प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

कांबोज. - कांबोजमध्यें शिवपूजन व ब्राह्मणमहत्त्व हीं अजून आहेत आणि यामुळें या देशाविषयीं आपणास स्वाभाविकपणें अधिक जिज्ञासा वाटते; आणि तीहि हिंदुत्वाच्या भरभराटीच्या काळासंबंधीं वाटतें. पाश्चात्य सत्तेचें दडपण पडल्यामुळें कांबोजाचें हिंदु स्वरूप पूर्वींप्रमाणें अविकृच राहिलें नाहीं. हें अविकृत स्वरूप जाणण्यासाठीं जर आपणास अधिक प्राचीनकाळाचें चित्र उपलब्ध होईल तर चांगलें असें जाणून तेराव्या शतकाच्या अंतिम चरणांत कांढलेलें एक चित्र आम्ही पुढें देत आहों. या चित्रांत दोष एवढाच आहे कीं, तेथील बौद्ध संप्रदायाची माहिती यांत चांगली दिली आहे तरी ब्राह्मणी संस्कृतीच्या म्हणजे वेदमूलक उपासना, उत्तरकालीन हिंदु उपासना, ब्राह्मणमहत्त्व यांच्यां संबंधानें माहिती त्यांत नाहीं. हें चित्र एक चिनी अधिकारी इ. स. १२९५ मध्यें कांबोजला गेला होता त्यानें काढिलें आहे आणि त्याचा अनुवाद लासेन यानें आपल्या ‘भारतीय प्राचीन संस्कृती’ वरील ग्रंथांत केला आहे. आम्ही हा अनुवादच येथें उद्धृत करीत आहों. कांबोजासंबंधाची थोडीशी माहिती वर आली आहे तिच्यांत या चिनी लेखकानें दिलेल्या माहितीची भर टाकणें उपयुक्त होईल.

कंफुकी- चिनी लेखकानें या देशाला किन-ला-केंला असें नांव दिलें आहे; आणि तद्देशीय लोक याला कं-फुकी असें म्हणतात असें सांगितलें आहे. कं-फुकी हें कांबोज (कांबोग) या नांवाचें चुकीचें वर्णान्तर दिसतें.
  या देशाचा विस्तार व राजकीय मर्यादा निरनिराळ्या काळी निरनिराळ्या असल्यामुळें याविषयीं चिनी लेखकानें दिलेली माहिती येथें देण्याचा कांहीं उपयोग नाहीं.
  कांबोजांत होणार्‍या तिन्ही कोटींतील (जीवकोटी, वनस्पतिकोटी व खनिजकोटी)  पैदाशीविषयीं या चिनी अधिकार्‍यानें बरीच परिपूर्ण माहिती दिली आहे. परंतु तिनें आपणास प्रस्तुत असलेल्या माहितींत फारशी नवी भर पडण्यासारखी नसल्यामुळें येथें त्याच्या लेखापैकीं कांहीं महत्त्वाचे भाग मात्र आम्ही देणार आहों.

मादक पेयें. - कांबोजी लोकांनां मादक पेयें पिण्याची फार आवड होती; तीं पेयें चार प्रकारचीं असत. पहिला प्रकार मधामध्यें पाणी मिसळून करीत. दुसरा प्रकार फेरी-जासे नांवाच्या झाडाच्या पानांपासून करीत. तिसरा भात व पेज यांपासून करीत. त्याला पान-लेंग-किओ म्हणत, कारण त्या देशांतील भाषेंत भाताला तें नांव आहे. चौथा प्रकार आपण कडू दवणा ज्याला म्हणतों त्या वनस्पतीच्या पानांपासून करीत. यांशिवायल काकवीपासून
रमसारखी दारू करीत असत.
  या मादक पेयांची उत्पत्ति किंवा उपयोग यांवर कांहीं नियंत्रण किंवा निर्बंध नसल्यामुळें लोकांत दारूचें व्यसन फार वोकाळलें होतें.

पीकपाणी.- त्या देशांत उन्हाळा व पावसाळा हे ऋतू नियमितपणें उष्णतेचा व पाण्याचा पुरवठा करीत असल्यामुळें एकेका वर्षांतून तीनतीन चारचार पिकें निघतात व त्यामुळें तेथें धनधान्याची अगदीं समृद्धि असे व तीं पिकें ऋतुमानाप्रमाणें अर्थात् निरनिराळ्या प्रकारचीं असत.

 नगररचना.- या देशांत पुष्कळ तटबंदी नगरें होतीं. तेथें भिंती पक्क्या विटांच्या बांधीत असत. कांहीं भिंती इतक्या रूंद असत कीं त्यांवर झाडांच्या रांगा लावीत. सन १२९५ सालीं राजधानीच्या शहराचा विस्तार सुमारें सात मैल होता. त्याच्या भोंवतीं खंदक खणून व तट बांधून भक्कम बंदोबस्त केलेला होता. त्याला पांच दरवाजे होते, आणि पुलांवरून

एकेका बाजूला ५४ दगडी मूर्ती होत्या. या मूर्ती राक्षसांच्या असून त्यांचा वर्णनकर्त्याच्या दृष्टीनें उद्येश अर्थात शत्रूंना भिवविण्याचा होता.  पूल कमानीवर बांधलेले असून कमानींनां नवतोंडी नागांचा आकार होता. दरवाजांवर बुद्धाचे मोठमोठे दगडी पुतळे होते. त्यांना पांचपांच तोंडें होतीं. ते पश्चिमाभिमुख असून मधला पुतळा सोनेरी होता. दरवाजांच्या आंतल्या बाजूस हत्तींच्या आकृती होत्या. बहुतेक नगरांच्या भोंवतीं तटबंदी असून ती व्यवस्थित बांधलेली होती. रात्रीं दरवाजांनां कुलुपें लावीत असत. शिवाय असा कडक नियम असें कीं कोणाहि संशयित इसमाला नगरांत घ्यावयाचा नाहीं.

देवालयें.- तो चिनी अधिकारी राजवाड्याजवळील टेंकडीवर असलेलें पवित्रस्थान पाहण्यासहि गेला होता. त्या ठिकाणीं २४ दगडी स्तूप असून एक सर्व सोन्याच्या पट्ट्यांनीं आच्छादिलेला असा होता. त्या टेंकडीच्या समोर दोन सोन्याचा मुलामा दिलेले सिंह होते. सिंहाच्या आकृतीवरून बुद्धाच्या शाक्यसिंह या नांवाचा बोध होतो. म्हणून अशोकांने आपण बांधलेल्या स्तूपांवर सिंहांच्या मूर्ती बसविल्या आहेत; व त्यावरूनच त्यांनां सिंहस्तंभ म्हणतात. शिवाय भिक्षूंनां राहण्याकरतां इमारतीं बांधलेल्या होत्या. त्यांच्या पुढें उभारलेल्या बुद्धाचे पुतळे अष्टदेही होते, हें मोठें चमत्कारिक आहे. येथून थोडक्या अन्तरावर तांब्यानें मढवलेला एक उंच स्तूप व भिक्षूंच्या राहण्याच्या इमारती होत्या. त्या चिनी अधिकार्‍यानें नगराच्या दक्षिणदरवाजाच्या जवळ आणि त्याच्या आग्नेयीस अर्ध्या मैलावर असलेलीं कांबोजच्या राजांच्या पवित्र भावनांची साक्ष पटविणारीं अशीं दुसरी स्थळेंहि पाहिलीं. त्या ठिकाणीं बुद्धाच्या मूर्ती तांब्यांच्या होत्या.

राजवाडा.- राजाचा राजवाडा व मोठ्मोठ्या कामगारांची घरें राजधानीच्या पूर्वभागांतील एका विशिष्ट भागांत बांधलेलीं होतीं. खुद्द राजवाडा या भागांतील उत्तरेच्या बाजूला असून तो भाग शहराला एका पुलानें जोडलेला होता. राजवाढयाभोंवतीं असलेला बगीचा सुमारें पाव मैल पसरलेला होता.

