरून ग्रंथकारांनीं आपल्या सांप्रदायिक बाबतींतील विद्वत्त्वाचें प्रदर्शन करण्याकरितां घुसडून दिलेले दिसतात. अरबी शब्द बहुतेक कायदा व पारमार्थिक बाबतींमध्येंच दिसून येतात. ते साध्या व रोजच्या व्यवहारांतील गोष्टी दाखविण्याच्या कामीं क्वचितच उपयोगिले जातात. संभाषणांमध्येंहि त्यांचा उपयोग क्वचितच दृष्टीस पडतो. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे अरबी शब्द मलयु भाषेंत पूर्णपणें अद्यापि मिसळलेच नाहींत." यावर लेडेन याचें असें म्हणणें आहे कीं वरील गोष्ट जरी सामान्यतः खरी असली तरी विद्वान् लोकांच्या संभाषणामध्यें अरबी शब्द आढळून येतात.  त्याप्रमाणेंच मलयु ग्रंथांमध्यें अरबी शब्दांचा भरणा जरी संस्कृत व तज्जन्य शब्दांपेक्षां बराच कमी असला तरीं तो वर लिहिल्याप्रमाणें अगदींच अनुल्लेख्य नाहीं. मार्सडेन यानें या बाबतींत आणखी एक गोष्ट नमुद करून ठेविली आहे कीं अरबी शब्दांतील उच्चाराचें काठिन्य तसेंच कायम ठेवण्यांत आलें आहे, परंतु संस्कृत शब्दांच्या रूपांत फरक करून त्यांच्या उच्चारांत माधुर्य आणलें आहे. परंतु येथेंहि लेडेन याचा प्रमाणाच्या बाबतींत मार्सडेनशीं थोडासा मतभेद आहे.