प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
कांबोज. - कांबोजमध्यें शिवपूजन व ब्राह्मणमहत्त्व हीं अजून आहेत आणि यामुळें या देशाविषयीं आपणास स्वाभाविकपणें अधिक जिज्ञासा वाटते; आणि तीहि हिंदुत्वाच्या भरभराटीच्या काळासंबंधीं वाटतें. पाश्चात्य सत्तेचें दडपण पडल्यामुळें कांबोजाचें हिंदु स्वरूप पूर्वींप्रमाणें अविकृच राहिलें नाहीं. हें अविकृत स्वरूप जाणण्यासाठीं जर आपणास अधिक प्राचीनकाळाचें चित्र उपलब्ध होईल तर चांगलें असें जाणून तेराव्या शतकाच्या अंतिम चरणांत कांढलेलें एक चित्र आम्ही पुढें देत आहों. या चित्रांत दोष एवढाच आहे कीं, तेथील बौद्ध संप्रदायाची माहिती यांत चांगली दिली आहे तरी ब्राह्मणी संस्कृतीच्या म्हणजे वेदमूलक उपासना, उत्तरकालीन हिंदु उपासना, ब्राह्मणमहत्त्व यांच्यां संबंधानें माहिती त्यांत नाहीं. हें चित्र एक चिनी अधिकारी इ. स. १२९५ मध्यें कांबोजला गेला होता त्यानें काढिलें आहे आणि त्याचा अनुवाद लासेन यानें आपल्या ‘भारतीय प्राचीन संस्कृती’ वरील ग्रंथांत केला आहे. आम्ही हा अनुवादच येथें उद्धृत करीत आहों. कांबोजासंबंधाची थोडीशी माहिती वर आली आहे तिच्यांत या चिनी लेखकानें दिलेल्या माहितीची भर टाकणें उपयुक्त होईल.
कंफुकी- चिनी लेखकानें या देशाला किन-ला-केंला असें नांव दिलें आहे; आणि तद्देशीय लोक याला कं-फुकी असें म्हणतात असें सांगितलें आहे. कं-फुकी हें कांबोज (कांबोग) या नांवाचें चुकीचें वर्णान्तर दिसतें.
या देशाचा विस्तार व राजकीय मर्यादा निरनिराळ्या काळी निरनिराळ्या असल्यामुळें याविषयीं चिनी लेखकानें दिलेली माहिती येथें देण्याचा कांहीं उपयोग नाहीं.
कांबोजांत होणार्या तिन्ही कोटींतील (जीवकोटी, वनस्पतिकोटी व खनिजकोटी) पैदाशीविषयीं या चिनी अधिकार्यानें बरीच परिपूर्ण माहिती दिली आहे. परंतु तिनें आपणास प्रस्तुत असलेल्या माहितींत फारशी नवी भर पडण्यासारखी नसल्यामुळें येथें त्याच्या लेखापैकीं कांहीं महत्त्वाचे भाग मात्र आम्ही देणार आहों.
मादक पेयें. - कांबोजी लोकांनां मादक पेयें पिण्याची फार आवड होती; तीं पेयें चार प्रकारचीं असत. पहिला प्रकार मधामध्यें पाणी मिसळून करीत. दुसरा प्रकार फेरी-जासे नांवाच्या झाडाच्या पानांपासून करीत. तिसरा भात व पेज यांपासून करीत. त्याला पान-लेंग-किओ म्हणत, कारण त्या देशांतील भाषेंत भाताला तें नांव आहे. चौथा प्रकार आपण कडू दवणा ज्याला म्हणतों त्या वनस्पतीच्या पानांपासून करीत. यांशिवायल काकवीपासून
रमसारखी दारू करीत असत.
या मादक पेयांची उत्पत्ति किंवा उपयोग यांवर कांहीं नियंत्रण किंवा निर्बंध नसल्यामुळें लोकांत दारूचें व्यसन फार वोकाळलें होतें.
पीकपाणी.- त्या देशांत उन्हाळा व पावसाळा हे ऋतू नियमितपणें उष्णतेचा व पाण्याचा पुरवठा करीत असल्यामुळें एकेका वर्षांतून तीनतीन चारचार पिकें निघतात व त्यामुळें तेथें धनधान्याची अगदीं समृद्धि असे व तीं पिकें ऋतुमानाप्रमाणें अर्थात् निरनिराळ्या प्रकारचीं असत.
नगररचना.- या देशांत पुष्कळ तटबंदी नगरें होतीं. तेथें भिंती पक्क्या विटांच्या बांधीत असत. कांहीं भिंती इतक्या रूंद असत कीं त्यांवर झाडांच्या रांगा लावीत. सन १२९५ सालीं राजधानीच्या शहराचा विस्तार सुमारें सात मैल होता. त्याच्या भोंवतीं खंदक खणून व तट बांधून भक्कम बंदोबस्त केलेला होता. त्याला पांच दरवाजे होते, आणि पुलांवरून
एकेका बाजूला ५४ दगडी मूर्ती होत्या. या मूर्ती राक्षसांच्या असून त्यांचा वर्णनकर्त्याच्या दृष्टीनें उद्येश अर्थात शत्रूंना भिवविण्याचा होता. पूल कमानीवर बांधलेले असून कमानींनां नवतोंडी नागांचा आकार होता. दरवाजांवर बुद्धाचे मोठमोठे दगडी पुतळे होते. त्यांना पांचपांच तोंडें होतीं. ते पश्चिमाभिमुख असून मधला पुतळा सोनेरी होता. दरवाजांच्या आंतल्या बाजूस हत्तींच्या आकृती होत्या. बहुतेक नगरांच्या भोंवतीं तटबंदी असून ती व्यवस्थित बांधलेली होती. रात्रीं दरवाजांनां कुलुपें लावीत असत. शिवाय असा कडक नियम असें कीं कोणाहि संशयित इसमाला नगरांत घ्यावयाचा नाहीं.
देवालयें.- तो चिनी अधिकारी राजवाड्याजवळील टेंकडीवर असलेलें पवित्रस्थान पाहण्यासहि गेला होता. त्या ठिकाणीं २४ दगडी स्तूप असून एक सर्व सोन्याच्या पट्ट्यांनीं आच्छादिलेला असा होता. त्या टेंकडीच्या समोर दोन सोन्याचा मुलामा दिलेले सिंह होते. सिंहाच्या आकृतीवरून बुद्धाच्या शाक्यसिंह या नांवाचा बोध होतो. म्हणून अशोकांने आपण बांधलेल्या स्तूपांवर सिंहांच्या मूर्ती बसविल्या आहेत; व त्यावरूनच त्यांनां सिंहस्तंभ म्हणतात. शिवाय भिक्षूंनां राहण्याकरतां इमारतीं बांधलेल्या होत्या. त्यांच्या पुढें उभारलेल्या बुद्धाचे पुतळे अष्टदेही होते, हें मोठें चमत्कारिक आहे. येथून थोडक्या अन्तरावर तांब्यानें मढवलेला एक उंच स्तूप व भिक्षूंच्या राहण्याच्या इमारती होत्या. त्या चिनी अधिकार्यानें नगराच्या दक्षिणदरवाजाच्या जवळ आणि त्याच्या आग्नेयीस अर्ध्या मैलावर असलेलीं कांबोजच्या राजांच्या पवित्र भावनांची साक्ष पटविणारीं अशीं दुसरी स्थळेंहि पाहिलीं. त्या ठिकाणीं बुद्धाच्या मूर्ती तांब्यांच्या होत्या.