राजवाड्याच्या समोर एक स्तंभमय दिवाणखाना होता. तेथील भिंती बुद्धाच्या आयुष्यांतील प्रसंगांचीं चित्रें काढून सुशोभित केल्या होत्या.
प्रधानमंडळीच्या बैठकींकरतां एक मोठा दिवाणखाना होता. राजा राजवाड्याच्या एका टोंकाला असलेल्या एका उंच भागांत निजत असे. राजवाडा पाहण्याची ज्या कांहीं थोड्या लोकांनां सवलत मिळाली होती त्यांनीं दिलेल्या हकिकतीवरून असें दिसतें कीं, राजवाड्यांतील सर्व गोष्टी फारच भव्य व मनोहर असत. तेथें प्रवेश होणें इतर अगदीं परकीयांप्रमाणें त्या चिनी अधिकार्‍यालाहि फार कठिण पडले.
इतर इमारती.- राजेलोकांच्या व सरदारांच्या इमारती इतर खाजगी लोकांच्या मानानें बर्‍याच मोठ्या होत्या, तथापि त्या सर्वांवर गवताचें छप्पर असे. फक्त राजवाड्यावर व देवालयांवर कौलें असत. न्यायाधीश लोक राहत तीं घरें त्यांच्या दर्जाच्या मानानें लहानमोठीं असत. लोकांची घरें त्यांच्या अर्थात् त्यांच्या सांपत्तिक स्थितीप्रमाणें असत. तथापि सरकारी इमारतीइतकीं तीं मोठीं बांधण्याची परवानगी नसे.

राजधानीच्या शहरांसंबंधानें पाहतां ‘लावेक’ नांवाचें शहर सर्वांत जुनें राजधानीचें ठिकाण असावें व प्राचीन इतिहासांत तेंच कांबोजच्या राजाचें वसतिस्थान असावें असें दिसतें. तें देशांतील आंतल्या भागांत असावेसें वाटतें.

पंडितवर्ग.- कांबोज देशांतील लोकांच्या धर्माबद्दल पुढील माहिती मिळते. तेथील पंडित स्वतःस पंकी म्हणवीत. त्यांच्या धर्मतत्त्वांचा मूळ कोणी उत्पादक किंवा नंतर होऊन गेलेला गुरु वगैरे ते लोक कांहींच मानीत नसत. तिकडे विद्यालयें वगैरे कांहीं नसल्यामुळें त्यांच्या तत्त्वांचें यथार्थ ज्ञान होणें फार कठिण होतें. चिनी वृत्तलेखकाला त्यांच्या ग्रंथांचीहि कांहिं माहिती नव्हती. पंकीपंडीतांच्या पोषाखांत सामान्य लोकांच्या पोषाखांपेक्षां फरक इतकाच कीं, त्यांच्या कपाळावर पांढर्‍या पट्ट्या असत. त्यांच्यापैकी जे संसारांत पडत त्यांनांहि पुष्कळ मान असे. ते पांढर्‍या पट्ट्या आपल्या गळ्याभोवतीं घालीत त्या तेथूव कधींहि काढीत नसत. ( हें वर्णन तेथील ब्राह्मणवर्गासंबंधानें तर नसेलना, असा आम्हांस संशय येतो.)

बौद्ध भिक्षु.- गौतमाचे अनुयायी म्हणून जे असत ते श्मश्रु करीत, पिंवळीं वस्त्रें धारण करीत आणि उजवा हात खांद्यापर्यंत उघडा ठेवीत असत. त्यांच्यांत व सामान्य बौद्धलोकांत फक्त या शेवटल्या बाबतींत फरक असे. त्यांच्यांतील हलक्या दर्जाचे लोक नेहमीं अनवाणी असत. त्यांच्या देवळांतून फक्त एक बुद्धाची मूर्ति असून तिला ते फुकाई म्हणत. या मूर्ती तांबड्या व निळ्या रंगाच्या पत्र्याच्या असून त्यांच्यावर तांबडी वस्त्रें घालीत. रतूपावरील बुद्धाच्या मूर्ती ताब्यांच्या होत्या. हे बौद्ध आपणाला चुकु या नांवानें संबोधीत असत. यांजजवळ घंटा, ढोलकीं, झांजा, पताका, किंवा छत्रें हीं कांहींच नसत. समारंभांतील मिरवणुकींच्या वेळीं मात्र मूर्तींच्या वर छत्रें धरण्याचा प्रघात असे. शाक्यसिंहाच्या धर्मानुयायांची हीहि मोठी लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे कीं, त्याच्या देवाप्रीत्यर्थ जीं प्रयोजनें होत त्यांत देखील ते मत्स्य, मांस यांचें भक्षण करीत असत. फक्त मादक पेयें मात्र घेत नसत. ते दररोज आपल्या देवाला हवन करीत असत आणि त्याला लागणारीं द्रव्यें ते धर्मनिष्ठ लोकांपासून मागून आणीत. बुद्धधर्माचा असा कडक नियम आहे कीं भिक्षूनीं भिक्षेवरच उदरनिर्वाह केला पाहिजे. त्यांचे धर्मग्रंथ ताडपत्रावर लिहिलेले असून त्यांतील स्तोत्रें ते पाठ म्हणत असत. हे  ग्रंथ  लिहिण्याला ते शाई किंवा कुंचली वापरीत नसत. ते काय घेत हें या चिनी वृत्तकाराला माहीत नाहीं. बहुशः ते हिंदी शाई व बोरू वापरीत असावे. सामान्यतः ते ताडपत्रावर लेखणीनें कोरून लिहीत, तिला ओल्ला म्हणत. बौद्ध धर्मगुरू पालखींत बसून जात व ताडपत्रांच्या छत्र्या वापरीत. या चालीमुळें त्यांनां तलपत्रिन् असें म्हणत असत. बौद्धांनां किंवा बौद्धभिक्षूंनां म्हणा राजा फार मान देत असे व महत्त्वाच्या कामांत तो त्यांची सल्लामसलत घेई.

पास्सेपंथ.- तिसरा पंथ पास्से नांवाचा होता. त्या लोकांचा पोषाख इतरांसारखाच असे. पण फरक इतकाच कीं ते डोक्याला तांबडा किंवा पांढरा पट्टा गुंडाळीत. ते बहुतेक बौद्ध लोकांपैकींच असावेत; कारण त्यांचेहि मठ, देवालयें व स्तूप असत. तथापि बौद्ध लोकांच्या मानानें यांच्या इमारती मुळींच भपकेदार नसत. कांबोजमध्यें बौद्धधर्मांचे लोकच इतरांच्या मानानें पुष्कळ अधिक असत. पास्सेलोक स्वतः इतरांपासून फार अलिप्‍त राहत असत. परकीयांबरोबर ते भोजन करीत नसत. तद्देशीयांनांहि ते जेवण्याच्या वेळीं आपणांकडे  पाहूं देत नसत. ते स्वतः मादक पेयें कधींहि घेत नसत. ते आपल्या मुलांनां बौद्ध लोकांच्या शाळांतून पाठवीत असत यावरून ते बौद्धांपैकी असावे असें म्हणण्यास बळकटी येते. त्यांच्या धर्मग्रंथाविषयीं किंवा धार्मिक चालीरीतींविषयीं चिनी प्रवाशाला कांहींच माहिती मिळाल्याचें दिसत नाहीं.

