प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
परमार्थसाधन आणि तत्त्वज्ञान.- कोचिन-चीनमध्यें प्रचलित असलेल्या परमार्थसाधनविषयक गोष्टींची सविस्तर माहिती येथें देणें अशक्य असल्यामुळें, त्या विषयावरील फक्त कांहीं गोष्टींचा आपण विचार करूं. या बाबतींत बहुतेक पौरस्त्य राष्ट्रांहून अनामी लोक बरेच भिन्न आहेत. चिनी लोकांच्या धर्मांशीं त्यांच्या धर्मांचें पुष्कळ साम्य आहे, परंतु चिनी लोकांपेक्षां त्यांचें परमार्थाकडे फारच कमी लक्ष आहे. चिनी लोकांप्रमाणेच पितृपूजा ही यांच्या धर्मांतील मुख्य गोष्ट आहे. चीनप्रमाणेंच येथील अधिकारी कन्फ्यूशसच्या तत्त्वाचे अनुयायी आहेत. या देशांत गौतमबुद्धाचे अनुयायी अगदीं थोडे आहेत. या लोकांची फारच थोडीं देवालयें असून यांचे उपाध्याय बहुतेक बाबतींत चिनी उपाध्यायांसारखेच आहेत. पूर्वेकडील उपभारताच्या या भागांत अगदीं अलीकडे म्हणजे इ.स. १५४० त या संप्रदायाचा प्रवेश झाला.
स्वभाव.- अनामी लोकांच्या स्वभावांत, त्यांच्या विशिष्ट अप्रौढतेचें व परकीय म्हणजे यूरोपियन लोकांच्या संस्कृतिवर्चस्वाचें मिश्रण दिसून येतें. जुलमी राजाच्या अंमलाखालीं असूनहि ते हुषार, बुद्धिवान् व संतुष्ट आहेत; परंतु याबरोबरच, ते हट्टी व गलिच्छ असून यांचें खाद्यहि ओबडधोबड असतें; उदाहरणार्थ, ते जीवजन्तु व सुसरीचें मांस खातात. खालच्या वर्गांतील लोक आतिथ्यपर व सलोख्यानें वागणारे आहेत, परंतु सरदारलोक मितभाषणी व गर्विष्ठ असून लोभी आहेत. हे दुर्गुण सामान्य लोकांत आढळून येत नाहींत. चिनी व इतर पूर्वेकडील लोकांप्रमाणें हे लोक इतर राष्ट्रांतील लोकांनां रानटी समजून त्यांनां तुच्छ मानतात; तथापि परकीय म्हणजे यूरोपियनांच्या युद्धकलेचें व कापड तयार करण्याच्या कलेचें अनुकरण करण्यास ते मागें पुढें पाहत नाहींत. त्यांनीं तयार केलेल्या दुबारी बंदुका व रेशमाचें काम हीं यूरोपियन कामासारखीं चांगलीं होतात. अनामी लोकांच्या या कौशल्यानें त्यांच्या मूळच्या गर्विष्ठपणांत बरीच भर पडली आहे.