प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

बत्ता.— बत्ता ही लेडेन याच्या मतें सुमात्रांतील सर्वांत जुनी भाषा आहे. सुमात्रा बेटाच्या मध्यभागीं राहणारे बत्ता लोक ही भाषा वापरतात. हे लोक कांहीं कांहीं बाबतींत मलायी लोकांपेक्षांहि सुधारलेले असून त्यांच्यामध्यें नरभक्षणाचा प्रघात असल्यामुळें या लोकांकडे फार प्राचीन काळापासून यूरोपीय लोकांचें लक्ष गेलें आहे, परंतु त्यांच्याबद्दल अद्यापि विशेषशी माहिती मिळत नाहीं. यांच्याबद्दल मार्सडेन यानें आपल्या 'सुमात्राच्या माहितीचा इतिहास' या ग्रंथांत कांहीं माहिती दिली आहे परंतु लेडेन याच्या माहितीचा त्या माहितीशीं विरोध आहे. मार्सडेन यानें असें म्हटलें आहे कीं हे लोक फक्त गुन्हेगार व शत्रूकडील कैदी यांनांच खातात, परंतु लेडेन याच्या माहितीप्रमाणें ते स्वतः असें सांगतात कीं ते केव्हां केव्हां स्वतःचे नातलगहि वृद्ध व अशक्त झाले म्हणजे खातात व तें केवळ नरमांसाची चटक लागल्यामुळें नव्हे तर धार्मिक विधीचा भाग ह्मणून खातात. जेव्हां एखादा मनुष्य वार्धक्यामुळें या जगास कंटाळतो तेव्हां तो मीठ व लिंबें स्वस्त असतील अशा दिवसांत आपल्या मुलांनां बोलावून स्वतःस भक्षण करण्यास सांगतो. नंतर तो एका झाडावर चढतो व त्या झाडाभोंवतीं त्याचे इष्टमित्र व आप्‍त जमतात आणि तें झाड हलवतात. झाड हलवतेवेळीं ते एक अंत्येष्टिगीत म्हणतात. त्याचा अर्थ 'ऋतु प्राप्‍त झाला आहे, फळ पिकलें आहे, तें पडलें पाहिजे' असा असतो. नंतर तो खालीं उतरतो व जे त्याचे अगदीं जवळचे किंवा विशेष लाडके नातलग असतील ते त्याचा जीव घेतात व सर्वजण मिळून मोठ्या गंभीरपणें त्याची मेजवानी झोडतात. ही वरील गोष्ट मार्सडेन यानें सांगितलेल्या हकिकतीपेक्षां अधिक अविश्वसनीय असेल. परंतु ती बत्ता लोकांनींच सांगितलेली आहे व त्यांच्याजवळ राहणारे मलायी लोकहि याप्रमाणेंच सांगतात. {kosh पहा बिकमोर १. १. पृ ४४६; जे. जे. द हॉलंडर लँड एन व्हॉलकेन कुंडे भा. १. पृ. ७९४-६; मार्कोपोलो, भाग २ पृ. २३१, ४०, ४१.}*{/kosh}

हिरोडोटस यानेंहि हुबेहुब असेंच वर्णन दिलें आहे मात्र तेथें त्यांनें लोकांचें नांव पदय अथवा पदइओइ असें दिलें आहे. {kosh Herodotus, Lib III S. 99,}*{/kosh} पण पदइओइ हें बत्ता याचाच अपभ्रंश असावा; कारण ग्रीक भाषेंत पालि याचें बालि असें रूप अनेक ठिकाणीं आढळतें.

बत्ता लोकांच्या ज्या निरनिराळ्या जाती लेडेन यास आढळ्या त्या (१) बत्ता सेबलुंगु (२) बत्ता पदेमबनिम (३) बत्ता कवलु (४) बत्ता  पन्नइ (५) बत्ता तोइउ (६) बत्ता कुरुलंग (७) बत्ता सिपगबु (८) बत्ता बिल, या होत. बत्ता लोकांतील चालीरीती बर्‍याचशा मलबारमधील नायर लोकांच्या चालींप्रमाणें आहेत. तेथें वंश मातृकन्यापरंपरेनें चालतो असें अनेक लेखक लिहितात, तथापि लेडनच्या लेखाचा पुनरावृत्तिकार मॅक्सवेल ही गोष्ट सध्या चालू असलेला कायदा पाहिला असतां आढळत नाहीं असें ह्मणतो.

बत्ता भाषेचा मलयु, बूगी व बिम भाषांशीं जरी विशेष संबंध असला तरी तिच्यांतहि बर्‍याच गोष्टी मूळच्याच आहेत. रचनेच्या बाबतींत ती मलयूप्रमाणेंच साधी आहे, परंतु तिचें बूगीशीं बरेंच साम्य आहे. बूगी लोकांतीलहि बर्‍याचशा चाली बत्ता लोकांप्रमाणेंच आहेत. बूगी लोकांतील रज्ज अथवा तरज्ज जातींतील लोक अद्यापीहि (लेडनच्या काळीं १८०० च्या सुमारास) युद्धांतील कैदी खातात असें सांगतात. सुमात्रा बेटांत ज्या निरनिराळ्या भाषा दिसतात त्यांच्या मुळाशीं बत्ता भाषा हीच आहे. मलायी लोकांमध्यें अचिनी जातीच्या लोकांत व मलबाराकडील मापिल्ला लोकांत विशेष साम्य आहे; आणि त्यांच्या भाषेमध्येंहि बरेच मापिल्ला शब्द आहेत.

बत्ता भाषेमध्यें फार प्राचीन काळापासून अनेक ग्रंथ तयार झाले आहेत, परंतु लेडेन यास फक्त पुढील ग्रंथांची माहिती मिळाली. (१) शिव मरंगज (२) शिव जरंग मुंदोप (३) राजा इसिरि (४) मलमदेव.

या भाषेची वर्णमाला फार चमत्कारिक असून तींतील अक्षरांच्या आकृती व अनुक्रम हींहि फार विचित्र दिसतात. एकंदर अक्षरें एकोणीस असून बूगीप्रमाणें सहा स्वरांनीं त्यांचे निरनिराळे उच्चार होतात. परंतु बत्ता भाषा लिहिण्याची पद्धति मात्र सर्व परिचित पद्धतींहून निराळी आहे. या भाषेंतील अक्षरें एकापुढें एक डावीकडून उजवीकडे अगर त्याच्या उलट लिहीत नाहींत व चिनीप्रमाणे वरून खालीं लिहीत येत नाहींत तर त्याच्या उलट खालून वर एकावर एक लिहीत येतात.* मेक्झकोमधील चित्रलिपीहि अशीच लिहीत असत. त्यांचीं लिहिण्याचीं साधने म्हणजे बांबूचा तुकडा अथवा झाडाची फांदी आणि कांट्याचें टोंक हीं होत. त्यांचे ग्रंथ म्हणजे या बांबूच्या व लांकडांच्या मोळ्या होत. मार्सडेन यानें आपल्या सुमात्राच्या इतिहासांत या भाषेची वर्णमाला दिली आहे. परंतु यानें ते वर्ण आडव्या ओळींत लिहिले आहेत, यामुळें थोडा घोटाळा होतो. बत्ता लोक केव्हां केव्हां जिवंत झाडांवर लिहितात व अशा वेळीं ओळ सरल्यानंतर रिकामी जागा रहाते ती वरच्या बाजूस असते. या भाषेंतील वर्ण बरेचसे बूगी व तागाल भाषांतील वर्णांशी जुळतात.