तराकपंथ.- बौद्ध व पास्से यांच्याशिवाय कांबोजमध्यें ९ व्या शतकाच्या आरंभीं लान सू तत्त्वाच्या अनुयायांचा एक पंथ होता. त्यांना तलाक असेंहि म्हणतात, कारण बुद्धीला ते सर्वश्रेष्ठ तत्त्व मानीत. ते प्रेतयात्रेच्या वेळीं गायनवादन करीत असत, व प्रेतें चितेवर जाळीत असत. चिता चांगल्या सुगंधी लांकडांची करीत. राख राहील ती सोन्याच्या किंवा रुप्याच्या भांड्यांत ठेवीत असत.  गरीब लोक मडक्यांत ठेवीत; व नंतर ती नदींत टाकून देत. कित्येक वेळीं प्रेतें न जाळतां तीं डोंगरसपाटीवर टाकून देत व क्रूर श्वापदांकडून खाववीत असत. यांपैकीं पहिल्या प्रकारचें चिनी लोकांतील अन्येष्टीच्या विधीशीं म्हणजे ताओत्सेच्या जन्मदेशांतील पद्धतीशीं पूर्ण ऐक्य आहे. दुसरी पद्धत नैसर्गिक पद्धत आहे. ही इतरत्र फक्त इराणी वंशाच्या लोकांत आढळते. त्यांतले पार्शीं लोक व मग भिक्षुक प्रेतें पक्षांकडून व कुत्र्यांकडून खाववितात. बॅक्ट्रियन लोक, ओरिसांतील लोक व सिंधुनदीच्या पश्चिम तीरावरील लोक यांच्यांतहि अशीच चाल होती. बुद्धपूर्वकालीन पंथांतील एक अवशिष्ट चाल कांबोजमध्यें अद्यापहि प्रचारांत आहे. ती अशी कीं, उन्हाळ्याचे दिवसांत वाहणार्‍या रोगजनक वार्‍यांपासून देशावर व तेथील रहिवाश्यांवर कांहीं संकट येऊं नये म्हणून शहरांच्या पश्चिम दरवाज्यांसमोर ते लोक बैल व पांढरीं मेंढरें यांचा बळी देत असतात.

राज्यव्यवस्था.- कांबोजमधील राज्यव्यवस्थेसंबंधीं आपणांस जी सामान्य माहिती आहे तीवरून त्या बाबतींत आपणास खरोखर फारच थोडा बोध होतो. त्या देशांत प्रधान, सेनापती, ज्योतिषी व इतर सामान्य लोक असत; परंतु ज्ञानाच्या दृष्टीनें सगळे बहुतेक सारख्याच योग्यतेचे असत. शिवाय न्यायाधीश नेमलेले असत ते बहुधा राजघराण्यांतील पुरुष असत; व जेव्हां पुरुषांचा तोटा पडे तेव्हां स्त्रीन्यायाधीशहि नेमीत असत, असें ही हकीकत देणारे जे चिनी कामागार त्यांनीं लिहून ठेविलेलें आहे.

मानमरातब.- हे जे राज्यांतील कामगार सांगितले त्यांचे मानमरातब व पगार त्यांच्या दर्जाप्रमाणे ठरविलेले असत. सर्वांत श्रेष्ठ असत त्यांनां पालखीचा मान असे व सोनेरी पोषाख केलेले भोई. पालखी उचलण्यास असत. पहिल्या दोन दर्जांच्या अधिकार्‍यांनांच काय तो पालखीचा मान असे. यांजवर चार छत्रें धरीत असत. हीं छत्रें तांबड्या चिनी ताफत्याचीं केलेलीं असून त्यांच्या पट्ट्या जमिनीपर्यंत लोंबत असत; व त्यांचे दांडे सोनेरी असत. दुय्यम दर्जाच्या कामगारांनां तीन छत्रें, त्यांच्या खालच्यांनां दोन आणि चवथ्या दर्जाच्या लोकांनां एक छत्र असे. पांचव्या दर्जाच्या अधिकार्‍यांच्या छत्रांनां सोनेरी दांडे नसत.  खालच्या दर्जाच्या अधिका-याच्या छत्रांनां रूपेरी दांडे असत.  याप्रमाणें छत्रांच्या प्रकारांवरून अधिकार्‍यांचा दर्जा दर्शविण्याची पद्धत ही कांबोजी लोकांतच विशेष दिसते. हिंदुस्थानांतील या भागांतल्या राजघराण्यांतील पुरुषांवर छत्रें धरण्याचा हा मानाचा प्रकार आहे हें महशूर आहेच. सिंधूपलीकडील वायव्य प्रदेशांत बौद्ध भिक्षूंनां छत्रांचा मान होता व त्यावरून त्यांनां तलपतिन् असें  उपपद लावीत असत. याचप्रमाणें कांबोजी लोकांत अधिकारीवर्गाच्या विशिष्ट मानपान व चिन्हांवरून त्यांचा अधिकार दर्शित होतो हें लक्षांत घेण्यासारखें आहे.
कांबोजच्या उष्ण प्रदेशांत छत्रें वापरण्याचा हा अधिकार विशेष फायद्याचा गणला जात असला पाहिजे. चिनी लोकांत सुंदर व मनोहर भूषणांची फार आवड आहे, त्यामुळें त्यांच्यांतील अधिकार्‍यांचा दर्जा ठरविण्याकरतां निरनिराळे रंगीत खडे शिरोभूषणांतील कळसांत बसविण्याची पद्धत आहे. युद्धप्रिय तुर्क लोकांत घोडदळ हें लढाईंतील मुख्य साधन असल्यामुळें घोड्यांचें त्यांनां अत्यंत महत्व वाटत असे; आणि या कारणामुळेंच त्यांच्यातील पाशांचा दर्जा निशाणावरील ३,२ किंवा १ अशा घोड्यांच्या शेपटांवरून निश्चित करीत असत.

कांबोज देशांत सर्वांत श्रेष्ठ मान राजाला असे. तो सार्वजनिक रीत्या लोकांच्या दृष्टीस क्वचितच पडे. तो बाहेर पडे तेव्हां त्याच्या बरोबर लवाजमा पुष्कळच असे. त्याच्या पुढें प्रथम घोडेस्वारांची एक तुकडी निशाणें व नौबती घेऊन चाललेली असे. तिच्या मागून राजवाड्यांतील सुमारें तीनशें स्त्रिया रंगीबेरंगी पोषाख करून व हातांत दिवसाहि जळत्या मेणबत्त्या धरून चालत. याच स्त्रिया राजवाड्यांतहि तैनातीला असत व त्यांनां भाले व ढाली देत असत. नंतर राजपुत्र, प्रधान व वरिष्ठ अधिकारी हत्तीवर बसून जात. त्यांच्यावर तांबडीं छत्रें धरीत. त्यांच्यामागून राणीसरकार व बरोबर राजेसाहेबांच्या उरस्त्रियांचा व इतरांचा मोठा घोळका, कोणी पालख्यांतून, कोणी गाड्यांतून, कोँणी हत्तीवरून असा चाललेला असे. त्यांच्यामागें राजेसाहेबांची स्वारी हत्तीवर बसून व एका हातातं मोठ्या किंमतीचा खंजीर घेऊन चाललेली असे. हत्तीच्या अंगावर मुलामा दिलेल्या झुली असत. राजाच्या भोंवतीं वीस छत्रें धरीत, त्यांचे दांडे चांगले सोन्यानें मढविलेले असत. राजाच्या पाठीमागून बरेच हत्तीस्वार व घोडेस्वार राजाच्या रक्षणार्थ म्हणून चालत. तसेच राजाच्या पुढें बुद्धाच्या सोनाच्या मूर्ती बसविलेले कित्येक लहान स्तूप घेऊन चालण्याचा नियम असे. याप्रमाणें चाललेली ही राजाची स्वारी पाहण्यास जे लोक येत ते राजापुढें गुढघे टेंकून जमिनीला डोकें लावीत. याप्रमाणें जे लोक न करतील त्यांनां गुलामांकडून कैद करण्यांत येत असे.

