प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

तागाल — तागाल, ता-गाल अथवा गाल भाषा ही, ज्याप्रमाणें मलाया द्वीपकल्पांत व बेटांत मलयु अथवा हिंदुस्थानांत हिंदुस्थानी सर्वत्र आढळतात, त्याप्रमाणें  फिलिपाइन बेटांत सर्वत्र आढळते. या भाषेंत ग्रीक भाषेप्रमाणें उपपदें आहेत, ती लॅटिनप्रमाणें प्रौढ असून तींत शब्दसंग्रह मोठा आहे, ती हिब्र्यूप्रमाणें गूढ आहे आणि इटालियनप्रमाणें व्यापाराच्या व आदरसत्काराच्या बाबतींत मधुर आहे, असें एका स्पॅनिश मिशनर्‍यानें तिचें वर्णन केलें आहे. थिवेनॉट यानें एका स्पॅनिश मिशनर्‍याच्या ग्रंथांतील माहिती आपल्या प्रवासावरील ग्रंथांत घेतली आहे, तींत असें म्हटलें आहे कीं, जरी फिलिपाइन बेटांत प्रत्येक जिल्ह्यांत स्वतंत्र भाषा आहे तरी त्या सर्वांमध्यें परस्परसंबंध असून एकसूत्रीपणा आहे. या सर्व भाषांमध्यें तागाल हीच जराशी संस्कृत भाषा दिसते. दुसरी एक विसाय हीहि बरीच सामान्य आहे. पण ती रानटी आहे.

तागाल भाषेचा अभ्यास यूरोपीयांपैकीं  प्रथम स्पेनमधील मिशनरी लोकांनीं केला. फ्रा. गास्पर यानें एक व्याकरण लिहिलें त्याच्या १७०३ व १७८७ मध्यें दोन आवृत्ती निघाल्या. याखेरीज त्यानें तागाल भाषेंत कांहीं ख्रिस्तसांप्रदायिक ग्रंथ लिहिले. यानंतर फिलिपाइन भाषेंतील ग्रंथांची एक यादी प्रसिद्ध झाली आहे {kosh In Bibliotheca Philippina by F. Blumentritt pp.83-7}*{/kosh} (१८८२); आणि कांहीं व्याकरणेंहि प्रसिद्ध झालीं आहेत.

तागाल भाषेंत १४ व्यंजनें व तीन स्वर मिळून १७ वर्ण आहेत. ही भाषा बांबू अथवा ताडपत्र यांवर लोखंडाच्या अणकुचीदार खिळ्यानें लिहितात. ही भाषा चिनी भाषेप्रमाणें वरून खालीं लिहीत असें स्पॅनिश मिशनरी म्हणतात, पण बांबू व खिळा या साधनांवरून व यांतील वर्ण बत्ता वर्णांप्रमाणें दिसतात यावरून ती बत्ताप्रमाणेंच खालून वर लिहीत असावे असा लेडेन याचा तर्क आहे. जे लोक अजून ख्रिस्ती कळपांत शिरले नाहींत ते अद्यापीहि तागाल भाषा वापरतात. व कांहीं बाटलेले ख्रिस्तीही पत्रव्यवहारांत तागाल भाषाच वापरतात. ही भाषा मलयु, बुगीस, जाबानी या भाषांच्याच वर्गांतली आहे.

तागाल भाषेंतील वाङ्‌मयासंबंधीं जी माहिती निरनिराळे मिशनरी देतात त्यांच्या हकिकतींत बराच विरोध दिसतो. कांहीं म्हणतात कीं, त्या भाषेंत ऐतिहासिक अथवा शास्त्रीय वाङ्‌मय मुळीच नाहीं; तर कांहींचे म्हणणें आहे कीं, त्यांच्यामध्यें ऐतिहासिक काव्यें बरींच प्रचलित आहेत. त्यांनीं स्वतः लेडेन यास दिलेल्या माहितीवरून असें दिसतें कीं, त्यांच्या पूर्वींच्या सांप्रदायिक व परंपरागत कथा, त्यांचे वंशेतिहास आणि त्यांच्या पौराणिक कथा व देवतांच्या पराक्रमाविषयीं गोष्टी त्यांच्या काव्यांतून व गाण्यांतून भरपूर आहेत. हीं गीतें सर्व लोक लहानपणीं पाठ करतात व समारंभांच्या आणि विधींच्या वेळीं म्हणतात. ख्रिस्ती मिशनर्‍यांनीं तेथील लोकांच्या आत्म्याबद्दल वाटणार्‍या कळकळीनें हीं जुनीं गाणीं नाहींशीं करण्याचा व त्यांच्या जागीं आपल्या सांप्रदायिक विषयांवर तागार भाषेंत गाणीं रचून तीं प्रचारांत आणण्याचा पवित्र उद्योग चालविला आहे व अशा रीतीनें त्यांच्या राष्ट्रीय वाङ्‌मयाचे अवशेष नाहींसें करण्याचा स्तुत्य उपक्रम केला आहे असें लेडेन म्हणतो ! लेडेन यास तागाल काव्यें उपलब्ध न झाल्यामुळें त्यानें त्यांचा नमुना किंवा नांवें दिलीं नाहींत.

बिसय व इतर अनेक किरकोळ भाषा या बेटांत व आसपास प्रचलित आहेत पण त्यांची विशेषशी माहिती उपलब्ध नाहीं.

बौर्निओच्या ईशान्य किनार्‍यावर तिरुन अथवा तेडाँग नांवाच्या एका जातीचे लोक राहतात ते नरमांसभक्षक आहेत. ते इदान नांवाच्या एका जातीपैकींच एखाद्या पोटजातीचे असावेत व डच लोक ज्यांनां हरफेर म्हणून म्हणत ते हेच असावेत. इदान लोकांस कांहीं ठिकाणीं मरुत असें म्हणतात. या शब्दाचा मरुद्‍गणांशीं किंवा मारुति, वानरांचा सेनापति, याच्याशीं कांरीं संबंध असेल कीं काय अशी शंका लेडेन यानें घेतली आहे.

इदान, तिरुन, पापुआ इत्यादि या बेटांत सांपडणार्‍या जाती अतिशय रानटी आहेत. त्यांच्या पैकीं प्रत्येक मनुष्यास आयुष्यामध्यें एक तरी शत्रूची कवची मिळवावी लागते. यांपैकीं कांहीं अगदीं दिगंबर स्थितींत रहातात. अरब प्रवाश्यांनीं यांची वर्णनें केवळ राक्षसांप्रमाणें केलीं आहेत.