प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
पूर्वेकडील राज्यपद्धति. - या पूर्वेकडील देशांत दोन अधिकारीवर्गाकडून राज्य चालविण्यांत येतें; या वर्गांना चीन देशांतल्या प्रमाणे दिवाणी व लष्करी अंमलदार येतात व त्यांनां म्यान्डारिन्स असें नांव आहे. या दोन वर्गांतील वरिष्ठ लोक राजाच्या मंत्रिमंडळांत असतात. प्रत्येक प्रांताला एक दिवाणी सुभेदार (प्रांताधिकारी) आणि एक लष्करी अधिकारी (सेनानायक) असतो; त्यांच्या मदतील एक राजप्रतिनिधि व एक दुय्यम प्रांताधिकारी असतो. लष्करी बाबी सोडून इतर सर्व बाबतींत तीन मुलकी अधिकार्यांनीं एकत्र काम केलें पाहिजे, असा कायदा आहे. पुष्कळ वेळां असें होतें कीं, खालच्या अंमलदारांनां विषयाचें चांगलें व्यावहारिक ज्ञान असल्यानें, वरिष्ठांपेक्षां त्यांचेंच जास्त वजन पडतें. बंड किंवा लढाई उपस्थित झाल्यास सेनानायक स्वतंत्रपणें अधिकार चालवितो त्या वेळीं त्याचा अधिकार अप्रतिहत असून त्याच्या हातीं सर्वांच्यां जीवितमरणाची सत्ता असते. राज्यव्यवस्थेकरितां प्रत्येक प्रांतात तीन जिल्हे पाडतात, त्यांना हुयेन असें म्हणतात. प्रत्येक जिल्ह्यांत तीन चार तालुके असतात व प्रत्येक तालुक्यांत कांहीं गांवें असतात. टांकिन आणि कोचिन-चीनमध्यें चिनी लोकांनीं शहरांचे तीन वर्ग पाडण्याची पद्धत पाडली. या विभागणीमुळें व शहराच्या नांवाला फू, शू, हि आन हीं दर्जाप्रमाणें उपपदें लावल्यानें, त्यांचा दर्जा ओळखतां येतो. जिल्ह्यावर दोन मुलकी अधिकारी नेमण्यांत येतात;
प्रांताधिपतीच्या शिफारशीवरून दरबारकडून यांची नेमणूक होते. इतर मुलकी अधिकारी यांच्या हाताखालीं असतात. जुन्या चालीस अनुसरून, गांवकरी गांवचा मुख्य निवडतात व सरकारहि तो कबूल करितें. कारण यांचा विशेषतः करवसूली व सैन्यभऱती करण्याकरिता बराच उपयोग होतो.