राजा व कामकाज.- कांबोजचा राजा दिवसांतून दोन वेळां कामकाज पहात असे. ज्या लोकांनां खुद्द राजापुढें आपलें म्हणणें मांडावयाचें असेल त्यांनां एका दिवाणखान्यांत  बसवीत असत. तेथें राजवाड्यांतून गाण्याचा व वाद्यांचा आवाज ऐकूं येऊं लागेपर्यंत त्यांनां वाट पहात बसावें लागे. तो आवाज सुरू झाला कीं राजा आला असें समजावें. स्वतः राजा पडदे लावलेल्या अशा एका खिडकीशीं येत असे; नंतर स्त्रिया ते पडदे दूर सारीत, व राजा हातांत सोन्याचा खंजीर घेऊन तेथें बसे. राज्यांतील बडे लोक व प्रधान हात जोडून जमिनीला डोकें लावीत. शंखाचा होत असलेला ध्वनि बंद पडला कीं, ते बडे लोक व प्रधान उठून उभे राहत व पुन्हां खालीं बसत. ते सिंहाच्या कातड्यावर बसत. ( ती कांतडीं तेथें फार दुर्मिळ असत.) कामकाज आटोपलें कीं पुन्हां त्या दोन स्त्रिया पडदा समोर सारीत व राजा व इतर हजर असलेली मंडळी निघून  जात.
दरबारच्या बैठकींनां राजा येत असे तेव्हां डोक्यावर रत्‍नजडित मुकुट घालीत असे. कानांत सोन्याच्या बाळ्या असत; व पोषाख सर्व शुभ्रवस्त्रांचा असे. त्याच्या पट्ट्याला लांबलांब गोंडे बसवलेले असत ते जमिनीपर्यंत लोंबत; आणि त्याचे जोडे निरनिराळ्या रंगाच्या गवताचे असत. त्याच्या प्रधानांनां तीन वेळां सिंहासनापुढें गुडघे टेंकावे लागत. नंतर सिंहासनाच्या पायर्‍या चढून वर येण्यास त्यांनां राजा हुकूम करी; वर आल्यावर पुन्हां ते गुडघे टेंकीत; व नंतर उभे राहून आपआपल्या जाग्यावर जाऊन बसत. याप्रमाणें पूर्वविधि आटोपल्यानंतर दरबारच्या कामास सुरवात होई. पुन्हां तें काम खलास झाल्यावर प्रधान पुर्ववत् गुडघे टेकून नंतर राजाची परवानगी घेऊन निघून जात.

फौज.- कांबोजांत सुमारें ७०० वर्षां पूर्वीं चालू असलेली राज्यकारभाराची पद्धत व कायदेकानू यांबद्दल आपणांस ही मिळालेली माहिती फारशी महत्त्वाची नाहीं. तथापि तीवरून तत्कालीन परिस्थितीची साधारण कल्पना येईल. तेथील सैन्यांत मुख्य घोडेस्वार असून त्यांच्या जवळ मोठाले भाले व ढाली असत. घोडदळाशिवाय युद्धांत हत्तीहि असत व पायदळहि असे यांत शंका नाहीं. पण ही गोष्ट चिनी लेखकानें दिलेली नाहीं. सयामी लोकांबरोबर झालेल्या लढाईंत सर्व लोकांनां शस्त्र धारण करून रणांगणावर जावें लागलें होतें. धनुष्यबाणांचा उपयोग करण्याचें त्यांनां माहीत नव्हतें. कांबोजी लोक युद्धविषयक बाबतींत फारसे निष्णात नव्हते.

राज्याची विभागणी वगैरे.- सर्व राज्याचे एकंदल एकवीस प्रांत पाडलेले होते व त्यांवर अधिकार चालविणारे राजाचे अधिकारी नेमलेले असत. प्रत्येक नगरांत दुय्यम दर्जाचा अधिकारी असे. प्रत्येक खेड्यांत एकेक पवित्र वस्तु असून तिची नेहमीं काळजी घेण्याचें काम कोणावर तरी सोंपविलेलें असे. खेड्यांतील प्रमुखांनां माइत सीई म्हणत. मोठ्यामोठ्या रस्त्यांवर प्रवशांकरितां विश्रांतिस्थळें बांधलेलीं असत, व अन्तराअन्तरावर डाकखाने असत. हीं डाकघरें सर्व लोकांच्या सोयीकरतां असत कीं फक्त सरकारी कामापुरतीं असत हें सांगता येत नाहीं. कसेंहि असलें तरी कांबोजच्या राजांनीं हीं चीनच्या उदाहरणावरून घेतलेलीं होतीं असें दिसतें.

न्याय.- या देशांत अंमलांत असलेल्या गुन्हेगारीच्या कायद्यांपैकीं कांहीं फार कडक असल्यामुळें ते फार अनिष्ट वाटतात. ज्या कोँणावर राजाची गैरमर्जी होईल त्यांनां कैदेंत टाकणें किंवा फांशीं देणें असल्या शिक्षाहि न करतां त्यांनां नगराच्या पश्चिम दरवाजासमोरच्या भिंतींत चिणून मारीत असत ! इतर कित्येक गुन्हेगारांनां हात, पाय किंवा नाक छाटून टाकण्याची शिक्षा होत असे. फटके मारण्याची शिक्षा त्या देशांत बरीच मागाहून सुरू करण्यांत आली. दुसरा चमत्कार असा कीं, जारिणी व तिचे दोस्त जार यांनां सरकारी रीत्या कांहींच शिक्षा होत नसे. असल्या जारांच्या वित्ताचें हरण करणें हा त्या जारिणींच्या नवर्‍यास एक मार्ग असे. पाजी लोकांनां व ठकबाजांनां अपवाद म्हणून फांशीची शिक्षा देत-म्हणजे शहराच्या दरवाज्यासमोर त्यांनां सुळावर चढवीत आणि एका बाजूला ओढून फेंकून देत. एकंदरींत फिर्यादी कामकाज फार क्वचित उपस्थित होत असे; आणि कुटुंबाकुटुंबांतील गोष्टींबद्दल जेव्हां फिर्यादी लागत तेव्हां त्यांचा निकाल पुढें दिलेल्या चमत्कारिक पद्धतीनें लागत असे. दोन्ही कुटुंबें लहान शिखरांचा राजवाडा या नांवाच्या राजवाड्यांत जात व तेथील एका लहान शिखरभागांतील लहानशा दिवाणखान्यांत तीं सर्व माणसें बसत; व त्यांच्यामध्येंच वकील बसत असत. त्या ठिकाणीं त्यांनां एक दोन तीन किंवा चार दिवससुद्धां तसेंच बसून रहावें लागे. अशा स्थितींत असतां जो कोणी खरा अपराधी असेल तोच आजारी पडून त्याला तेथून परत जाणें भाग पडेल अशी दृढ समजूत असे. उलट ज्या कोणाचा सत्पक्ष असेल त्यास मुळींच कसलेंहि दुखणें यावयाचें नाहीं. या न्यायनिर्णय-पद्धतीला परमेश्वरी न्याय असे म्हणत असत. यूरोपीय मध्ययुगांत यूरोपमध्येंहि असली परमेश्वरी न्यायपद्धति अमलांत असे. ह्या दिलेल्या वृत्तांताबद्दल शंका घेण्याचें बिलकुल कारण नाहीं. यांत असें दिसतें कीं, आजारी पडल्यामुळें नसलें तरी अपराध्याचें मन त्याला खाऊं लागल्यामुळें मात्र तो त्या ठिकाणाहून निघून जात असावा.

कांबोजांतील इतर गोष्टींबद्दल चिनी अधिकार्‍यानें पुढील प्रमाणें माहिती दिलेली आहे.

