प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
खोहमेन.— कांबोजमधील जी ‘ख्मेर’ भाषा तिचेंच हें सयामी नांव आहे. या भाषेचा फ्रेंच लोकांनीं बराच अभ्यास केला आहे. ही भाषा मेकॉन अथवा कंबुचतची कांबोज नदी इच्या तीरावर राहणारें याच नांवाचें एक राष्ट्र वापरतें. लेडेन याच्या कालीं या भाषेचा फारसा अभ्यास झाला नव्हता. ही भाषा थइ, अथवा कोचिनचीनमधील भाषा जुआन यांच्याहून भिन्न आहे. हें राष्ट्र प्राचीन काळीं फारसें संस्कृत नव्हतें. यांनां पोर्तुगीज इतिहासकारांनीं ‘ग्वो’ असें उल्लेखिलें आहे. हे नरमांसभक्षक असून आपलीं शरीरें गोंदवीत असत असें सांगतात. डी बॅराँस यानें कोमो व कांबोज अशीं या ठिकाणीं समुद्रकिनार्यावर दोन राष्ट्रें होतीं असा उल्लेख केला आहे.