प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
बोर्निओ.— आतां बोर्निओ बेटाकडे जाऊं. बोर्निओ बेटांत अनेक जातींचे लोक आहेत. बोर्निओ हें बेट एक राष्ट्र कधींच नव्हतें, आणि आपल्या बेटावरील लोक इतर लोकांपासून निराळे आहेत अशा प्रकारची भावना देखील या लोकांस नव्हती. अशी भावना नसण्याचें कारण या बेटाचें विस्तीर्णत्व आणि लोकांची असंस्कृति हें होय. या बेटास हिंदुत्वाचा स्पर्श होऊन हिंदु संस्कृतीची छाप येथें पडूं लागली होती पण ती क्रिया फारशी जोरानें वृद्धिंगत झाली नाहीं. सध्यां या देशांतील रानटी लोक सोडून दिले तर उरलेले लोक मुसुलमान आहेत आणि बोर्निओ बेटाच्या उत्तरेच्या भागास एक ब्रुनीई नांवाचें संस्थान आहे तेथील शास्ता मुसुलमान आहे. बोर्निओमध्यें आग्नेयीस हिंदूंच्या वसाहती फार पूर्वापारपासून होत्या. त्या वसाहतींची नांवें 'अमुंगताई' आणि 'मार्तापूर' हीं होत. प्राचीन हिंदूंच्या वसाहतींचे इमारती वगैर अवशेषांखेरीज इतर परिणाम अजून दिसून येतात, असें एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका (बोर्निओ शब्द पहा) म्हणतो, पण ते परिणाम कोणते हें विशेषत्वानें सांगत नाहीं. ब्रुनीई या संस्थानांमध्यें १५ व्या शतकामध्यें हिंदु राज्य होतें व नंतर तेथें मुसुलमानी राज्य झालें असें कळतें. तथापि पुन्हां जावा येथील पुन्हां जावा येथील राजा अदयमिंग्रत याचा सेनापति अंकविजय यानें १५ व्या शतकाच्या शेवटीं ब्रुनीई जिंकलें असें जावा येथील इतिहासकार लिहितात. बोर्निओमध्यें एक इंग्रजी संस्थान सारावाक नांवाचें आहे, तेथील शास्त्यास राजा असें म्हणतात. तेथील पहिला इंग्रज 'राजा' सर जेम्स ब्रुक होता ही गोष्ट सर्वप्रसिद्धच आहे.