चालीरीती.- या अधिकार्‍याच्या मतें येथील रहिवाशांचा वर्ण फारच काळा असून त्यांच्या चालीरीतींवरून पाहतां ते अगदीं रानटी होते व चिनीलोकांच्या व त्यांच्या चालीरीतींत फार फरक होता. वास्तविक पाहतां विशिष्ट आयुष्यक्रमामुळें ज्यांनां सारखें उन्हांत राहूनच काम करावें लागे अशा लोकांचा मात्र अगदीं काळा वर्ण असे. उलट उच्च घराण्यांतील स्त्रिया चांगल्या सुंदर असत. त्यांचा पोषाखहि अत्यंत साधा असे. बहुतेक स्त्रीपुरूष कमरेभोंवतीं फक्त एक वस्त्र गुंडाळीत; पोट व पाय उघडेच असत. राजांच्या राण्या सुद्धां पायांत कांहीं घालीत नसत. या पोषाखाच्या बाबतींत कांबोजी लोक कोचिन-चीन आणि सयाममधील लोकांपेक्षां फारच मागसलेले दिसतात;  कारण त्यांचा पोषाख अगदीं भरपूर असतो. स्त्रीपुरुष सर्वच अंगाला चांगलीं सुवासिक तेलें लावीत; तीं तेलें चंदन, कस्तुरी इत्यादि पदार्थांची केलेलीं असत. स्त्रिया व पुरुष दोघांच्याहि कानांत बाळ्या असत. सर्व कुटुंबांत बुद्धावर भक्ति फार असे;  परंतु त्या बुद्धसंप्रदायांतीलच कित्येक लोक अत्यंत दुराचरणी असत व राजरोस वाईट व्यवहार करीत. बायकांची बाळंतपणांत चांगली शुश्रूषा होत असे.

बायकांमध्यें अनीतीचें आचरण फार  असे, असें त्या चिनी अधिकार्‍याचें मत होतें. कारण ज्या नवर्‍यांनां त्यांच्या बायका आवडत नसत त्यांनां ते बेधडक टाकून देत असत. विवाहित मनुष्य गांवाला गेला कीं लागलीच त्याची बायको दुसरा  प्रेमसंबंध जोडण्याच्या मार्गास लागे. कांबोजमधील मुलींचीं हिंदुस्थानांतल्याप्रमाणेंच लहान वयांत लग्नें होत असत. श्रीमंतांच्या मुलींचीं ७ ते ९ वर्षांच्या दरम्यान लग्नें होत; आणि गरिबांच्या मुलींचीं जरा उशींरां म्हणजे ११ व्या वर्षाच्या सुमारास होत. नीतिभ्रष्टतेचें वरच्याखेरीज दुसरें एक मोठें निदर्शक म्हटलें म्हणजे असें कीं, बुद्धाच्या किंवा तावसी पंथाच्या भिक्षूंनां कुमारिकांचा प्रथोमपभोग घेण्याचा अधिकार मिळे, आणि त्या कृत्याकरितां नेमलेला दिवस अधिकार्‍याकडून जाहीर करण्यांत येत असे. या कामावर नेमणूक झालेल्या भिक्षूंचा कुमारिकांच्या आईबापांकडून चांगला सत्कार होत असे आणि त्यांनां चांगल्या चांगल्या देणग्याहि मिळत असत. गरीब आईबापांनां तर असल्या देणग्या देण्याची ऐपत येण्यास कित्येक वर्षें काटकसर करून संचय करीपर्यंत वाट पहावी लागे. हें कृत्य त्या लोकांत मोठें पवित्र मानीत असत. ज्या देशांत स्त्रियांच्या विवाहपूर्व ब्रह्मचर्याला इतपतच महत्त्व असे, त्या देशांत अनीतीच्या आचरणाबद्दल गवगवा असलेल्या स्त्रियांनांहि वरण्यास पुरुष तयार असून असे विवाह होत असत, या गोष्टीबद्दल कोणाला मोठेंसें आश्चर्य वाटण्याचें कारण नाहीं.

एकदां विवाहाचा दिवस नक्की झाला कीं वराकडून वधूकडे पोषाख पाठविण्यांत येई. नंतर वधूला वराच्या घरीं नेत; व तेथें वरवधूपक्षाकडील मंडळी ८ दिवस समारंभसुखोपभोगांत घालवीत. रात्रंदिवस दिवे जळत असत. याप्रमाणें समारंभ पुरा झाला म्हणजे नूतनविवाहित इसमाला त्याच्या बापाच्या संपत्तींतून हिस्सा मिळून तो आपला निराळा संसार थाटीक असे. एखाद्या इसमाचे आईबाप वारले कीं सर्व संपत्ति त्याला मिळत असे. पण कोणीच वारस नसले तर अर्थात् सर्व मालमत्ता सरकारजमा होत असे.

कांबोजच्या चालीरीतींविषयीं वर दिलेल्या माहितीवरून पाहतां, त्यांची नीतिमत्ता अगदीं निकृष्टावस्थेस पोंचलेली दिसून येते. आपल्या प्रजेला वाईट वळण घालून दिल्याबद्दल तेथील राज्यकर्त्यांच्या माथीं बरेचसें दूषण येतें. खुद्द राणी व चार वेश्या यांखेरीज राजाजवळ तीन हजारांपेक्षां जास्त स्त्रीपरिचारिका असत व त्यांनां वेगवेगळाले दर्जे दिलेले असत. त्यांनां राजवाडा सोडून जाण्याला परवानगी नसे. कधीं कधीं राजा आपली राणी व इतर पत्न्या यांच्या समवेत राजवाड्याच्या खिडकीशीं उभा राही व त्याला पाहण्याकरितां आणलेल्या नागरिकांच्या बायका न्याहाळी. त्याच्याकडे आणलेल्या बायका सुंदर असत व त्यांतून तो कांहीं राजवाड्यांत कामावर नेमी;  व बाकीच्यांनां काढून लावी. अशा बायकांची संख्या अनेक हजार असे, असें एके ठिकाणीं लिहिलेलें सांपडतें.
राहणी व कलाकौशल्य यांविषयीं म्हणाल तर, तीं हीन अवस्थेंत होतीं. उच्च कुलांतील व धनिक लोकांची गोष्ट सोडून देऊन साध्या लोकांची स्थिती घेतल्यास ते लोक हातानें भात जेवीत व जमिनींत खड्डा खणून त्याचा चुलीप्रमाणें उपयोग करीत असत. ते चटयांवर किंवा कातड्यांवर झोंप घेत. बुद्धाच्या पूजेकरितांच फक्त सोन्याचांदीच्या भांड्यांचा उपयोग करीत. चिनी लोकांशीं त्यांचा संपर्क आल्याकारणानें त्यांनां गृहोपयोगी लांकडी सामानसुमान व भांडीं यांची तरी माहिती झाली. त्यांचें कृषिकर्म  फारच साधें असे; कारण ते जनावरें, नांगर व इतर कृषिकर्मसाधनांचा उपयोग करीत नसत. सोनखत अपवित्र मानीत असल्यामुळें, तें उपयोगांत आणीत नसत; व तेथले चिनी रहिवाशी त्याचा उपयोग करून घेत म्हणून त्यांचा तिरस्कार करीत. वरील साधनांची त्या लोकांनां जरुरी देखील नसे, कारण त्यांच्या देशाचा सुपीकपणा आणि उन्हाळा व पावसाळा यांच्या नियमित आवृत्ती त्यांचा शेतकामाचा बोजा बराचसा हलका करीत. चिनी लोकांशीं त्यांचा वारंवार संबंध येत असे तरी, तुतीची लागवड करण्याचा आणि रेशमाचे किडे बाळगून रेशीम कढण्याचाहि त्यांनीं कोठें प्रयत्‍न केलेला दिसत नाहीं. कांबोजी लोक चलाख, उत्साही, प्रामाणिक व धार्मिक असत, पण अतिथ्यसत्काराच्या कामांत त्यांचा हात आंखडता असे. पाहुणा घरीं आला असतां, त्यास विडा, सुपारी  व मधुर सुवासिक द्रव्यें अर्पण करीत व येथेंच त्यांच्या अतिथ्यसत्काराची समाप्ति होई.

ते उजवा हात शुद्ध व डावा हात अशुद्ध मानीत; व म्हणून ते पवित्र कृत्यें उजव्या हातानें करीत. सकाळीं उठल्यावर पहिल्यानें ते स्नान करीत व नंतर एका झाडाच्या फांदीनें दांत घांशीत व पुन्हां स्नान करीत. जेवणापूर्वीं ते स्तोत्रग्रंथांतून स्तोत्रें म्हणत  व नंतर ठराविक पद्धतीनें पुन्हां दांत घांशीत. त्यांच्या खाण्यांत दूध, पिठी साखर, तांदूळ, मिटेल धान्य  व निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या येत.
या देशांतील रहिवाश्यांनां पुष्कळसे रोग, विशेषतः संग्रहणी व कोड, पछाडीत. या रोगांची जीं कारणें देण्यांत येतात, त्यांत प्रमुख म्हणजे सर्द हवा व निषकाळजीपणानें नित्य स्नान करण्याची फाजील पद्धत हीं होत. याखेरीज अनिष्ट गोष्ट म्हणजे, त्या ठिकाणीं चांगले हुषार वैद्य नसत व म्हणूनच रोग बरे करण्याकरितां मांत्रिक व नापिक यांची योजना होई.

गुलाम.- पूर्वेकडील इतर उपभारतीय देशांतल्याप्रमाणेंच कांबोजमध्येंहि जातिभेद फारसा नाहीं; कारण या देशांतून आपले कायदे लोकांवर चालविण्याइतके ब्राह्मण सत्ताधीश झाले नाहींत. परंतु येथें दर्‍याखोर्‍यांतून राहणार्‍या रानटी जातींतले गुलाम आढळून येतात. चिनी अधिकार्‍यांनां अगदीं गरीब लोकांच्याच घरांतून कायते हे गुलाम आढळून आले नाहींत. हे गुलाम इतके भित्रे होते कीं, जर ते शहरांत गेले तर घरांत शिरण्यास किंवा घरांतून बाहेर पडण्यास धजावत नसत. यांचा इतका बेसुमार तिरस्कार होई कीं, “थंग” म्हणजे कुत्रा, या अपमानास्पद नांवानें त्यांनां संबोधिलें जाई. या जातींतील धडधाकट तरुणांनां मात्र कांहीं किंमत असे पण त्यांनां त्यांच्या धन्यांकडून फार कडक व वाईट रीतीनें वागविलें जाई. धन्यापुढें गुडघे टेंकावे लागत. कांहीं गुन्ह्याबद्दल जेव्हां त्यांनां फटके मारण्यांत येत, तेव्हां त्यांचा ते कधीं प्रतिकार करीत नसत.

हे गुलाम आपआपसांतच लग्नें करीत. त्यांचे धनी गुलाम स्त्रीशीं संबंध ठेवण्याचें टाळीत; तसें करणारास इतर नागरिक आपल्या पंक्तीला घेत नसत. हे गुलाम पळून जात; पण पुन्हां सांपडल्यास त्यांच्या तोंडाला निळा डाग लावीत, किंवा त्यांच्या गळ्यांत किंवा दंडाला एक वळें बांधीत. कांहींच्या दंडांनां दोन दोन वळीं बांधलेलीं असत. हे बहुधा दोन वेळां पळून गेलेले असावेत.
लिपी व भाषा.- कांबोजी लोकांसारख्या अल्प संस्कृतीच्या लोकांनां शास्त्रांचा व्यासंग असणें जवळ जवळ अशक्य आहे. त्यांचें ग्रंथलेखन व सार्वजनिक लिखाण ताडपत्रांवर होत नसून हिरण आणि काळवीट यांच्या कातड्यांवर होत असे. या कातड्यांनां काळा रंग देऊन, त्यांचे लहान मोठे लागतील तसे तुकडे कापीत. लिहिण्याकरितां चिनी लोकांप्रमाणें शाई वापरीत, ती अर्थातच काळी नसली पाहिजे हें उघड आहे; व लिहिण्यास ज्या लहान काटक्या वापरीत त्या काम झाल्यावर चिनी लोकांप्रमाणें कानावर खोंचून ठेवीत. त्यांची वर्णमाला फार स्पष्ट व सुबोध असे. कांबोजी लिपी व सिरियन जातीची “होएइ-हु” किंवा “उइगुरेस” ही लिपी, या दोन्ही जवळ जवळ आहेत असें चिनी बखरकार म्हणतो व हें विधान चुकीचें आहे असें लासेन म्हणतो. स्वर लिहीत नसत हें बखरकाराचें विधान, सर्व भारतीय वर्णमालांतून व्यंजनांच्या खालींवर स्वर लिहिण्याची चाल आहे हें सांगितल्यानें स्पष्ट होतें. कांबोजी लोक वरून खालीं लिहीत नसत, तर डावीकडून उजवीकडे लिहीत जात असेंहि त्या चिनी गृहस्थानें लिहिलें आहे. चिनी मनुष्याखेरीज दुसर्‍या कोणास यांत विशेषपणा वाटणार ?

चिनी अधिकार्‍यांच्या संशोधनावरून पाहतां, ही भाषा विचित्र असून, कोचिन-चिनी व सयामी भाषांपेक्षां  निराळी आहे. यांत अपभ्रष्ट पाली शब्द आहेत व हीस ख्मेर असें नांव आहे. या भाषेंत बरींच व्यंजनें व र् हें व्यंजन असणारे शब्द आहेत. शिवाय हेंहि दिसतें कीं, प्राचीन काळीं कांबोजी लोकांत नाणीं नव्हतीं, व १३ व्या शतकांत ते सयामी आणि कोचिन चिनी नाणीं वापरीत; हीं नाणीं म्हणजे चांदीच्या टिकल्या व कांड्या होत.

ज्योतिष.- कांबोजी लोकांनां अवगत असलेलें एक शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र; पण त्यांतहि त्यांची फार प्रगति नसे. त्यांनां फक्त चंद्रसूर्यग्रहणांचें भविष्य करितां येई. त्यांनीं वर्षाचे १२ महिने, ७ दिवसांचा एक आठवडा, ४ आठवड्यांचा एक महिना व रात्रीचे चार प्रहर असे कालाचे भाग केले होते. वर्षाचे भाग पाडण्याची रीत कांबोजी लोकांनीं भारतीय लोकांपासून घेतली असली पाहिजे. कारण चिनी लोकांत जरी ही रीत आहे, तरी पण दिवसाचे आठ भाग (प्रहर) व महिन्याचे चार आठवडे मोजण्याची रीत मूळ भारतीयांचीच आहे. वरील काल विभागांखेरीज, कांबोजी लोकांत बारा वर्षांचीं चक्रें आहेत. त्यांतील निरनिराळ्या वर्षांचीं नांवें चिनी नांवापेक्षां भिन्न आहेत, कारण या दोन भाषांत बराच फरक आहे.

कांबोजांत जसें १२ वर्षांचे वर्षचक्र आहे, तसें वर्षचक्र भारतांत फार पुरातन काळीं प्रचलित असल्याचें आढळून येतें. यावरून कांबोजांतील द्वादशवर्षचक्र भारतांतूनच आलें असें मानण्यास जागा आहे. कांबोजी वर्षांत दोन दिवस विशेष शुभ, चार विशेष अशुभ व तीन शुभाशुभरहित ( ?) असे मानीत. कांबोजी लोकांत कांहीं वर्ग खेरीज करून फलज्योतिषावर सर्वांचा विश्वास होता. अमुक दिवशीं पूर्वेकडे गमन करूं नये, अमुक दिवशीं पश्चिमेकडे जाऊं नये अशा समजुती कांबोजी लोकांत असत. कांबोजी स्त्रिया या शुभाशुभदिवसांचें गणित करण्यांत कुशल असत. कांबोजी वर्ष चिनी वर्षाप्रमाणें दहाव्या महिन्यांत सुरू होत नसे तर दुसर्‍या महिन्यांत त्याचा प्रारंभ होई. चिनी लोकांचें वर्ष कुंभराशीचे अर्ध्यावर सूर्य आल्यावर सुरू होई, तर इकडे कांबोजी लोकांचें वर्ष भारतीयांप्रमाणें मार्च महिन्याचे मध्याचे सुमारास सुरू होत असे.

उत्सव.- प्रत्येक वर्षींचे पाडव्याचे दिवशीं कांबोजचा राजा मोठा उत्सव करीत असे. राजाचे राजवाड्यासमोर एक उच्चासन तयार करीत व या उच्चासनाभोंवतीं गोल रंगीबेरंगी दिवे लावीत. या आसनासमोर एक स्तूप उभा करीत. या स्तूपाजवळ एक २०० फूट उंचीची काठी उभी करीत. या काठीवर २, ४, अथवा ६ दिवे टांगीत. हा उत्सव एक पंधरवडाभर चाले. या उत्सावासाठीं राजाकडून राज्यांतील सर्व बड्या लोकांनां निमंत्रण जाई. या पाहुण्यांनां पुष्कळ सुपार्‍या वांटीत असत. सांयकाळीं लोकांनां राजदर्शन व्हावें यासाठीं राजा बाहेर निघत असे व या वेळीं नानातर्‍हेचें दारुकाम उडवीत.
कांबोजमध्यें दुसरे जे कित्येक उत्सव करीत त्यांपेकीं एकाचें वर्णन येथें दिल्यास पुरें होईल. हा उत्सव म्हणजे बुद्धाचा जलसंस्कारोत्सव होय. हा पांचव्या महिन्यांत करीत असत. राज्यांत सर्वत्र बुद्ध देवाच्या मूर्तींना या उत्सवाच्या प्रसंगीं स्नान घालीत. भिक्षुलोकहि या प्रसंगी स्नान करीत. लांबलांबचे लोक जलमार्गानें व स्थलमार्गानें या उत्सवासाठीं येत. राजधानीचे ठिकाणीं हा उत्सव पाहण्यासाठीं राजाकरितां मुद्दाम उच्चासनयुक्त मंदिर तयार करीत.


व्यापार.- कांबोजच्या इतिहासाकडे वळण्यापूर्वीं तेथील व्यापाराच्या स्थितीसंबंधानें दोन शब्द सांगणें इष्ट आहे. पोर्तुगीज आले नव्हते त्या काळीं पूर्वेकडील उपभारतीय देशांत व त्यांनां लागून असलेल्या भागांत चिनी लोकच बहुधा व्यापारांत अग्रेसर असत. हे लोक कांबोजमधून पुष्कळ माल नेत. कोचिन-चिनी लोक तसेच सयामी लोक हेहि कांबोजशीं व्यापार करीत होते. याशिवाय दुसरीं पूर्वेकडील उपभारतीय राष्ट्रेंहि या देशाशीं व्यापार करीत असावीं असें मानण्यास जागा आहे. अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख मात्र कोठें सांपडत नाहीं. या व्यापारांत कांबोजचे लोकहि भाग घेत असावे असें दिसतें, कारण या लोकांनां मोठामोठालीं जहाजें बांधतां येत होतीं ही गोष्ट सिद्ध झालेली आहे.

इतिहास.- कांबोजचा अगदीं प्राचीन इतिहास आपणांस उपलब्ध नाहीं. या इतिहासाचा भाग म्हणून कांहीं कल्पनाकथा परंपरेनें चालत आलेल्या आहेत. सयामी लोकांत जी कविता प्रसिद्ध आहे तींत कांबोजांत जन्मलेल्या प्रियक्रेक नांवाच्या राजाचें वर्णन पुष्कळच आलेलें आहे. यावरून या राजानें उत्तर सयाम व लाओ प्रांत यांत पुष्कळ शौर्याचीं कामें केलीं असलीं पाहिजेत, व या शूर कृत्यांचा काळ इ. स. चें पहिलें शतक हा असला पाहिजे असें दिसतें. उलटपक्षीं जर सयामचा नागर शक (Citizen Era) या राजानें सुरू केला ही कथा खरी असेल तर, हा राजा इ. स. ६३८ चे सुमारास होऊन गेला असला पाहिजे असें त्यावरून सिद्ध होईल. परंतु या राजाविषयींच्या कथा फारशा विश्वासार्ह नसल्यानें त्यांच्यावरून एवढेंच अनुमान काढणें युक्त होईल कीं, सयाममध्यें फार प्राचीन काळीं कांबोजचें वजन असे; व या वजनानें सयामच्या स्थितींत बरावाईट फेरबदल होऊं शके. हें अनुमान खरें असलें पाहिजे. यास पुरावा म्हणून ही गोष्ट सांगतां येईल कीं, शाक्यसिंहचा संप्रदाय उपभारतीय पूर्वप्रदेशाच्या या (कांबोज) भागांत प्रथम प्रसृत झाला व नंतर तो इतर भागांत पसरला. तशीच दुसरी गोष्ट ही कीं, कांबोज देश हा इतर उपभारतीय पूर्वदेशांच्या अगोदर श्रेष्ठ संस्कृतीचा उपभोग घेत होता. ही स्थिति पुढें राहिली नाहीं. पुढें कांबोज देश हा फुनम अथवा सयाम या देशाचा ताबेदार झाला.

चिनी बखरी.- चिनी इतिहासकारांनीं कांबोज देशाची वर्णनें आपल्या ग्रंथातून दिलीं आहेत. पण हीं वर्णनें वाचतांना एक गोष्ट ध्यानांत ठेवली पाहिजे ती ही कीं, चिनी सरकारी भाषेंत परदेशचे वकील हे सर्व ताबेदाल देशांचे दूत म्हणून संबोधिले जात. चिनी इतिहासांतील कांबोजविषयक वर्णनांत कांबोजच्या खर्‍या इतिहासाची माहिती जेणेंकरून होईल असा भाग फार थोडा आढळतो. राष्ट्रवकीलांनीं तयार केलेले अहवाल म्हणून जे भाग चिनी इतिहासांत आहेत त्यांत सांगितलेल्या अनेक गोष्टींस संशोधक विश्वासार्ह समजत नाहींत म्हणून ते येथें दिलेले नाहींत.

लगतचीं राष्ट्रें.- कांबोजच्या राजाकडून चिनी दरबारांत पहिला वकील आला तो इ. स. ६१६-१७ या सालीं आला. या समयास कांबोजचा राजा, थ्संपम् व चुकिंग येथील राजांशीं परममित्राच्या नात्यानें वागत होता. या राजांशीं कांबोजच्या राजाचे मित्रत्वाचे तह झालेले होते. थ्संपम् हें राज्य कांबोजच्या वायव्येस आहे. चुकिंगराज्य म्हणजे सांप्रत ज्याला चंपा म्हणतात तो टापू असावा. चंपा टापू हा सध्यांच्या कोचिन-चीन राज्याचा अगदीं दक्षिणेकडचा प्रांत होय. वर ज्या काळाचा उल्लेख आला आहे त्या काळीं यिशोन सिअन आय नांवाचा राजा कांबोज येथें राज्य करीत होता. त्याचा पिता पित्रसेन हा फार पराक्रमी असून त्यानें सयामवर अधिराज्य स्थापित केलें होतें. लिन्यें व तोयोनं येथील राजांशीं पित्रसेन राजाच्या नेहमी लढाया होत असत. हीं दोन राज्यें कांबोजच्या ईशान्यभागीं होतीं. यिशोन राजाचे शत्रू अतिशय रणप्रिय असू त्यांचीं शस्त्रें नेहमीं सज्ज असत. कांबोज राज्यांत अशी चाल होती कीं, राजाच्या निधनानंतर त्याची जी समकुलीन स्त्री असेल तिनें राजपुत्रांपैकीं कोणी गादीवर बसावयाचें तें ठरवावें. या राजपुत्राची निवड झाली म्हणजे इतर राजपुत्रांचे एकेक बोट कापून टाकीत. त्यांनीं रहावयाचें कोठें, त्यांनीं करावयाचें काय ते सर्व निश्चितपणें ठरवीत व सरकारी कारभारांत त्यांचें वजन बिवकुल न पडेल अशी तजवीज करीत.

विभागणी व एकीकरण.- इ.स. ६२७ या वर्षी सयामी लोकांनीं कांबोजचा राजा शालियिकीर्ण याच्या अंमलाखालून निसटण्याचा प्रयत्‍न केला पण तो सर्व व्यर्थ गेला. इ. स. ७०७ या वर्षीं या राज्याचे दोन विभाग झाले. एका विभागांत समुद्रकिनार्‍यालगतचा मुलुख व दुसर्‍यांत आंतर प्रदेश अंतर्भूत झाला व दोन वेगळ्या राजांच्या ताब्यांत हे दोन मुलुख दिले गेले. हे विभाग इ. स. ७७९ पावेतों असेच कायम राहिले. या शेवटल्या वर्षीं समुद्रसन्निध प्रदेशाचा अधिपति (पोमी) आपण होऊन आंतर प्रदेशाच्या (टित्सुंग) राजाच्या दरबारीं स्त्रीसमवेत गेला आणि टित्सुंगला खंडणी देता झाला. टित्सुंगनें त्या खंडणीचा स्वीकार केला. पोमीनें केलेल्या कामाबद्दल बक्षीस म्हणून टित्सुंगनें त्याला राकुलरक्षक नेमिलें आणि पिन-हम् (प्रासादजन्य) अशी पदवीहि त्याला अर्पण केली.

चीनशीं संबंध.- चीनच्या बादशाहांकडे कांबोजच्या राजांचे वकील जात. हे वकील पाठविणें या राजांनां अवश्य व सोईचें वाटे. यांचें कारण टांकिन व कोचिनचीन हीं दोन राज्यें कांबोजच्या रांजांनां लागून होतीं आणि चीनचा सम्राट कांबोजच्या रांजांनां या शेजार्‍यांविरुद्ध मदत देण्यासारखा होता. सुंग नांवाच्या चिनी राजघराण्याच्या हातीं देशांतील वरिष्ठ सत्ता असतां इ. स. १११६ या सालीं होई-थूंग नांवाच्या कांबोजच्या  राजानें चीनच्या दरबारांत आपला वकील कांहीं नजराणा बरोबर देऊन पाठविला होता. या वकिलानंतर लवकरच दुसरा वकील कांबोजच्या राजाकडून चिनी सम्राटाकडे गेला, व त्यानें या सम्राटाकडून पुष्कळ मानमरातब मिळवून कांबोजच्या राजाला मित्रत्वाचे भरपूर आश्वासनहि तो बरोबर घेऊन आला. इ.स. ११२८ या वर्षीं घडलेली हकीकत वरील हकिकतीपेक्षां अधिक महत्त्वाची आहे. या वर्षीं कोचिन-चीनचें राज्य हस्तगत केल्यानंतर चीनच्या राजानें कांबोज येथेंहि आपला एक सुभेदार नेमला व त्याला चिजि ही पदवी दिली, अशी ही हकीकत आहे. या हकिकतींत सत्यांश तितपतच आहे असा संशय कांहीं लोक प्रदर्शित करतात. पण टाँकिन व कोचिनचीन या राज्यांचा या काळांतील इतिहास फारच त्रुटित असा आपल्याला उपलब्ध आहे एवढ्यावरून वरील हकीकतीसंबंधानें संशय घेण्याचें कारण नाहीं. कांबोजमध्यें ही स्थिति, म्हणजे चीनच्या ताबेदारीची स्थिति, इ.स. १२२० पावेतों बदलली नव्हती असें दिसतें. कारण, या वर्षीं एक तद्देशीय राजा कांबोजच्या तक्तावर बसला व त्यानें चिनी बादशहाकडे आपला वकील एक पत्र व कांहीं नजराणा बरोबर देऊन पाठविला असा उल्लेख आढळतो. या नजराण्यांत दोन हत्ती होते व कांबोज देशांत उत्पन्न होणार्‍या विशेष चमत्कृतिजनक अशा जिनसाहि होत्या. मिंग हें चिनी घराणें राज्याधिकार चालवीत असतां १३७१ सालीं कांबोजच्या राजानें कोचिनचीनचें राज्य आपल्या हाताखालीं घातलें. हु-एडल-ना (हा कोचिनचीन राज्याचा एक सरहद्दीचा प्रांत असावा) येथील सत्ताधिपानें कांबोजच्या राजाकडे खंडणी पाठवून त्याचें अधिराज्य कबूल केलें. तथापि कांबोजाधिपाची सत्ता फार थोडे दिवस टिकली. इ.स.१३८५ या वर्षीं फ्रा कामी पुएन नांवाज्या थइ देशच्या राजानें कांबोजची राजधानी लाओक हिजवर स्वारी करून तिचा विध्वंस केला. इ. स. १४०३ ते १४१७ पावेतों कोचिनचिनी लोकांच्या स्वार्‍यांमुळें मध्यराज्य व दक्षिणप्रांत यांच्यामधील दळणवळण बंद झाल्यासारखेच होतें. चिनी लेखकांनीं लिहिलेलीं जीं इतिवृत्तें सांपडतात त्यांतील शेवटलीं इ. स. १४३२ आणि इ. स. १४५३ या वर्षांतील आहेत. इ. स. १४३२ च्या वृत्तलेखावरून अशी माहिती मिळतें कीं, या देशाचा (कांबोजचा) राजा दरवर्षीं एक मोठें संमेलन भरवीत असे व या संमेलनांत वानर, मोर, गेंडा, शुभ्र हत्ती व इतर अनेक वन्य पशूंचें प्रदर्शन केलें जात असे. बौद्ध लोक शुभ्र हत्तींस विशेष मानित हें प्रसिद्ध आहे. या १४३२ च्या इतिवृत्तांतील संक्षिप्‍त माहितींत थोडी भर घालावयाची तर ही एक गोष्ट सांगणें उचित आहे कीं, कांबोजचा राजा दुसर्‍या बुद्धधर्मीय राजांच्या वहिवाटीप्रमाणें दरवर्षीं एक मोठा मेळा भरवून भिक्षुकांनां व सामान्य लोकांनांहि उदारपणें देणग्या देत असे. इ. स. १४५२ त चीनच्या बादशहानें कांबोज येथें आपला एक वकील पाठविला होता असें दुसर्‍या वृत्तलेखावरून समजतें. त्यानें राजासाठीं नक्षीदार रेशमी कपडे, सहा भरजरी कपडे व जाळीदार रेशमाचे चार कपडे व राणीसाठीं चार भरजरी व सहा रेशमी जाळीदार कपडे नेले होते. राजानें त्या चिनी वकिलाला व त्याच्या बरोबरच्या दुभाष्याला मोठमोठ्या देणग्या दिल्या. कांबोजच्या राजांचे आपल्याविषयी चांगलें मत करून घेण्यासाठीं चिनी बादशहा झटत होते हें समजून घेण्याइतकेंच या वृत्तलेखाचें महत्त्व आहे. टाकीनी, कोचिनचिनी वगैरै उत्तरेकडील लोकांबरोबर चाललेल्या युद्धांत कांबोजच्या राजांची मदत मिळविण्याचा चिनी बादशहांचा उद्देश असे यांत संशय नाहीं.

कांबोजसंबंधाची १४५३ नंतरचा पूर्ण माहिती थइ व सयामी इतिहासकारांच्या मार्फतीनेंच आपल्याला मिळते. सयामच्या राजांनीं इ. स. १५३२, १५३७ व १५३८ सालीं कांबोज्या राजांशीं युद्ध केलें; या सर्व युद्धांत कांबोजच्या राजांचा पराभव झाला.

यापुढें लवकरच पोर्तुगीजांचा इतिहास सुरू होतो.